तासगाव-कवठेमहांकाळ : सुमनताईंनी आबांचा गड राखला   | Election Results 2019 

Sumantai Patil vs Ajitrao Ghorpade
Sumantai Patil vs Ajitrao Ghorpade

तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील तब्बल 61 हजार मतांनी शिवसेना उमेदवार माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचा पराभव केला. 1995 सलग सहाव्यांदा तर मतदारसंघ पुनर्रचनेनंतर तिसऱ्यांदा आर.आर. आबा गटाने आपला गड राखला. तर ऐनवेळी मतदारसंघ सेनेकडे गेल्यामुळे शिवबंधनात अडकलेल्या घोरपडेला विजयाचे धनुष्य पेलता आले नाही. 

आबांनी 2014 च्या निवडणुकीत 23000 मतांनी भाजपचे अजितराव घोरपडे यांचा पराभव केला होता. आबांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत सुमनताई निवडून आल्या. परंतु त्यांची पहिलीच सार्वत्रिक निवडणूक होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसची प्रतिष्ठा आणि ताकत पणाला लागली होती. भाजपच्या लाटेत काय होणार? याबद्दल अखेरच्या क्षणापर्यंत कयास बांधले जात होते. मात्र मतमोजणीत सुमनताईंचे मताधिक्‍य पाहून आश्‍चर्य करण्याची वेळ आली. काही मतदान केंद्राचा अपवाद वगळता त्यांना मताधिक्‍य मिळत ते थेट 61 हजारावर जाऊन थांबले. आबांच्या 2009 च्या मताधिक्‍यापेक्षा अधिक मते त्यांना मिळाले.

भाजपच्या लाटेत राष्ट्रवादीचा किल्ला ढासळण्याची भीती असताना सुमनताईंनी तो नेटाने लढवला. निवडणुकीतील वैशिष्ट्य म्हणजे आबांचे सुपुत्र रोहित पाटील यांची सक्रीय राजकारणात एंट्री म्हणावी लागेल. त्यांची क्रेझ युवावर्गाला राष्ट्रवादीकडे खेचण्यास महत्वपूर्ण ठरली. रोहित यांनी प्रचाराची दिशाच बदलली. त्याने भाषणातून सर्वांना आबांची आठवण करून दिली. तसेच 2024 च्या निवडणुकीत रोहित उमेदवार असेल असे थेट शरद पवार यांनी वक्तव्य केल्याने मोठा फायदा झाला. 

तशी ही निवडणूक सुमनताई यांच्यासाठी कधीच सोपी नव्हती. विस्कळीत राष्ट्रवादी! शिवाय मानापमान सांभाळणे अवघड होते. त्यात शिवसेनेचे माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले होते. ऐनवेळी मतदारसंघ सेनेच्या वाट्याला गेला तरी भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी ताकद सेनेच्या बाजूने उभी केली होती. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपची ताकद घोरपडेंच्या पाठीशी होती. घोरपडे यांनी भाजपमधून ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश करण्यामागे भाजपची रणनीती होती.

शिवसेनेकडे मतदारसंघ गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच शिवबंधन बांधले होते. निवडणुकीसाठी दाखल करतेवेळी केलेल्या शक्तिप्रदर्शनातून राष्ट्रवादीला धडकी भरवली होती. त्यामुळे राष्ट्रवादीने आस्ते कदम पावले टाकण्यास सुरवात केली होती.

त्यातच कवठेमहांकाळ तालुक्‍यातून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला अजितराव घोरपडे रोखणार, अशी हवा तयार झाली होती. कवठेमहांकाळ तालुक्‍यात त्यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे भावनिक आवाहन केले होते. मात्र अखेरच्या तीन-चार दिवसांमध्ये वातावरण बदलले. घोरपडे यांचे एकेक शिलेदार त्यांना कधी सोडून गेले हे कळलेच नाही. शेवटी-शेवटी खासदार गटानेही "नरो वा कुंजरोवा' अशी भूमिका घेतली. परिणामी अजित घोरपडेंना धनुष्य पेलता आले नाही. सलग दुसऱ्यांचा पराभव चाखावा लागला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com