आटपाडी पश्‍चिमेत मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान

हमीद शेख
Saturday, 3 October 2020

आटपाडी तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी (ता. 30) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे काढणी झालेल्या व काढणी न झालेल्या पिकांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे.

खरसुंडी : आटपाडी तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी (ता. 30) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे काढणी झालेल्या व काढणी न झालेल्या पिकांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. हातात आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने बळीराजा हतबल बनला. स्थानिक ओढ्यांना धो-धो पाणी वाहू लागले आहे. 

तालुक्‍यात चार ते पाच दिवस पावसाने उसंत घेतली होती. बुधवारी सायंकाळी सातनंतर जोरदार पावसाने सुरवात केली. रात्री सुरू झालेल्या पावसाने सकाळी सातला उघडीप दिली. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नालाबांध पाझर तलाव तुडुंब भरून सांडव्यातून धो-धो वाहू लागले. पश्‍चिम भागातील सर्वच स्थानिक ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. बांध व बंधारे सर्वच तुडुंब पाण्याने भरले. यंदा जो पाऊस झाला, तसा आजपर्यंत झालेला नव्हता. खरिपाची पिके काही प्रमाणात काढण्यात आली; तर काही ठिकाणी काढणी सुरू आहे. पाऊस सारखाच येत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्या. जशी पाऊस उघडीप देईल त्या प्रमाणात काही शेतकऱ्यांनी काढणी केली आहे. अजून बरीचशी पिके रानातच आहेत. पावसाची उघडीप मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. अत्यंत चांगल्या प्रकारे खरिपाची पिके हाता-तोंडाशी आलेली असताना, पावसामुळे बळीराजा हतबल बनत चालला आहे. 

सध्या काढणी झालेल्या पिकाची मळणी सुरू आहे. त्यांनाही पावसामुळे मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. त्याचबरोबर सध्याच्या स्थितीत पावसाची गरज नसताना निसर्गाच्या स्थितीमुळे पाऊस होतो. रब्बी हंगाम साधण्याकरिता पावसाच्या उघडिपीची गरज आहे. त्यांनाही अडचणी येऊ लागल्या आहेत. पश्‍चिम भागातील सर्वच स्थानिक नालाबांध पाझर तलाव सिमेंट बंधारे व साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. बंधारे भरून सांडव्यातून पाणी मोठ्या प्रमाणात वाहू लागले. शेतकऱ्यांच्या शेतात असणारे बांध-बंधारेही सध्या पाण्याने भरले आहेत. 

बळीराजाच्या चिंतेत वाढ 
पावसाने उघडीप न दिल्यास आलेल्या पिकांचे नुकसान, तर रब्बी हंगाम वेळेत साधणे शक्‍य नाही. सध्या कोणत्याच जमिनीत शेतकऱ्यांना जाणे शक्‍य नाही; तर काही पिके पावसामुळे पाण्यात आहेत. पाऊस जास्त प्रमाणात झाल्याने जमिनींना पाझर फुटला. पावसाचे वातावरण बदलत नसल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Major crop damage due to torrential rains in Atpadi West