लिफ्टच्या बहाण्याने चाकूचा धाक दाखवून सांगलीतील तरुणाला लुटले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

  • लिफ्टच्या बहाण्याने मोटारीत बसवून सांगलीतील तरुणाला चौघा लुटारूंनी चाकूचा धाक दाखवून लुटल्याचा प्रकार उघडकीस.
  • तावडे हॉटेल चौक ते हालोंडी मार्गावर रविवारी पहाटे घटना. 
  • याबाबत अमोल विष्णू खंडागळे (वय 34, रा. पत्रकारनगर, सांगली) यांनी दिली फिर्याद. 

कोल्हापूर - लिफ्टच्या बहाण्याने मोटारीत बसवून सांगलीतील तरुणाला चौघा लुटारूंनी चाकूचा धाक दाखवून लुटल्याचा प्रकार उघडकीस आला. तावडे हॉटेल चौक ते हालोंडी मार्गावर रविवारी पहाटे हा प्रकार घडला. याची नोंद शाहूपुरी पोलिसात झाली. याबाबतची फिर्याद अमोल विष्णू खंडागळे (वय 34, रा. पत्रकारनगर, सांगली) यांनी दिली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, विष्णू खंडागळे हे सांगलीत राहतात. कामानिमित्त कोल्हापुरात आले होते. 15 सप्टेंबरला पहाटेच्या सुमारास सांगलीला जाण्यासाठी तावडे हॉटेल चौकातील बसस्थांब्याजवळ उभे होते. दरम्यान त्यांच्याजवळ पांढऱ्या रंगाची मोटार आली. त्यातील चालकाने त्यांना सांगलीला चाललो आहे. तुम्हालाही सोडतो असे सांगितले.

त्यानुसार खंडागळे हे मोटारीत बसले. चालकाने मोटार पंचगंगा नदी पुलावरून पुढे नेली. त्याठिकाणी त्याचे तीन साथिदार उभे होते. त्याने त्या तिघांना सांगलीला येणार का? अशी विचारणा केली. तसे ते गाडीत बसले. त्यातील एक जण पुढे तर दोघे खंडागळे यांच्या बाजूला बसले. मोटार जरा पुढे गेल्यानंतर चालकाने मोटार रस्त्याकडेला उभी केली. त्याचबरोबर उजव्या बाजूला बसलेल्या लुटारूने खिशातील चाकू खंडागळे यांच्या पोटाला लावला. त्याने त्यांच्या हतातील दोन सोन्याच्या अंगठ्या काढून घेतल्या. त्यानंतर मोटार हालोंडीच्या दिशेने पुढे नेली.

दरम्यान मोटारीतील अन्य लुटारूंनी खंडागळे यांचा किमंती मोबाईल, घड्याळ, पाकीटातील दोन हजाराची रोकड असा 41 हजार रुपयाचा किमंती ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर मोटार याच परिसरात फिरवून खंडागळे यांना मध्येच सोडून दिले. याबाबतची फिर्याद खंडागळे यांनी रात्री उशिरा शाहूपुरी पोलिसात दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गेल्या काही दिवसात लुटमारीच्या प्रकारात वाढ झाली असून लुटारूंनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: loot incidence on Sangli - Kolhapur Road