आदेश द्या, सर्व कामे करू - देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

भारतीय जनता पक्षामध्ये छत्रपतींच्या वंशजांचा सन्मान कधीही कमी होऊ देणार नाही. ते आदेश देतील, ती जिल्ह्याची सर्व विकासकामे मार्गी लावली जातील, हा शब्द मी देतो. विधानसभेबरोबर लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत. दोन्ही राजांना देशात व राज्यात विक्रमी मतांनी विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेत केले.

सातारा - भारतीय जनता पक्षामध्ये छत्रपतींच्या वंशजांचा सन्मान कधीही कमी होऊ देणार नाही. ते आदेश देतील, ती जिल्ह्याची सर्व विकासकामे मार्गी लावली जातील, हा शब्द मी देतो. विधानसभेबरोबर लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत. दोन्ही राजांना देशात व राज्यात विक्रमी मतांनी विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेत केले.

महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात मुख्यमंत्री आज साताऱ्यात होते. या वेळी महसूलमंत्री व प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी खासदार उदयनराजे भोसले, माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

फडणवीस म्हणाले, ‘‘प्रजा ही राजा समजून आम्ही गेली पाच वर्षे काम केले. पाच वर्षांत केलेल्या कामांची जनतेला माहिती देण्याचे व संवाद साधण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. त्यासाठी कामांचा लेखाजोखा देण्याबरोबर पुन्हा आशीर्वाद घेण्यासाठी ही यात्रा काढली आहे. गेल्या पाच वर्षांत आमच्या सरकारने शेतकऱ्यांना ५० हजार कोटी रुपये दिले. रस्ते, सिंचन प्रकल्प, बेघरांना घरे या सर्वच पातळ्यांवर मोठी कामे केली. पश्‍चिम महाराष्ट्रातील रखडलेल्या प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी हजारो कोटी रुपये दिले.’’ 

ते म्हणाले, ‘‘सातारा जिल्हा दक्षिणेकडील सर्व राज्यांची पाण्याची गरज भागवत आहे; परंतु त्याच जिल्ह्यातील काही भागाला पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यांच्यावर बसलेला कायम दुष्काळी असा ठपका मला पुसायचा आहे. त्यादृष्टीने कामे हातात घेतली आहेत. उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांनी कोणतीही अट न ठेवता, केवळ जनतेच्या कामाची यादी देत पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. जनतेच्या विकासासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे; परंतु गेली अनेक वर्षे चांगले वाटणारे हे दोघे आता ‘त्यांना’ वाईट वाटू लागले आहेत.’

पिढी वाया घालविण्याचे आघाडीचे पाप - उदयनराजे 
काँ  ग्रेस, राष्ट्रवादीने सत्ताकाळात पिढी वाया घालविण्याचे पाप केले. त्यांच्या आडवा आणि जिरवा योजनेला लोक कंटाळले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासकामे केली असून, त्यांनी केलेली कामे ते लोकांसमोर ठेवत आहेत. काही चुकले असेल तर लोकांनी सांगावे, असे ते सांगत आहेत. त्यामुळे ‘महाजनादेश’ यात्रा सरस ठरत आहे. महाजनादेश यात्रेमुळे राष्ट्रवादीची फसवेगिरी, बनवेगिरी उघड झाली असून, काम करणारे कोण आणि फसवणारे कोण, हे लोकांच्या लक्षात आले आहे, असे मत माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, ‘‘मी महिनाभर विचार केला. एक नव्हे १५ वर्षे आयुष्याची गेली.

जे कोण बोलताहेत त्यांनी आपल्या मनाला याबाबत विचारावे की मी हा निर्णय का घेतला? आघाडीच्या काळात मंत्र्यांकडे कोणतेही काम घेऊन गेलो तर फाईल डायरेक्‍ट डस्टबिनमध्ये जायची. १८ वर्षे मी जे सहन केले त्याबद्दल राष्ट्रवादीने मला सहनशिलतेचा पुरस्कार द्यायला हवा होता. तेही माझ्या नशिबात नव्हते. माझे मताधिक्‍य सुरवातीच्या दोन निवडणुकांत वाढले; पण या निवडणुकीत निम्म्याने कमी झाले.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahajanadesh Yatra Development Devendra Fadnavis Politics