पलायन करणाऱ्या प्रेमीयुगुलाला शेतात पकडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

शुक्रवारी संध्याकाळी प्रेमीयुगुलाने परांड्याकडून कुर्डुवाडीच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. रात्रभर पोलिसांनी व गावकऱ्यांनी ढवळस परिसरात शोधले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते दोघे ढवळसमधील एका शेतात सापडले.

कुर्डुवाडी - संध्याकाळी साडेसातची वेळ...सुसाट धावणारी कार...धावताना मध्ये येणाऱ्या चार दुचाकींना सिनेस्टाईलने ठोकर मारून कार पुन्हा पुढे वेगाने धावते....त्या कारचा पाठलाग करत चारचाकी, काही दुचाकी गाड्या...हा कोणत्याही सिनेमातील सीन नाही तर परांडा ते ढवळस व्हाया कुर्डुवाडी मार्गावरील कारचा रात्री दहावाजेपर्यंत चाललेला थरार आहे. 

शुक्रवारी संध्याकाळी प्रेमीयुगुलाने परांड्याकडून कुर्डुवाडीच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. रात्रभर पोलिसांनी व गावकऱ्यांनी ढवळस परिसरात शोधले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते दोघे ढवळसमधील एका शेतात सापडले. बालाजी जाधव (वय २८, रा. कांदलगाव , जि. पुणे) हा व एक महिला हे दोघे परांडा तालुक्‍यातून कारने पळून चालले होते. परांडा पोलिसांनी कुर्डुवाडी पोलिसांना याची माहिती दिली. त्याचवेळी त्या महिलेच्या नातेवाइकांनी त्या दोघांचा पाठलाग सुरू केला. त्या दोघांनी गाडी करमाळा रस्त्याकडे वळवली. तेथून रोपळे, कव्हे, बारलोणी मार्गे कुर्डुवाडीकडे आले. परंतु, जाताना रस्त्याच्या कडेला असणाऱ्या चार दुचाकींना ठोकर मारल्याचे समजते. कुर्डुवाडीतूनही त्याच सुसाट वेगात बालोद्यानकडे कार वळवली. या सुसाट वेगामुळे व दुचाकींना ठोकरल्याने काही तरुणांनी त्या गाडीचा पाठलाग करण्यास सुरवात केली. कुर्डुवाडीतून रेल्वे गेटजवळून ढवळसकडे कार गेली. तेथे एका वस्तीतील शेतात गाडी सोडून त्या दोघांनी पलायन केले. कुर्डुवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सी. व्ही. केंद्रे व त्यांचे पथक तातडीने घटनास्थळाकडे गेले. त्यांनी व गावकऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेतला. पोलिसांनी कार ताब्यात घेतली. सकाळी पोलिसांनी त्या दोघांना एका शेतातून पकडून परांडा पोलिसांच्या ताब्यात दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Love couple caught in the field