esakal | निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांच्या रजेच्या रकमेला 'ब्रेक'च

बोलून बातमी शोधा

null
निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांच्या रजेच्या रकमेला 'ब्रेक'च
sakal_logo
By
घनश्‍याम नवाथे

सांगली : आयुष्यातील 30 ते 35 वर्षे नोकरी 'प्रवाशांच्या सेवेसाठी' धावणाऱ्या एसटीमध्ये केल्यानंतर राज्यातील जवळपास 5 हजारहून अधिक निवृत्त कर्मचारी तीन वर्षापासून शिल्लक रजेच्या रकमेच्या प्रतिक्षेत आहेत. थकीत रकमेची प्रतिक्षा करताना काही अधिकारी व कर्मचारी मृतही झाले. निवृत्तीनंतर तुटपुंजी पेन्शन घेऊन कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना सर्वांची ससेहोलपट होऊ लागली आहे. त्यामुळे महामंडळाने आणखी प्रतिक्षा करायला न लावता तत्काळ रक्कम द्यावी अशी मागणी महामंडळाकडेकेली आहे.

राज्य परिवहनकडील कर्मचारी जवळपास 30 ते 35 वर्षे प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होत असतात. 'प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीदवाक्‍य सार्थ ठरवताना अनेकांना अपुऱ्या मनुष्यबळामुळे रजा उपभोगता येत नाहीत. हक्काची रजा उपभोगता येत नसल्यामुळे अनेकांच्या हक्काच्या रजा वापरात येत नाहीत. तरीही प्रामाणिकपणे नोकरी बजावताना दिसतात. प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होताना प्रत्येक कर्मचारी असो की अधिकारी उर्वरीत कौटुंबिक प्रवास करताना महामंडळाकडून येणाऱ्या रकमेची आकडेमोड करत असतो.

हेही वाचा: सांगलीत 1 मेपासून 18 वर्षावरील लसीकरण अशक्‍य; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

मुलांचे शिक्षण, लग्न, घर बांधणे, आई-वडीलांचे आजारपण आदी कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना आर्थिक स्थितीचा विचार आवश्‍यक ठरतो. तशातच एसटीतील निवृत्तीनंतर फक्त तीन हजार रूपयापर्यंतची पेन्शन मिळते. त्यामुळे भविष्यात कुटुंबाची गाडी व्यवस्थित मुक्कामापर्यंत नेण्यासाठी कसरत करावी लागते. महामंडळाकडून निवृत्त झाल्यानंतर भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युईटी, शिल्लक रजा यांची रक्‍कम तत्काळ देणे बंधनकारक आहे. परंतू 2018 पासून हे चित्र बदलले आहे. जून 2018 पासून निवृत्त अधिकारी व कर्मचारी यांना निवृत्तीनंतर शिल्लक रजेची रक्कम मिळाली नाही.

सध्याचा कोविड-19 चा संकटाचा काळ पाहिला तर अनेकांसमोर आर्थिक अडचणी आहेत. एसटीच्या निवृत्तांना पैशाची चणचण भासू लागली आहे. शिल्लक रजेची प्रत्येकाची किमान 3 ते 5 लाखांपुढील रक्कम जून 2018 पासून मिळाली नाही. हक्काच्या पैशासाठी अधिकारी, कर्मचारी यांना प्रशासनाच्या दरवाजाची घंटी वाजवावी लागते. परंतू वरिष्ठ कार्यालयांकडे बोट दाखवून निधीचे कारण सांगितले जाते. हक्काचे पैसे आज ना उद्या मिळतील या प्रतिक्षेत असलेल्या अनेकांचे दरम्यानच्या काळात निधन झाले. त्यांचे कुटुंबीयही रकमेच्या प्रतिक्षेत आहेत.

हेही वाचा: धक्कादायक! कोरोना उपचारास 4 ते 7 दिवसांचा विलंब ठरतोय मृत्यूचे मुख्य कारण

आणखी किती प्रतिक्षा

निवृत्त अधिकारी व कर्मचारी यांनी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांना निवेदन देऊन शिल्लक रजेच्या रकमेची मागणी केली आहे. आता शिल्लक आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी तातडीने निधी देण्यासाठी संबंधितांना आदेश द्यावेत अशी विनंती केली आहे.