मल्हार क्रांतीचा गुरुवारी फलटणला एल्गार

संदीप कदम
सोमवार, 24 एप्रिल 2017

मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी अर्ज दाखल करण्याचे अभिनव आंदोलन

फलटण (सातारा) : देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्‍वासनानुसार धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दाखल द्यावा, या मागणीचे अर्ज दाखल करण्याचे अभिनव आंदोलन गुरुवारी (ता. 27) फलटण येथे होणार आहे. मल्हार क्रांतीच्या या दुसऱ्या एल्गारात जिल्हा तसेच परजिल्ह्यातून समाजबांधव मोर्चात सहभागी होणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी अर्ज दाखल करण्याचे अभिनव आंदोलन

फलटण (सातारा) : देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्‍वासनानुसार धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दाखल द्यावा, या मागणीचे अर्ज दाखल करण्याचे अभिनव आंदोलन गुरुवारी (ता. 27) फलटण येथे होणार आहे. मल्हार क्रांतीच्या या दुसऱ्या एल्गारात जिल्हा तसेच परजिल्ह्यातून समाजबांधव मोर्चात सहभागी होणार आहेत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यासाठी समाजाने पंढरपूर ते बारामती अशी पदयात्रा काढून तत्कालीन सरकारचे लक्ष वेधून घेतले होते. तसेच बारामती येथे आमरण उपोषण केले होते. त्या वेळी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे व रासपचे महादेव जानकर आंदोलनस्थळी आले होते. त्या वेळी सरकार आल्यास पहिल्या कॅबिनेट बैठकीत 15 दिवसांच्या आत धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेशाची अंमलबजावणी केली जाईल, अशी घोषणा केली होती. त्यावर संपूर्ण राज्यातील धनगर समाज प्रभावित झाला होता. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरही झाला. मात्र, सत्तेवर येऊन अडीच वर्षे झाली, तरी मुख्यमंत्र्यांनी आपल्या आश्‍वासनाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे राज्यातील धनगर समाजामध्ये फसवणुकीची भावना निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्र्यांना आश्‍वासनाची जाणीव करून देण्यासाठी व आरक्षणाची लढाई पुन्हा सुरू करण्यासाठी धनगर समाज मल्हार क्रांतीच्या झेंड्याखाली एकवटत आहे. त्यासाठी एसटी दाखला मागणी अर्ज दाखल करण्याचे अभिनव आंदोलन राबविले जात आहे. 16 मार्च रोजी दहिवडी येथे पंढरपूर व नागपूरनंतर राज्यातील तालुका पातळीरचा सर्वांत मोठा मोर्चा काढण्यात आला. यात विशेषत: महिलांच्या हाती नेतृत्व देण्यात आले होते. कोणताही पक्ष व संघटना न पाहता संपूर्ण धनगर समाज एकवटला होता.

आबालवृद्धही मोर्चाच्या तयारीत
मल्हार क्रांतीचे समन्वयक गेल्या महिन्यापासून तालुक्‍यातील प्रत्येक गावात फिरून भूमिका मांडत आहेत. त्यांना नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. विशेषत: युवक, युवती व महिलांनी मोर्चात उतरण्याचा निर्धार केला आहे. आबालवृद्धही मोर्चाच्या तयारीत गुंतले आहेत. गावागावांतून जास्तीत जास्त लोकांची मोर्चात सहभागी होण्यासाठी चढाओढ लागली आहे.

Web Title: malhar kranti in phaltan