इचलकरंजी : प्रकाश आवाडे विजयी | Election Results 2019

संजय खूळ
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

इचलकरंजी शहराचा आर्थिक कणा असलेल्या वस्त्रोद्योगाच्या मुद्यावर गाजलेल्या या निवडणूकीत श्री. आवाडे यांनी घातलेल्या सादाला मतदारांनी प्रचंड प्रतिसाद देत त्यांना निवडून दिले. गेल्या दोन विधानसभा निवडणूकीत श्री. आवाडे यांना पराभव पत्करावा लागला होता.

इचलकरंजी - लक्षवेधी ठरलेल्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुरेश हाळवणकर यांचा तब्बल 49,810 मतांनी अधिक मतांनी पराभव करीत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी विजय मिळविला. आवाडे यांना 1,16,886 मते तर हाळवणकर यांना 67,076 इतकी मते मिळाली. 

शहराचा आर्थिक कणा असलेल्या वस्त्रोद्योगाच्या मुद्यावर गाजलेल्या या निवडणूकीत श्री. आवाडे यांनी घातलेल्या सादाला मतदारांनी प्रचंड प्रतिसाद देत त्यांना निवडून दिले. गेल्या दोन विधानसभा निवडणूकीत श्री. आवाडे यांना पराभव पत्करावा लागला होता. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला व इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

अनेकांच्यादृष्टीने हा राजकीय धक्का होता. अनपेक्षितपणे त्यांनी घेतलेला हा निर्णय या विधानसभा निवडणूकीत त्यांना कितपत तारणार याबाबतही शंका, कुशंका होत्या. कारण गेली 40 वर्षे आवाडे घराणे हात या चिन्हावरच निवडणूक लढवली आहे. परंतू त्यांनी घेतलेला हा निर्णय यशस्वी ठरला.

महाराष्ट्राची मँचेस्टर नगरी म्हणून नावलौकीक असलेल्या इचलकरंजी शहराचा आणि परिसराचा मुख्य आर्थिक कणा हा वस्त्रोद्योगावर अवलंबून आहे. या उद्योगाला गेल्या सात ते आठ वर्षात मोठी अवकळा आली आहे. त्यामुळे शहराचा आर्थिक कणाच मोडून गेला होता. त्यालाच थेट हात घालत श्री. आवाडे यांनी प्रत्येक कार्यकर्त्या आणि मतदारापर्यंत पोहचण्यासाठी या निवडणूकीत धडपड केली.

जाहीर सभा व मोठ मोठ्या मिरवणूका टाळत थेट कार्यकर्त्यांची भेटीगाठी आणि मतदारांना केलेले आवाहन अनेकांना भावनिक करणारे ठरले. मी माझ्यासाठी नव्हे तर या शहराच्या भवितव्यासाठी उभा आहे. अशा पध्दतीने केेलेले आवाहन अनेकांना आपलेसे वाटले. त्यामुळे यावेळची निवडणूक जनतेनेच हातात घेतली असे चित्र होते.

शहरातील वस्त्रोद्योग, पालिकेचे आयजीएम रूग्णालय शासनाकडे केलेले हस्तांतरण आणि पिण्याच्या पाण्यासाठी राबविण्यात येत असलेली वारणा योजना या मुद्यावरही ही निवडणूक गाजली. लोकांशी दैनंदिन जीवनाशी संबंधीत या विषयाला श्री. आवाडे यांनी थेट घातलेला हात चर्चेचा ठरला. गेली दहा वर्षे आमदार असलेले श्री. हाळणकर यांनी त्यांनी केलेल्या विकास कामाच्या मुद्यावर आणि देशातील भाजप सरकारच्या कारकिर्दीवर प्रचाराचा रोख ठेवला. या ठिकाणी त्यांनी अनेक नेत्यांच्या सभाही घेतल्या.

वस्त्रोद्योगाच्या कळीच्या मुद्यावर त्यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची सभा घेतली. स्मृती इराणी यांनीही श्री. आवाडे यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचा आरोप करीत यंत्रमाग उद्योजकांचे मन वळविण्याचे प्रयत्न केले. मात्र तेही फारसे पचणी पडले नाही. ग्रामीणसह शहरातील बहुतांश मतदान केंद्रावर श्री. आवाडे यांनाच मिळालेले मताधिक्य श्री. हाळवणकर यांच्या कामाबद्दल नाराजी स्पष्ट करणारी ठरली.

रस्ते, पाणी, आणि पालिकेच्या कारभाराबाबत असलेला असंतोष यावेळी स्पष्टपणे जाणवला. महापुराचा प्रचंड फटका यावेळी शहराला बसला. अशावेळी विद्यमान आमदारांनी केलेले दुर्लक्ष आणि श्री. आवाडे यांनी राबविलेले कृतीशील सहाय्य उपक्रम त्यांच्या पथ्याला पडले. श्री. आवाडे यांना तब्बल 50 हजारहून अधिक मताचे मताधिक्य देताना आता त्यांच्याकडून मतदारांच्या प्रचंड अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळे श्री. आवाडे यांना केंद्रात आणि राज्यात असलेल्या विरोधी पक्षाच्या सत्तेबरोबर संघर्ष करीत शहराच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election Kolhapur Ichalkaranji final result independent Prakash Awade won