महिंद धरणावर मजबुतीकरणाचे ‘मिशन जॅकेटिंग’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

ढेबेवाडी - तोंडावर आलेला पावसाळा आणि अधून-मधून उभ्या राहणाऱ्या धरणग्रस्तांच्या आंदोलनामुळे महिंद धरणाच्या जॅकेटिंगचे काम वेळेत पूर्ण करून धरण वाचविण्याचे मोठे आव्हान पाटबंधारे विभागासमोर आहे. या कामासाठी धरणाच्या सांडव्याची भिंत दोन्ही बाजूंनी खोदून मोकळी केल्याने बांधकाम अपूर्ण राहिल्यास किंवा वळिवाच्या पावसाने पाणीपातळीत मोठी वाढ झाल्यास धरण फुटण्याचीही भीती आहे.

महिंदजवळील वांग नदीवर ८५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमतेचे धरण आहे. २००० मध्ये त्याची घळभरणी झाली. ३७.३४ हेक्‍टरचे बुडित क्षेत्र असलेल्या या धरणाखालील लागवडीखालील क्षेत्र ३६२ हेक्‍टर असून लाभक्षेत्रात नदीवर चार ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधून धरणातून सोडलेले पाणी अडविण्यात येते. धरणाला १०४ मीटर लांबीचा मुक्त पद्धतीचा सांडवा आहे. डोंगर भागातून येणारे अनेक ओढे व नाले धरणाला मिळत असल्याने पावसाळ्याच्या पहिल्या टप्प्यातच धरण तुडुंब भरते. अलीकडे काही वर्षांपासून सांडव्याच्या दगडी भिंतीची पडझड झाल्याने दुर्घटना घडण्याची भीती होती. याप्रश्‍नी लोकप्रतिनिधी, संघटना आणि माध्यमांनी आवाज उठविल्यानंतर भिंतीच्या जॅकेटिंगच्या कामाला मंजुरी देण्यात आली.

त्यासाठी विशेष दुरुस्तीअंतर्गत ७४ लाख ११ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून सध्याची सांडव्याची भिंत तशीच कायम ठेवून तिच्या दोन्ही बाजूंनी एक-एक फूट जाडीची दुसरी स्वतंत्र आरसीसी भिंत उभारण्यात येत आहे. सुमारे १०४ मीटर लांब आणि सरासरी सात मीटर उंचीची ही भिंत असेल. महेश पाटील ॲन्ड कंपनीने बांधकामाचा ठेका घेतला असून पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्यासाठी कंपनीची धडपड सुरू आहे.

जॅकेटिंगमुळे धोका दूर होवून धरणाचे आयुष्य वाढणार आहे. त्याशिवाय धरणाला गेटमधून असलेली गळतीही यावेळी काढण्यात येणार असल्याने पाणीसाठ्यात चांगली वाढ होईल.

पावसाळा तोंडावर असल्याने वेळेत जॅकेटिंगचे काम पूर्ण करण्याचे मोठे आव्हान असले तरी योग्य नियोजन केल्यामुळे ते निर्धारित वेळेत मार्गी लागेल. सध्या दिवस-रात्र हे काम सुरू आहे.
- महेश पाटील, ठेकेदार

Web Title: mahind dam mission jacketing