महाबळेश्‍वरला चेरापुंजीपेक्षा धोऽऽधो!

महाबळेश्‍वरला चेरापुंजीपेक्षा धोऽऽधो!

सातारा - मेघालयातील चेरापुंजी म्हणजे देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून सर्वपरिचित आहे. यावर्षी मात्र गिरिस्थान महाबळेश्‍वरने चेरापुंजीला मागे टाकले आहे. चेरापुंजीला यावर्षी आजवर चार हजार ७३५ मिलिमीटर, तर महाबळेश्‍वरला तब्बल पाच हजार ५७२ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील भागात चांगला पाऊस झाला असून, पाच तालुक्‍यांनी आजवरची सरासरी ओलांडली आहे. 

यंदा पावसाने चांगलीच धार लावून धरली आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडे सातत्याने पाऊस सुरू आहे. महाबळेश्‍वरमध्ये तर यंदा तुफान पाऊस झाला आहे. सद्य:स्थितीत सरासरीच्या तुलनेत तब्बल २९४ टक्‍के पाऊस झाला आहे. वार्षिक कालावधीत महाबळेश्‍वरमध्ये सरासरी दोन हजार २२३ मिलिमीटर इतका पाऊस होतो. यंदा मात्र तो तब्बल पाच हजार ७५२ मिलिमीटर झाला आहे. पाटण तालुक्‍यातील नवजा येथे तब्बल पाच हजार ५६१ मिलिमीटर इतक्‍या पावसाची नोंद झाली आहे. 

परिणामी, राज्याचे वरदायिनी असलेले कोयना धरण सध्या भरले असून, सातत्याने कोयना नदीत पाण्याचा विसर्ग करावा लागत आहेत. सध्या कोयनेत १०३.१९ टीएमसी पाणीसाठा असून, आजवर पायथा वीजगृहात ६.७६, तर वक्र दरवाजांतून ५१.४५ टीएमसी पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे. मात्र, पूर्वेकडील माण, खटाव, कोरेगाव तालुक्‍यांत वार्षिक सरासरीच्या प्रमाणात कमी पाऊस झाला असल्याने अद्यापही पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते आहे. 

दरम्यान, देशात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या चेरापुंजीपेक्षा महाबळेश्‍वरमध्ये यापूर्वी १९९४, २००६, २०१३ मध्ये जास्त पाऊस झाला होता, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाचे (आयएमडी) वैज्ञानिक ए. के. श्रीवास्तव यांनी दिली. 

पूर्वेकडे दुर्भिक्षच
तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये, कंसात टक्‍केवारी : सातारा ८०८ (११७), जावळी १३१४ (९८), पाटण १३८३ (९५), कऱ्हाड ४८८ (११३), कोरेगाव ३११ (७३), खटाव ३२३ (१५२), माण १२६ (६३), फलटण १२६ (६८), खंडाळा २८१ (११७), वाई ४३२ (८५), महाबळेश्‍वर ५२९८ (२९४). ही आकडेवारी एक जून ते २९ ऑगस्टपर्यंत झालेल्या पावसाच्या सरासरीवरून आहे. मात्र, ही वार्षिक सरासरी गृहित धरल्यास माणमध्ये २९ टक्‍के, खटावला ७७ टक्‍के, तर कोरेगावला ४८ टक्‍के पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com