मराठी भाषिकांचा गुरुवारी महापालिकेवर विराट मोर्चा

मिलिंद देसाई
Wednesday, 20 January 2021

महापालीकेसमोर भगवा ध्वज फडकविला जाणार आहे

बेळगाव : सीमा लढ्याचा केंद्रबिंदू असणाऱ्या महापालीके समोर अनधिकृतरित्या फडकविण्यात आलेल्या लाल पिवळ्या ध्वजा विरोधात गुरुवारी (ता. 21) मराठी भाषिक रस्तावर उतरणार आहेत. तसेच सरदार्स मैदानापासून सकाळी 10,30 वाजता महापालीकेवर भव्य मोर्चा काढण्यात येणार असून यावेळी महापालीकेसमोर भगवा ध्वज फडकविला जाणार आहे. यासाठी मराठी भाषिकांनी  प्रचंड संख्येने सरदार्स मैदान, कॉलेज रोड येथे प्रचंड संख्येने जमावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकिकरण समितीच्यावतीने करण्यात आले आहे. 

महापालीका कार्यालयासमोर लावण्यात आलेला लाल पिवळा ध्वज हटविण्यात यावा अशी मागणी मध्यवती महाराष्ट्र एकिकरण समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन करण्यात आली होती. तसेच ध्वज न हटविल्यास भव्य मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र प्रशासनाने अद्याप ध्वज हटविलेला नाही. त्यामुळे मध्यवर्ती महाराष्ट्र एकिकरण समितीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये हजारो मराठी भाषिक भाग घेणार असून सरदार्स मैदान येथून मोर्चाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर चन्नम्मा सर्कल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाईल व त्यानंतर मोर्चाने महापालीकेवर जाऊन भगवा फडकविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोर्चाबाबत शहराच्या विविध भागात बैठका घेऊन जनजागृती करण्यात आली असून शहर, ग्रामीण भागासह खानापूर तालुक्‍यातुनही मोर्चात मोठ्‌या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार केला जात आहे. 

समितीसह शिवसेना, महिला आघाडी व इतर मराठी संघटनानी मोर्चाला जाहीर पाठींबा व्यक्‍त केला असून युवकांनी विविध प्रकारचे संदेश पाठवून देत सोशल मीडियावरुन मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे मोर्चात युवकांचा सहभाग अधिक प्रमाणात दिसून येणार आहे. 

हे पण वाचायेणाऱ्या काळामध्ये भाजप पक्ष दुर्बिणीमधून शोधण्याची वेळ येईल

 

मोर्चाच्या माध्यमातून मराठी भाषिकांची ताकत दिसून येणार आहे. यासाठी सर्वच भागात मोठ्‌या प्रमाणात जनजागृती करण्यात आली असून सर्वच ठिकाणी मोर्चाबाबत उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. मराठीनिष्ठा दाखवून देण्याची संधी मराठी भाषिकांनी दवडू नये. 
-दीपक दळवी, अध्यक्ष मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती 

मोर्चाचा मार्ग  
सरदार्स मैदान, कॉलेज रोड येथून सुरुवात त्यानंतर चन्नम्मा सर्कल, जिल्हाधिकारी कार्यालय, संगोळी रायण्णा मार्ग, आरटीओ सर्कल मार्गे महापालीका कार्यालय येथे सांगता
 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra ekikaran samiti protest