महादेव जानकरांना नंदीबैलावरून फिरवू - बच्चू कडू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

सोलापूर - 'महादेव असताना दुधाचे भाव कसे कमी झाले, असा प्रश्न उपस्थित करतानाच महादेवाचे वाहन असलेल्या नंदीबैलावर महादेव जानकर यांना फिरवू,'' असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू यांनी दिला.

सोलापूर - 'महादेव असताना दुधाचे भाव कसे कमी झाले, असा प्रश्न उपस्थित करतानाच महादेवाचे वाहन असलेल्या नंदीबैलावर महादेव जानकर यांना फिरवू,'' असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू यांनी दिला.

दिव्यांगांच्या निधी वितरणाबाबत आढावा घेण्यासाठी कडू आज सोलापूर महापालिकेत आले होते. ते म्हणाले, 'उसाचे पाच हजार कोटी मिळाले नाहीत. दुधाचे भाव कमी झाले. महादेव असताना दुधाचे भाव कसे कमी झाले. महादेवाचे वाहन नंदीबैल आहे. दुधाला योग्य भाव न मिळाल्यास नंदीबैलावरूनच जानकर यांना फिरवण्यात येईल.''

कर्जमाफीचा सर्वांत मोठे लाभार्थी बॅंकवाले आहेत, असे सांगून कडू म्हणाले, 'मुद्रा कर्जयोजनेच्या माध्यमातून फक्त भाजपच्या लोकांना कर्ज दिले गेले. एकाही सामान्याला कर्ज मिळाले नाही. सोलापुरातील एखादे उदाहरण सांगा, की गरीबाला "मुद्रा'च्या माध्यमातून कर्ज मिळाले आहे. तसे असल्यास ते उदाहरण मी सर्व राज्यभर देईन.''

बॅंकांवर सरकारचे नियंत्रणच नाही. यांची सारी मिलीजुली आहे. शेतकरी मेला काय, जगला काय, त्याचे काही सोयरसूतक या शासनाला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

'भाजपचा "डीएनए' तपासला तर त्यांच्यात अर्ध्याच्या वर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच नेते दिसतील. "चोर-चोर मौसेरे भाई', यातला प्रकार आहे,'' असेही कडू म्हणाले.

Web Title: mahadev jankar bacchu kadu politics