‘महानिर्मिती’चे विक्रमी वीज उत्पादन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

अंगाची लाहिलाही करणाऱ्या कडक उन्हाचे चटके सोसणाऱ्या जनतेला महानिर्मिती कंपनीने आशेचा किरण दाखवून भारनियमन मुक्त करण्याची कामगिरी केली आहे. राज्यातील विविध वीजकेंद्रांमधून ३० दिवसांत १००९८ मेगावॅट इतके विक्रमी वीज उत्पादन घेण्याची कामगिरी महानिर्मिती कंपनीने केली आहे.

कोयनानगर - अंगाची लाहिलाही करणाऱ्या कडक उन्हाचे चटके सोसणाऱ्या जनतेला महानिर्मिती कंपनीने आशेचा किरण दाखवून भारनियमन मुक्त करण्याची कामगिरी केली आहे. राज्यातील विविध वीजकेंद्रांमधून ३० दिवसांत १००९८ मेगावॅट इतके विक्रमी वीज उत्पादन घेण्याची कामगिरी महानिर्मिती कंपनीने केली आहे. कोयना जल विद्युत प्रकल्पाचा यामध्ये सिंहाचा वाटा असल्याची माहिती कोयना जल विद्युत प्रकल्पाचे मुख्य अभियंता राजेश मोराळे यांनी दिली.

राज्यात सध्या कडक उन्हाळा आहे. अंगाची लाहिलाही करणाऱ्या उन्हाचे चटके जनतेला बसत आहेत. यामुळे राज्यातील जनतेकडून विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्याची विजेची मागणी २२३०० मेगावॅट आहे. मागणी तसा पुरवठा करणे हे महानिर्मिती कंपनीचे काम असल्याचे मोराळे यांनी सांगून राज्याचे वीज उत्पादन १७३३७ मेगावॅट आहे. यामध्ये खासगी वीज उत्पादन करणाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे. मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याने ५३५७ मेगावॅट वीज केंद्राच्या वाट्यातून घेऊन यावर मात करण्यात आल्याचे मोराळे यांनी स्पष्ट केले.

महानिर्मितीच्या औष्णिक वीज उत्पादन प्रकल्पातून ७५७७ मेगावॅट, वायू वीज उत्पादन प्रकल्पातून २७० मेगावॅट, सौर वीज उत्पादन प्रकल्पातून ११९ मेगावॅट, तर जल विद्युत प्रकल्पातून २१०० मेगावॅट अशी एकूण १००९८ मेगावॅट विक्रमी वीज उत्पादित झाली आहे. महानिर्मिती इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. महानिर्मिती कंपनीचे अध्यक्ष अरविंद सिंग, संचालक चंद्रकांत थोटवे यांनी सर्वांचे अभिनंदन केले असल्याचे कोयना जल विद्युत प्रकल्पाचे मुख्य अभियंता राजेश मोराळे यांनी शेवटी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahanirmiti Electricity Production