Vidhan Sabha 2019 : पृथ्वीराज चव्हाण लोकसभेसाठी की विधानसभेसाठी?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 September 2019

सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकी-साठी राष्ट्रवादीकडून उदयनराजेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी आग्रह सुरू आहे; पण पृथ्वीराज चव्हाणांनी त्यास होकार दिलेला नाही. आमदार चव्हाण दोन दिवसांपासून पक्षाच्या बैठकीसाठी दिल्लीत होते. त्यादरम्यान, काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनीही लोकसभेसाठी त्यांना आदेश दिल्याचे सूत्रांकडून समजत आहे. त्यानुसार आघाडीतील नेत्यांना त्यांच्या होकाराची अपेक्षा आहे. त्यामुळे श्री. चव्हाण आपल्या कार्यकर्त्यांचा उद्या (रविवारी) हॉटेल पंकजमध्ये दुपारी एक वाजता संवाद मेळावा घेऊन भूमिका मांडणार आहेत. आजपर्यंत आमदार चव्हाण यांनी वारंवार दक्षिणेतून लढण्याचे संकेत दिले आहेत. चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच सातारा लोकसभा लढावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

विधानसभा 2019 : सातारा - विधानसभा निवडणुकीसह लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी जिल्ह्यातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. युतीचे भवितव्य घटस्थापनेच्या मुहूर्तावर निश्‍चित होईल, याकडे जिल्ह्यातील शिवसेना, भाजप नेत्यांच्या नजरा खिळल्या आहेत, तर सातारा लोकसभा की विधानसभा याबाबत पृथ्वीराज चव्हाण उद्या (रविवारी) आपल्या समर्थकांचा कौल घेऊन निर्णय देणार आहेत. त्याशिवाय माण- खटावसाठी सर्वपक्षीय आघाडीचे अद्याप एकमत झाले नसून, त्यांचाही सर्वमान्य उमेदवार उद्याच जाहीर होईल, अशी शक्‍यता आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली आहे; पण पितृपंधरावड्यामुळे कोणीही अर्ज दाखल केलेला नाही. सोमवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरवात होईल, तसेच युतीचीही घोषणा उद्याच (घटस्थापनेदिवशी) होण्याची शक्‍यता असल्याने जिल्ह्यातील शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांच्या नजरा त्याकडे लागल्या आहेत. 

युती झाली तर कोणते मतदारसंघ भाजप मागेल, याचा अंदाज शिवसेनेचे पदाधिकारी घेऊ लागले आहेत. सध्या साताऱ्यात शिवसेनेकडे सहा आणि भाजपकडे दोन अशी विभागणी आहे; पण युतीत काही मतदारसंघांची अदलाबदल होणार आहे. त्यानुसार साताऱ्यातील कोणते मतदारसंघ भाजपकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यावरच भाजपमधून इच्छुक असलेल्यांचे भवितव्य ठरणार आहे. 

ठरलेलं आज कळणार...
माण-खटावमधील आमचं ठरलंय या सर्वपक्षीय आघाडीचा उमेदवाराबाबत एकमत झालेले नाही. सध्या अनिल देसाई, रणजित देशमुख आणि माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख या तिघांची नावे पुढे आहेत. गेल्या तीन- चार दिवसांपासून साताऱ्यातील हॉटेल प्रीती येथे या आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांची खलबते सुरू होती; पण त्यांना एकमत घडविण्यात यश आलेले नाही. आज दिवसभर प्रभाकर देशमुख यांचे नाव निश्‍चित होणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, आघाडीतील नेत्यांनी त्यास दुजोरा दिला नाही. त्यामुळे उद्या (रविवारी) दुपारपर्यंत एकमत घडवून माण-खटावचा सर्वपक्षीय आघाडीचा उमेदवार जाहीर होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra VidhanSabha 2019 Prithviraj Cahavan Loksabha Politics