महात्मा गांधी जयंती विशेष : बाबुराव पेंटर यांनी साकारलेला 30 फुट उंच पुतळा

महात्मा गांधी जयंती विशेष : बाबुराव पेंटर यांनी साकारलेला 30 फुट उंच पुतळा

कोल्हापूर - वरुणतीर्थ वेस, गांधी मैदान असे भरभक्कम नाव आज या परिसरास असले; तरी ‘तळे’ म्हणूनच या परिसराची जुनी ओळख अजूनही कायम आहे. या मैदानात रोज तरुण फुटबॉल खेळतात; पण मैदान असे न म्हणता ‘तळ्यात फुटबॉल खेळतो’ असेच म्हणतात. तर अशा या तळ्यात १९५४ मध्ये देशातला सर्वांत उंच म्हणजे चबुतऱ्यासह ३० फूट उंच असा महात्मा गांधींचा पुतळा उभा केला गेला. महात्मा गांधी राष्ट्रपुरुष म्हणून तर मोठेच; पण या पुतळ्याच्या उभारणीसही बाबूराव पेंटर यांसारख्या दिग्गज शिल्पकाराचा हात लागला. किंबहुना त्यांच्या हयातीत त्यांनी केलेला हा अखेरचा पुतळा ठरला. 

वरुणतीर्थ मैदानाला बऱ्यापैकी आकार आला असला; तरीही ६० ते ६५ वर्षांपूर्वी हा परिसर शब्दशः तळ्याचा होता. पावसाचे पाणी या तळ्यात साठायचे; म्हणून या तळ्याचे नावही वरुणतीर्थ असेच होते. पावसाने भरलेले हे तळे पुढील चारपाच महिने भरलेले असायचे. 

हळूहळू विरले जायचे; मग या तळ्यातील हिरवागार खुरटा चारा या परिसरातील दूध- दुभत्यासाठी पाळलेल्या म्हशींसाठी मोकळे रान बनून जायचा. या तळ्यात मुले खेळायची. तळ्याच्या चारही बाजू खुल्या. 

१९४८ मध्ये महात्मा गांधी यांची हत्या झाली. कोल्हापुरात त्याचे पडसाद उमटले. त्याचे निमित्त करून प्रजा परिषदेचे कोल्हापूरचे बागल मंत्रिमंडळ बरखास्त केले; पण त्यानंतर काही दिवसांनी कोल्हापुरात माधवराव बागल यांच्या पुढाकाराने एक बैठक होऊन, महात्मा गांधींचा त्या वेळच्या तुलनेत देशातील पहिला सर्वांत उंच पुतळा कोल्हापुरात उभे करायचे ठरले. या पुतळ्याची जबाबदारी ज्यांनी चित्रपटनिर्मितीसाठी पहिला भारतीय बनावटीचा कॅमेरा तयार केला, असे दिग्गज शिल्प व तंत्रकार बाबूराव पेंटर यांच्याकडे सोपवली. 

बाबूराव पेंटर हे देशातील नामवंत शिल्पकार होत. त्यांनी काम हाती घेतले; पण पुतळ्याची भव्यता व काम पूर्ण करण्याचा कालावधी याचा मेळ जमेना. पुतळ्याचे ब्रांझमध्ये ओतकाम करताना असंख्य अडचणी आल्या. पुतळ्याचा खर्चही वाढत गेला. छत्रपती राजाराम महाराजांनी त्या काळी २५ हजारांचा निधी दिला. पुतळ्याचे काम पूर्ण करताना भाई बागल व शिल्पकार पेंटर यांच्यात मतभेदाचे अनेक मुद्दे तयार झाले; पण खूप कसरत करून पुतळ्याचे काम पूर्ण केले व तळ्यात (वरुणतीर्थ मैदान) मध्यभागी हा पुतळा उभा केला.

भाऊसाहेब हिरे, जिल्हाधिकारी ए. यू. शेख यांच्या उपस्थितीत पुतळ्याचे अनावरण झाले. चबुतऱ्याखाली चंदनाच्या पेटीत घालून, महात्मा गांधींच्या अस्थी ठेवल्या व पुतळा उभा राहिला; 
पण काही वर्षांनी (१९७० मध्ये) हा पुतळ्या मधल्या जागेतून हलवून पश्‍चिमेच्या बाजूला उभा केला. आज हा पुतळा त्याच जागी आहे. मध्यंतरी हा पुतळ्याचा परिसर म्हणजे रस्सा मंडळासाठी हक्काची जागा झाली होती. पुतळ्याखाली बसून लोक मद्यपान करीत होते. आपण एका राष्ट्रपुरुषाच्या पुतळ्याजवळ बसून मद्यपान करतो, यात कोणालाही चुकीचे काही वाटत नव्हते. 

या प्रकाराची खूप चर्चा झाली. रात्री पोलिसांची गस्त सुरू झाली व पुतळा परिसरातील रस्सा मंडळांचे प्रमाण कमी झाले. पुतळ्याभोवती शोभेची झाडे आणि दिवे लावले; पण गांधी पुतळ्याला हार या जयंतीला ते पुढच्या जयंतीला घातला जाऊ लागला. आज या मैदानाचे नामकरण वरुणतीर्थ वेस, गांधी मैदान असे झाले आहे. 

जयंतीसाठी रीघ, पुन्हा वर्षभर पुतळा एकटाच
सर्व राजकीय पक्षांच्या सभेचे हे हक्काचे ठिकाण आहे. डाव्यापासून उजव्यापर्यंत सर्व पक्षांचे नेते याच मैदानात सभा घेतात. पूर्वी सभेचे किंवा वक्‍त्याचे तोंड गांधी पुतळ्याच्या दिशेला असायचे, आता गांधी पुतळ्याकडे पाठ करून सभा घेण्याची पद्धत सुरू झाली आहे. गांधी विचाराकडे सर्वांनी कशी पाठ फिरवली आहे, याचेच हे उदाहरण आहे. आता उद्या या पुतळ्याला हार घालण्यासाठी रीघ लागणार आहे; पण परवापासून गांधी पुतळा पुन्हा वर्षभरासाठी एकटाच असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com