Video : हुतात्मा संदीप सावंत यांच्या शाैर्याला साश्रुपूर्ण निराेप

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 January 2020

जम्मू काश्‍मिरातील नौशेरा येथे घुसखोरांविरुद्ध आखलेल्या मोहिमेत दोन जवान हुतात्मा झाले. त्यात संदीप सावंत यांना वीरमरण आले. आज (शुक्रवार) त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कऱ्हाड : हुतात्मा संदीप सावंत अमर रहे...., वंदे मातरम..., भारत माती की जय..., पाकिस्तान मुर्दाबाद... अशा घोषणा देत देशभक्तीपर वातावरणात वीरमरण आलेल्या हुतात्मा संदीप रघुनाथ सावंत यांना अलोट जनसमुदायाच्या साक्षीने साश्रूपूर्ण नयनांनी आज (शुक्रवार) मुंढ्यात अखेरचा निरोप देण्यात आला. सैन्य व पोलिस दलाच्या पथकाने हवेत फैरी झाडून त्यांना शेवटची सलामी दिली.
 
आज सकाळी येथील विजय दिवस चौकात त्यांचे पार्थिव आणण्यात आले. तेथे नगराध्यक्षांसह मान्यवरांनी अभिवादन केल्यावर पुणे व बेळगाव येथील सैन्यदलाच्या तुकडीने मानवंदना दिली. विजय दिवस चौकापासून सजवलेल्या टेम्पोतून हुतात्मा संदिप यांची शोकयात्रा काढण्यात आली. यावेळी महाविद्यालयील युवक-युवतीसंह हजारो नागरीकांची उपस्थिती होती.

नक्की वाचा : हो...त्याने केले क्षणांत 50 हजार परत 

ध्वनीक्षेपकावर लावण्यात आलेल्या देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून गेले होते. कोल्हापूर नाका, गोटेमार्गे शोकयात्रा मुंढेत गेली. तेथून संदिप यांच्या घरासमोर पार्थिव ठेवण्यात आले. वीरपत्नी स्मिता, वीरमाता अनुसया, वडील रघुनाथ, भाऊ सागर यांच्यासह कुटुंबियांना शवपेटीतून संदिपचे पार्थिव दाखवण्यात आले. ते पाहताच सर्वांनी हंबरडा फोडला. त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांची मने हेलावून गेली. यावेळी वीरपत्नी स्मिता व वीरमाता अनुसया यांच्या रडण्याने अनेकांना अश्रू अनावर झाले.
 
यावेळी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन घेतले. संदिप यांच्या घरामागे काही अंतरावर असणाऱ्या त्यांच्या जागेत अंत्यसंस्काराची सोय केली होती. तेथेही नागरीकांची सकाळपासून गर्दी केली होती. लोक मिळेल त्या जागी बसून होते. घरापासून अंत्ययात्रा तेथे पोहचताच उपस्थितांनी पुन्हा "हुतात्मा संदिप सावंत अमर रहे'चा जयघोष केला.

भाऊ सागर याने भडाग्नी दिला

यावेळी कॅबिनेट मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार आनंदराव पाटील, पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार अमरदिप वाकडे, पोलिस उपअधिक्षक सुरज गुरव, पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्यासह जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करून पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

यावेळी वीरपत्नी, वीरमाता यांच्यासह कुटुंबातील सदस्यांनीही अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर सैन्य व पोलिस दलाच्या पथकाने मानवंदना देत हवेत प्रत्येकी तीन फैरी झाडून सलामी दिली. त्यानंतर भाऊ सागर याने भडाग्नी दिला. दोन महिन्याच्या तान्हुली रिया तेथेच होते. यावेळी "हुतात्मा संदिप सावंत अमर रहे'च्या घोषणांनी परीसर दणाणून गेला.

जरुर वाचा : Video : हुतात्मा संदीप सावंत यांच्या आठवणीने विजय दिवस चाैक गहिवरला
 
दरम्यान, हुतात्मा संदिप सावंत यांचे पार्थिव घरी आणण्यापूर्वी वीरमाता अनुसया यांची प्रकृती बिघडल्याने रूग्णवाहिकेसह डॉक्‍टरांनी तातडीने तेथे धाव घेतली. त्यानंतर पार्थिव घरी आल्यावर त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने डॉक्‍टरांना बोलावण्यात आले. त्यानंतर अंत्यसंस्काराच्या ठिकाणीही वीरमाता अनुसया यांना चक्कर आल्याने महिला डॉक्‍टरांनी त्यांच्यावर उपचार केले. 

...अन्‌ वीरमाता, वीरपत्नीने फोडला हंबरडा 

हुतात्मा संदिप यांना वीरमरण आल्याचे संदिप यांचे वडील व भाऊ यांनाच माहित होते. माहेरी आकाईची वाडीत असलेल्या वीरपत्नी स्मिता व वीरमाता अनुसया यांना त्याची माहिती देण्यात आली नव्हती. दोघींनाही आज सकाळ त्याबाबत कल्पना दिल्याचे सांगण्यात आले. आकाईवाडी येथे असलेल्या वीरपत्नी स्मिता यांना संदिप यांच्या वीरमरणाची बातमी कळू नये, यासाठी तेथील केबल कनेक्‍शन तोडून टाकण्यात आले तसेच त्यांचा मोबाईलही त्यांच्या भावाने घेवून दोन दिवस त्यांना मोबाईलपासून दूर ठेवले. आज सकाळी आकाईवाडीत बाहेरगावाहून नातेवाईक आल्यावर त्यांना संदिप यांना वीरमरण आल्याचे सांगताना त्यांनी हंबरडा फोडला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hutatma Sandip Sawant Amar Rahe