सोन पावलांनी आली... दागिने घेऊन गेली...! ; कसे ते जरूर वाचा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

मोबाईलवर त्यांचे संभाषण होऊ लागलं. त्यातून त्यांच्यात प्रेम निर्माण झालं. दोघेही आपल्या घरची आणि वैयक्तिक माहितीही शेअर करू लागले. तिने तिचा पहिला विवाह झाल्याचं त्यानंतर झालेला साखरपुडा मोडल्याचेही तरुणाला सांगितलं.

कोल्हापूर - सोनपावलांनी आली अन्‌ दागिने घेऊन गेली याची प्रचीती आज शहरातील एका तरुणाला आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे परप्रांतीय तरुणीशी संभाषण सुरू झाले. अवघ्या दीडेक महिन्यात तो तिच्या प्रेमात दिवाना झाला. तिच्याशी त्याने विवाह केला. घरच्यांनीही देखणी सून म्हणून तिला पाच तोळे सोन्याचे दागिने घातले. अवघ्या 20 ते 25 दिवसाचा संसार करून ती मोबाईल घरात ठेवून दागिन्यासह बेपत्ता झाली. कसलाही विचार न करता सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या प्रेमविवाहाचा कसा दणका बसतो याचे हे एक उदाहरण म्हणावे लागेल. 

शहरातील गजबजलेल्या वस्तीत एक कारखानदार तरुण राहतो. तो अविवाहित होता. त्याचा कलकत्ता येथील एका तरुणीशी फेसबुक व व्हॉटस्‌ ऍपच्या माध्यमातून संपर्क झाला. वारंवार ते दोघे चॅटींग करू लागला. मोबाईलवर त्यांचे संभाषण होऊ लागलं. त्यातून त्यांच्यात प्रेम निर्माण झालं. दोघेही आपल्या घरची आणि वैयक्तिक माहितीही शेअर करू लागले. तिने तिचा पहिला विवाह झाल्याचं त्यानंतर झालेला साखरपुडा मोडल्याचेही तरुणाला सांगितलं. तिच्यावरील प्रेमापोटी तो तिचा स्वीकार करण्यास तयार झाला. दोन महिन्यांपूर्वी तिचा तरुणाला फोन आला. माझं तुझ्यावर प्रेम आहे. दोघांनी विवाह करण्याचे ठरवलं. ती पळून येण्यास तयार झाली; पण घरचे रागावतील असे तरुणाने तिला सांगितले. मात्र तिने त्याचं ऐकलं नाही. ती थेट कोल्हापुरात तरुणाच्या घरात आली. तिला पाहून घरचेही अवाक्‌ झालं. मुलगी साधी स्वभावाने गरीब आहे म्हणून तिला त्यांनी स्वीकारलं.

दागिने घेऊन तरूणी पसार

पंधरा दिवसानंतर त्या दोघाचं लग्नही लावून दिलं. तिला हौसेने पाच तोळ्याचे सोन्याचे दागिनेही घातले. तिच्या घरचेही तिला आशीर्वाद देण्यासाठी कोल्हापुरात आले. जेमतेम 20 ते 25 दिवस दोघांचा सुखी संसार सुरू झाला; पण दोन दिवसांपूर्वी ती अचानक बेपत्ता झाली. जाताना तिने आपला मोबाईल पती अर्थात तरुणाच्या घरातच ठेवला. त्या वेळी तिच्या अंगावर घातलेले पाच तोळे सोन्याचे दागिने होते. ती बेपत्ता झाली की दागिने घेऊन पळून गेली, अशा संभ्रमातील तरुणाने पोलिसांशी संपर्क साधला. हा प्रकार ऐकल्यानंतर पोलिसही अवाक्‌ झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Love Marriage Through Social Media Girl Cheated Lover