esakal | धक्कादायक! कोरोना उपचारास 4 ते 7 दिवसांचा विलंब ठरतोय मृत्यूचे मुख्य कारण

बोलून बातमी शोधा

null

धक्कादायक! कोरोना उपचारास 4 ते 7 दिवसांचा विलंब ठरतोय मृत्यूचे मुख्य कारण

sakal_logo
By
अजित झळके

सांगली : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृत्यूचा आकडा वाढत असताना एक धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतर सरासरी चार ते सात दिवस विलंबाने रुग्ण कोरोना रुग्णालयात दाखल होत आहेत. हा काळच त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहे, असे मत जिल्ह्याचे कोरोना नोडल ऑफिसर डॉ. संजय साळुंखे यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी जिल्ह्यातील वाढती मृत्यू संख्या, डॉक्‍टरांची भूमिका आणि रुग्णांकडून होत असलेला हलगर्जीपणा यावर प्रकाश टाकला.

ते म्हणाले, 'कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतर डॉक्‍टरांनी तातडीने आरटीपीसीआर किंवा अँटीजेन तपासणीचा सल्ला दिला पाहिजे, वास्तविक या संकटात ती त्यांची प्राधान्याची जबाबदारी आहे. शहरी भागातील अपवाद वगळता जनरल प्रॅक्‍टिशनर्सकडून अशा रुग्णांना एचआरसीटी तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यानुसार पुढे उपचार केले जात आहेत. ग्रामीण भागातील खासगी डॉक्‍टर तपासणी न करताच उपचार सुरु ठेवत आहेत. त्यातूनही रुग्ण बरा होत नाही हे लक्षात आल्यानंतर पुढे कोरोनाची तपासणी आणि मग उपचार सुरु होत आहे. यामध्ये चार ते सात दिवसांचा कालावधी जात आहे. सध्या मृतांची संख्या आणि त्यांचा इतिहास पाहिल्यानंतर हेच प्रमुख कारण समोर येत आहे.'

हेही वाचा: कोकणात कोरोना नियंत्रणाचा 'दिगशी' फॉर्म्युला हिट

ऑक्‍सिजनचे ऑडिट

डॉ. साळुखे म्हणाले, 'काही रुग्णालयांमध्ये ऑक्‍सिजनचा अतिरिक्त वापर होत असल्याचे समोर आले आहे. त्याचे आता पुन्हा एकदा काटेकोर ऑडिट सुरु केले आहे. बांधकाम विभागाकडून स्ट्रक्‍चरल ऑडिट तर वैद्यकीय पथकाकडून मेडिकल ऑडिट सुरु आहे. काही ठिकाणी रुग्णाची प्रकृती स्थिर झाली असतानाही ऑक्‍सिजनचा वापर करून तो बेड अडवून ठेवला जात आहे. हे गंभीर आहे. त्याची आम्ही दखल घेतली असून योग्य ती कार्यवाही केली जाईल.'

रेमेडेसिव्हिरचा अतिरेक

डॉ. साळुंखे म्हणाले, 'रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनबाबत अतिरेक सुरु झालेला आहे. त्याला काही डॉक्‍टर आणि बहुसंख्य नातेवाईक कारणीभूत आहेत. पहिली लाट आली तेव्हा या इंजेक्‍शनचा फारसा वापर न करताही अनेकजण बरे झाले होते. आताही फार काही फरक नाही. मात्र त्या इंजेक्‍शनची खूप हवा झाली आहे. नातेवाईक दबाव टाकून त्याचा वापर करायला लावत आहेत. वास्तविक, खासगीत आता हे इंजेक्‍शन उपलब्धच नाही. त्यामुळे डॉक्‍टरांनी नातेवाईकांना या इंजेक्‍शनची चिठ्ठी लिहून देणे हेही चुकीचे आहे.'

हेही वाचा: बदामपासून घरीच तयार होणाऱ्या रेसिपी नक्की ट्राय करा