
मुख्यमंत्री ठाकरे हे सीमाप्रश्न उकरून काढत देशाच्या एकतेला आव्हान देत आहेत
बेळगाव - कर्नाटक व्याप्त मराठी प्रदेश महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी कटीबध्द असल्याचे महाराष्ट्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेले व्यक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना चांगलेच झोंबले आहे. मराठी भाषक गुण्यागोविंदाने कर्नाटकात आहेत. पण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विनाकारण विषय उकरून काढत आहेत. त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या व्यक्तव्याचा निषेध करत असल्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी ट्विटवरून म्हटले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हुतात्मीदिनी (रविवारी) अभिवादनपर संदेश पाठविला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी प्राण पणाला लावणाऱ्या सीमालढ्यातील हुताम्यांना आजच्या दिनी विनम्र अभिवादन. त्याग आणि समर्पण आजही तेवत ठेवून लढ्यात धीराने व नेटाने सहभागी झालेल्या कुटुंबियांना मानाचा मुजरा करतो. कर्नाटकव्याप्त मराठी भाषक व सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटीबध्दता हीच सीमालढ्यातील हौताम्यांना अभिवादन ठरेल, असे म्हटले आहे. पण, यामुळे पोटशूळ उठलेल्या कर्नाटकाने आगपाखड सुरु केली आहे. महाजन अहवाल अंतिम असल्याचे तुणतुणे वाजविण्यास सुरवात केली आहे. सलग तीन ट्विट करून उध्दव ठाकरे यांच्या भुमिकेला आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला आहे.
मुख्यमंत्री ठाकरे हे सीमाप्रश्न उकरून काढत देशाच्या एकतेला आव्हान देत आहेत. महाजन अहवाल स्वीकारण्यात आल्यामुळे विषय संपला आहे. मराठी भाषिक कर्नाटकामध्ये गुण्यागोविंदाने राहत आहेत. पण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरे भाषिक तेढ वाढविण्याचा प्रयत्न करत असल्याचे येडियुराप्पा यांनी म्हटले आहे.
महाजन अहवाल अंतिम
सीमाप्रश्न संपलेला विषय असल्याचा साक्षात्कार माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधीपक्ष नेते सिध्दरामय्या यांना झाला आहे. आज ट्विटकरून त्यांनीही मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ जोळले. सीमाप्रश्न लढ्यात महाजन अहवाल अंतिम असल्याचे सांगत या विषयावर राजकारण नको. बेळगाव कर्नाटकाचा अविभाज्य भाग आहे. हा विषय सुटलेला आहे. तो परत उकरून काढला जाऊ नये, असे म्हटले आहे.
हे पण वाचा - जनता दलाला चार तर शेकाप पक्ष आघाडीला ३ जागा मिळाल्या
एक इंचही जागा देणार नाही
बेळगाव विषयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विनाकारण गोंधळ घालत आहेत. बेळगाव कर्नाटकाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे बेळगावची एक इंचही जागा महाराष्ट्राला देणार नसल्याची डरकाळी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी फोडली आहे. महाराजन अहवाल स्वीकारण्यात आल्यानंतर विषयाची इतिश्री झाली आहे. परंतु, महाराष्ट्र सरकार विनाकारण विषय उकरून काढून भावना भडकवत आहे. महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांकडून सीमाप्रश्नी मांडलेल्या विचारांचा निषेध करतो. राज्याच्या सीमा, भाषा व पाणलोट क्षेत्राच्या रक्षणासाठी आम्ही कटीबध्द आहेत, अशी प्रतिक्रिया जारकीहोळी यांनी दिली आहे.
संपादन - धनाजी सुर्वे