लाईनमन कमी असल्याने विजेचा लपंडाव

अभिजित खुरासणे
मंगळवार, 11 जुलै 2017

महाबळेश्वर - वारंवार खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे ग्राहकांना त्रास होत असताना वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कोणतेच सोयरसुतक दिसत नाही. वीज वितरण कंपनीच्या चुकीच्या कारभारामुळे ग्राहकांत संताप आहे. लाईनमन कमी असल्याने कामाचा ताण येत असल्याचे अधिकाऱ्यांकडून बोलले जात आहे.

महाबळेश्वर - वारंवार खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे ग्राहकांना त्रास होत असताना वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कोणतेच सोयरसुतक दिसत नाही. वीज वितरण कंपनीच्या चुकीच्या कारभारामुळे ग्राहकांत संताप आहे. लाईनमन कमी असल्याने कामाचा ताण येत असल्याचे अधिकाऱ्यांकडून बोलले जात आहे.

महाबळेश्वरला नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. आर्थिक सुबत्तता असल्याने क्वचितच येथील व्यावसायिक, शेतकऱ्यांकडून थकबाकी होते. वीज मंडळाचीही सरासरी १०० टक्के वसुली होते. तरीही, या कंपनीकडून नेहमीच कमी दर्जाच्या सोई मिळताना दिसतात. महाबळेश्वर येथील पावसाळा नवीन नाही. येथे सरासरी ३०० इंच पाऊस पडतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला पावसाळ्यातील बचावासाठी पूर्वनियोजन करावे लागते. त्याचप्रमाणे शासकीय विभागांनाही पूर्वतयारी करावी लागते. वीज वितरण कंपनीदेखील त्याला अपवाद नाही. अनेकवेळा पावसाळ्यात वीज वाहक तारांवरती झाडांच्या फांद्या पडल्याने वीज प्रवाह खंडित होतो. चारी बाजूने जंगलाने वेढलेल्या महाबळेश्वरमध्ये वीज वाहक ताराही जंगलातूनच जात असल्याने त्याला अडथळा ठरणाऱ्या फांद्या अनेक वेळा उन्हाळ्याच्या हंगामात तोडण्याचे काम होते. परंतु, पर्यावरणाच्या कडक कायद्यामुळे फांद्या तोडण्यास मनाई होत असल्याचे कारण देत हे काम टाळले जाते. त्याचा परिणाम वीज पुरवठ्यावर होताना दिसतो. यावर्षी उन्हाळी हंगामात दोन दिवस वीजपुरवठा खंडित झाल्याने व्यापाऱ्यांसह अनेकांचे आतोनात हाल झाले. पाणीपुरवठाही खंडित झाला होता. व्यापाऱ्यांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले. सध्याही विजेचा लंपडाव सुरूच आहे. दररोज सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्याला व्यापारी व नागरिक वैतागले आहेत. बिल वाटपही वेळेत होत नसल्याने अनेकवेळा तक्रारी करूनही त्याबाबत मार्ग काढता आलेला नाही. उन्हाळी हंगामात वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी पाहुणचारासाठी येथे येतात. 

त्यांच्या दिमतीला वीज कर्मचारी काम करताना दिसतात. ज्यावेळी संपूर्ण लाईनची तपासणी करून उपाययोजना करण्याच्या वेळीच कर्मचाऱ्यांना मोठ्या अधिकाऱ्यांच्या बडदास्तीसाठी तैनात केले जाते. त्यामुळे लाईनची तपासणी होत नाही. 

अनेक वर्षांपासून येथे नेहमी पावसाळ्यात वीज गेल्याने कर्मचाऱ्यांना भर पावसात जंगलातून तसेच धोकादायक खांबावर काम करावे लागते. त्यासाठी पर्याय म्हणून पाचगणी ते महाबळेश्वर दरम्यान जमिनीतून वीज वाहिनी केबलच्या पर्यायाबाबत अनेकवेळा चर्चा झाली. परंतु, त्याला अद्याप मुहूर्त मिळत नाही.

रिक्तपदांमुळे सेवा विस्कळित
महाबळेश्वर तालुक्‍यासाठी वाई विभागातील मुख्य अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण तीन सहायक अभियंत्यांची नेमणूक महाबळेश्वर येथे करण्यात आली आहे. त्यामध्ये एच. पी. शिंदे यांच्याकडे महाबळेश्वर शहर, सचिन माने यांच्याकडे अवकाळीपासून प्रतापगडपर्यंत संपूर्ण परिसर व नव्याने नेमणूक झालेले श्री. पाटील यांच्याकडे तळदेव व मोळेश्वरपर्यंतचा भाग येतो. शहरासाठी एकूण आठ लाईनमनची नियुक्ती आहे. परंतु, सध्या केवळ तीनच लाईनमन असल्याने पाच पदे रिक्त आहेत. ग्रामीण भागात दोन विभाग आहेत. त्यापैकी एका विभागात ११ पैकी केवळ आठ लाईनमनची पदे रिक्त आहेत. तर, दुसऱ्या विभागात ११ पैकी पाच लाईनमनची पदे रिक्त आहेत.

Web Title: mahabaleshwar satara news Electricity hide due to low noise