Maratha Kranti Morcha : मायणीत मोर्चा, ठिय्यानंतर आत्मक्लेष

संजय जगताप
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

एकीकडे आंदोलन संपल्याचे चित्र दृष्टीस येत असतानाच तरुणांच्या एका गटाने वडुजचा रस्ता धरला. तरुणांच्या त्या अनपेक्षित कृतीने सहायक पोलिस निरीक्षक संतोष गोसावीही अवाक् झाले.

मायणी (जि.सातारा) : मराठा समाजाच्या तरुणांनी मोर्चा, ठिय्या आंदोलनावर समाधान न मानता आत्मक्लेष आंदोलन 
करण्याचा निर्णय घेतला. समाजातर्फे आयोजित मोर्चा व ठिय्या आंदोलन संपताच त्यांनी 27 किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन वडुजच्या तहसिलदारांना निवेदन दिले. 

आरक्षणासह विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला येथे शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करुन मराठा समाजातर्फे येथील मुख्य रस्त्याने मराठा मोर्चास सुरवात झाली. त्यावेळी अतिशय मोठ्याने घोषणाबाजी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणांनी आसमंत दुमदुमुन गेला.

चांदणी चौकात मोर्चा आल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी तेथे ठिय्या 
मारला. त्याचवेळी तेथून निघालेले बीडचे युवा कीर्तनकार ह.भ.प. मोहन महाराज शेलार यांनी शिवचरित्रावर प्रबोधन केले. 
त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी मागण्यांचे निवेदन पोलिसांना दिले. मात्र, मोर्चातील सळसळत्या तरुणांच्या गटाने मागण्यांचे निवेदन तहसिलदारांनाच देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत मायणी ते वडूज हे सुमारे 27 किमीचे अंतर आत्मक्लेष करीत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते मार्गस्थही झाले. त्यामुळे पोलिसांची धावपळ झाली.

एकीकडे आंदोलन संपल्याचे चित्र दृष्टीस येत असतानाच तरुणांच्या एका गटाने वडुजचा रस्ता धरला. तरुणांच्या त्या अनपेक्षित कृतीने सहायक पोलिस निरीक्षक संतोष गोसावीही अवाक् झाले. त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुण त्यांच्या आत्मक्लेष आंदोलनावर ठाम होते. अखेर पर्याय नसल्याने पोलिसांनीही तरुणांच्या बरोबर वडूज रस्त्याने पायपीट करण्यास सुरवात केली.

दरम्यान, आज संपूर्ण बाजारपेठ बंद करून कडकडीत बंद पाळण्यात आला. शाळा काॅलेजही बंद असल्याने आज 
गावात चिटपाखरुही दृष्टीस आले नाही. रस्ते ओस पडले. आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी पुरेसी दक्षता घेतल्याने टायर जाळण्यासारखे प्रकार घडले नाहीत. परिसरातील सर्वच गावांत शांततेने बंद पाळण्यात आला.

Web Title: Maharashtra Bandh Maratha Kranti Morcha March in Mayani