महाबळेश्‍वरच्या नक्षीदार काठ्यांची एक्झिट ?

सुनील कांबळे
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

नक्षीदार काठ्यांचा पारंपरिक धंदा टिकवायचा आणि उदरनिर्वाहकरिता शहरी भागातून अन्य लाकडाच्या शोभीवंत काठ्यांसह लाकडाच्या अँटिक वस्तू आज आणाव्या लागत आहेत.
इम्तियाज पन्हाळकर, काठ्यांचे व्यापारी व ज्येष्ठ नागरिक 

पाचगणी  : महाबळेश्वरने पर्यटकांना निसर्गाचा मनसोक्त आनंद देण्याचे जणू व्रतच स्वीकारले आहे. स्ट्रॉबेरी, रासबेरी, मलबेरी हा थंड हवेच्या ठिकाणचा मेवा पर्यटकांना न्यारी मेजवानी देतो. जॅम, जेली आणि तत्सम पदार्थ, महाबळेश्वरी चणे पर्यटकांच्या दिमतीला असतात. मात्र, अलीकडे महाबळेश्वरच्या बाजारपेठेत एकेकाळी आकर्षणाचा केंद्रबिंदू आणि महाबळेश्वर भेटीची आठवण म्हणून पर्यटक हमखास घेऊन जाणाऱ्या नक्षीदार काठीला गजबजलेल्या बाजारपेठेतून "एक्‍झिट' घ्यावी लागली आहे. 

हेही वाचा - महाबळेश्‍वर : एलीफिस्टनच्या दरीतून ट्रेकर्सने शाेधले लाखाे रुपये

महाबळेश्‍वरला येणाऱ्या पर्यटकांपैकी काही जण महाबळेश्वरला दिलेल्या भेटीची आठवण स्मरणात राहावी म्हणून तर काही जण आपल्या वृध्दांसाठी आधारासाठी म्हणून नक्षीदार काठ्या घेऊन जात असत. मात्र, अलीकडे या काठ्यांना ग्रहण लागल्याचे काठ्यांचे व्यापारी व ज्येष्ठ नागरिक इम्तियाज अहमद पन्हाळकर यांनी सांगितले. नक्षीदार काठ्यांचा सारीपाट मांडताना श्री. पन्हाळकर म्हणाले, ""काठ्यांचा व्यवसाय आमच्या वाडवडिलांपासून उदयास आला. व्यवसायाने शतक ओलांडले असेल. सध्या अनेकांच्या चौथ्या पिढीच्या हाती हा व्यवसाय येऊन पडला आहे.

अवश्य वाचा -  फाशी, नराधमच्या चर्चेत दुर्दैवाने हा मुद्दा बाजूलाच

जंगलात आढळणाऱ्या लोखंड नावाच्या लाकडापासून नक्षीदार काठ्या बनविल्या जातत. हे लाकूड केवळ महाबळेश्वरच्या जंगलात आढळते. लाकूड गवतात ठेवून, विशिष्ट तापमानात गरम करून काठीला सरळ करून, त्याला घासल्यानंतर त्याच्यावर आकर्षिक नक्षी उमटवतात. काठीच्या मुठीला बुलडॉग, हत्ती, तर कधी वेगवेगळ्या पक्ष्यांची आकृती दिली जात असते. एक काठी बनवताना किमान वेगवेगळ्या प्रक्रिया करण्याकरिता ती किमान 16 वेळा हाताळावी लागत असे व प्रत्येक काठीकरिता किमान 12 ते 13 तासांचा अवधी लागत असे. महाबळेश्वर बाजारपेठेव्यतिरिक्त त्या कोठे उपलब्ध होत नसत. पर्यटकांसह येथे येणारे परदेशी पाहुणे, सिनेव्यावसायिकसुद्धा या नक्षीदर काठ्यांना पसंदी देत असत.''

एकेकाळी अगदी किरकोळ दरात किमान 30 ते 40 दुकानांत मिळणाऱ्या या काठ्या आता बोटावर मोजण्याइतक्‍या लोकांकडे नाममात्र प्रमाणात दृष्टीस पडत असल्याचे सांगताना श्री. पन्हाळकर म्हणाले, ""शासनाने हा परिसर पर्यावरणाच्यादृष्टीने संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केला.
 
लाकडाविषयी कायदे कडक झाले अन्‌ या व्यवसायाला घरघर लागली. त्यातच तरुण पिढीने गाइड, टॅक्‍सीचालक तर रूम भाड्याने भरण्याचे व्यवसाय स्वीकारल्याने नाक्षीदार काठ्यांच्या व्यवसायाची शोकांतिका सुरू झाली.'' नक्षीदार काठ्या बाजारपेठेतून लुप्त होऊ लागल्याने महाबळेश्वरची निशाणीच संपुष्टात आल्याची खंत ते वारंवार व्यक्त करताना दिसत होते. नाक्षीदार काठ्या अल्पावधीत इतिहासजमा होतील, असे त्यांनी सांगितले. यापूर्वी वेताच्या काठ्यांना रंगीबेरंगी प्लॅस्टिक गुंडाळून त्या विकल्या जात असत. मात्र, दहा ते 15 वर्षांपूर्वी त्या नामशेष झाल्या.

जरुर वाचा -  ट्रेकर्स म्हणतात पुन्हा येईन...पुन्हा येईन... 

""नक्षीदार काठ्यांचा पारंपरिक धंदा टिकवायचा आणि उदरनिर्वाहकरिता शहरी भागातून अन्य लाकडाच्या शोभीवंत काठ्यांसह लाकडाच्या अँटिक वस्तू आज आणाव्या लागत आहेत.'' 

इम्तियाज पन्हाळकर, काठ्यांचे व्यापारी व ज्येष्ठ नागरिक 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahabaleshwars Decorative And Walking Stick Traditional Business In Trouble