एकीला पुढे,दूसरीला मागे असे चालत नाही;पवारांची मिश्किल टिप्पणी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 1 February 2020

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वाई येथील विभागीय शाखेच्या इमारतीचे उद्घाटन श्री. पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, विक्रमसिंह पाटणकर, शशिकांत शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदिप विधाते आदी उपस्थित होते. 

वाई (जि. सातारा) : राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन करण्यात आले. यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा सहभाग आहे. यापूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आघाडी सरकार होते. त्यावेळी एक पक्ष सांभाळताना नाकी नऊ आले होते. आता तर महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत. तिघींना घेऊन संसार करायचा असेल तर एकीला पूढे तर दूसरीला मागे ठेवून चालत नाही. सर्वांना बराेबर घेऊन चालावे लागते, अशी मिश्किल टिप्पणी खासदार शरद पवार यांनी येथे केली.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वाई येथील विभागीय शाखेच्या इमारतीचे उद्घाटन श्री. पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार पवार म्हणाले, सध्याच्या घडीला एकीला घेऊन संसार चालवणे किती अवघड असते. इथं तर तिघीना घेऊन संसार चालवायचा आहे. सध्या तरी सगळं सुरळीत चाललं आहे. पवार यांच्या या वक्तव्यावर वाईकरांनी जाेरदार टाळ्यांचा कडकडाट केला.
 
Video : मुंबईनंतर यांनाही हवी नाईट लाईफ

दरम्यान शेतक-यांच्या प्रश्नावर कर्जमाफी हा कायमस्वरूपी उपाय नाही. सातारा जिल्ह्यात थकबाकीदारांपेक्षा नियमित कर्जफेड करणा-यां शेतक-यांची संख्या मोठी आहे. अशा शेतक-यांवर अन्याय होतो. यावर शासनाने योग्य विचार करायला हवा. सहकाराच्या माध्यमातून सामान्य शेतक-यांना स्वयंपूर्ण करून स्वतःचा पायावर उभे करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा असे नमूद केले. 

श्री. पवार म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या जिल्हा बँकेचे स्व. किसन वीर, विलासकाका पाटील, लक्ष्मणराव पाटील यांच्या सारख्या सहकारधुरीणांनी नेतृत्व केले. स्थापनेपासूनच त्यांनी बँकेचा कारभार स्वच्छ, पारदर्शकपणे व कडक शिस्तीने करण्याची दिशा दिली. घेतलेला पैसा परत केल्याशिवाय कोकणातील लोकांना जशी झोप लागत नाही. तशीच सातारा जिल्ह्यातील सामान्य शेतक-यांनी नियमित कर्जफेड करण्याची शिस्त कायम जोपासली. विविध पक्षाचे आणि वगेवेगळ्या विचारांचे लोकांनी जिल्हा बँकेचे नेतृत्व करताना सहकारात काम करताना राजकारणाचे जोडे बाजूला ठेवल्यानेच आज जिल्हा बँक हिदुस्थानात प्रथम क्रमांकावर आहे. 

हेही वाचा - शिवेंद्रसिंहराजेंनी उठवला अजित पवारांपूढे जाेरदार आवाज

उपाध्यक्ष सुनील माने, संचालक नितीन पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी वाई पंचायत समिती, नगरपालिका, बाजार समिती यांच्यावतीने शरद पवार, पालक मंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदिप विधाते आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे यांनी स्वागत केले. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले. प्रभाकर घार्गे यांनी आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahavikas Agahadis Government Is Successfully Working In Maharashtra Says Sharad Pawar