पराभवाचा राग काढला चक्क रस्त्यावर ; जेसीबीनेच खोदले चर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 January 2021

एका पराभूत उमेदवाराने चक्क रहदारीच्या रस्त्यावर चरी खोदून वाहतूक अडविल्याची तक्रार केली आहे. 

खानापूर (बेळगाव) : ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागलेल्या उमेदवारांनी आता द्वेषाचे राजकारण सुरु केले आहे. यामुळे अनेक गावांत वादाचे प्रसंग घडत आहेत. इदलहोंडमध्ये तर एका पराभूत उमेदवाराने चक्क रहदारीच्या रस्त्यावर चरी खोदून वाहतूक अडविल्याची तक्रार तहसीलदारांकडे झाली आहे. 

यंदाची निवडणूक शांततेत पार पडली तरी निकालानंतर वादांना तोंड फुटले आहे. इदलहोंडमध्ये विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी पराभूत उमेदवारांच्या घरासमोर गुलाल उधळून आणि फटाके फोडून विजयोत्सव साजरा केला. काही अतिउत्साही तरुणांनी घरात फटाके आणि गुलाल टाकून डिवचण्याचा प्रयत्न केला. त्याच रागातून पराभूत उमेदवाराने त्यांच्या मालकीच्या अनेक वर्षांपासून वहिवाट असलेल्या रस्त्यांवर जेसीबीने चरी खोदल्या. तसेच त्यांच्या मालकीच्या जमिनीतील वीट व्यवसायही बंद पाडला. 

हेही वाचा -  दोन वर्षानंतरही कन्नड शाळा हलेना 

 

गावातील लोकांना त्यांच्या शेतवडीत जाण्यासाठी हेच एकमेव रस्ते होते. तसेच विटांची वाहतूकही याच रस्त्यांवरुन होते. पण, रस्ते बंद झाल्यामुळे मोठी गोची झाली आहे. स्मशानभूमीत जाण्यासाठीही रस्ता नाही. याबाबत जनसेवा विकास पॅनेलच्या नवनिर्वाचित सदस्यांनी तहसीलदार रेश्‍मा तालिकोटी यांची भेट घेऊन तोडगा काढण्याची विनंती केली. हा वाद इतक्‍या टोकाला गेला आहे की प्रकाश दत्तू जाधव यांच्या गवतगंजीला आग लावल्याचीही घटना घडली आहे. या वादांनी पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. अशा गावांमध्ये शांतता सभा घेऊन समन्वय घडवून आणण्याची गरज आहे. मात्र, संबंधितांना वाद न करण्याची विनंती केली असली तरी त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे पोलीस उपनिरीक्षक बसगौडा पाटील यांनी "सकाळ'ला सांगितले. 

वेळीच नियंत्रण आवश्‍यक 

सध्या प्रत्येक गावातील वातावरण पेटले आहे. यात सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. शिवारातील रस्ते, पिण्याचे पाणी, नातेसंबंध यावर या वादांचा परिणाम होत आहे. गावातील पुढाऱ्यांच्या भांडणात गरीबांना त्रास होऊ लागला आहे. हत्तरगुंजीत निवडणूक काळात देऊळ बंद केल्याने तेथील वातावरण धगधगते आहे. अशा या घटनांवर वेळीच नियंत्रण आणण्याची आवश्‍यकता आहे. 

हेही वाचा - राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे
 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: losing election of related candidate in politics with opposing party in belgaum