हुतात्मा संदीप सावंत कुटुंबियांना 50 लाखांची मदत

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 March 2020

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांच्यामार्फत धारातीर्थी पडलेल्या जवानांच्या कुटुंबियांना ही मदत देण्यात येणार असल्याचे मंत्रालयीन सूत्रांनी नमूद केले.

कराड : नाैशेरा सेक्टर जम्मू-काश्मीर येथे हुतात्मा झालेले मुंढे (ता.कराड) येथील जवान संदीप सावंत यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाच्यावतीने ५० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचा अध्यादेश शासनाने नुकताच काढला आहे. जवान संदीप सावंत हे 31 डिसेंबर 2019 मध्ये हुतात्मा झाले हाेते. 

सैन्यातील धारातीर्थी पडलेल्या महाराष्ट्रातील अधिकारी, जवान यांच्या विधवा, अवलंबितांना तसेच अपंगत्व प्राप्त झालेल्या अधिकारी व जवानांना आर्थिक मदत देण्याबाबत राज्य शासनाने नुकताच निर्णय घेतला आहे. यामध्ये कराड तालुक्यातील मुंढे येथील शहीद जवान नायक संदीप रघुनाथ सावंत यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय झाला आहे. त्याबाबतचा अध्यादेश नुकताच काढण्यात आला आहे. अध्यादेशानूसार श्रीमती स्मिता संदीप सावंत (वीरपत्नी) यांना ३० लाख रुपये, श्रीमती अनुसया रघुनाथ सावंत (विरमाता) यांना १० लाख रुपये तसेच रघुनाथ दामू सावंत (वीरपिता) यांना 10 लाख रुपये अशी एकूण 50 लाख रुपयांची वीरजवान संदीप सावंत यांच्या वारसांना आर्थिक मदत मिळणार आहे. 

सैनिक कल्याण विभागाने 26 फेब्रुवारी 2020 च्या पत्रान्वये शासनास सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील धारातीर्थी पडलेल्या जवानांच्या विधवा, व अवलंबिता आर्थिक मदत देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. धारातीर्थी पडलेल्या जवानाला एकूण १ कोटी रकमेपैकी 50 लाख इतकी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता कारगिल निधीतून घेण्यात आलेल्या व राष्ट्रीयकृत बँकेत सद्यस्थितीत गुंतवण्यात आलेला रकमेच्या व्याजातून अदा करण्यात यावी. तसेच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांच्यामार्फत धारातीर्थी पडलेल्या जवानांच्या कुटुंबियांना ही मदत देण्यात येणार असल्याचे मंत्रालयीन सूत्रांनी नमूद केले.

हेही वाचा : साताराचे जवान संदीप सावंत जम्मूत हुतात्मा

वाचा : Video : हुतात्मा संदीप सावंत यांच्या शाैर्याला साश्रुपूर्ण निराेप

वाचा : वीरपत्नीला मोबाईलपासून ठेवलेले दूर

जरुर वाचा : ब्रेकिंग : सातारकरांना टाेलमाफ हाेणार ? पालकमंत्र्यांचा पुढाकार

अवश्य वाचा : अजित पवार आणणार कराडला औद्योगिक कॉरिडोर ?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra State Government Helped Martyr Sandip Sawant Family