नाचणी ते तांदूळ, ऊस रस ते ज्यूसपर्यंत सर्व काही!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

सातारा - बचतगटांच्या कष्टातून तयार झालेल्या आकर्षक कलात्मक वस्तू, नाचणीपासून तांदळापर्यंत, उसाच्या रसापासून आवळा ज्यूसपर्यंत, बिर्याणीपासून ते गुळाच्या काकवीपर्यंत आणि सुंदर आभुषणांपासून ते घोंगड्यापर्यंत एवढेच नव्हे, तर सुकट बोंबीलपासून खेकड्यांपर्यंत वस्तू आणि पदार्थ ‘मानिनी जत्रा २०१६’ च्या माध्यमातून पाहण्याची आणि त्याचा आस्वाद घेण्याची संधी नागरिकांना मिळाली असून, त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

सातारा - बचतगटांच्या कष्टातून तयार झालेल्या आकर्षक कलात्मक वस्तू, नाचणीपासून तांदळापर्यंत, उसाच्या रसापासून आवळा ज्यूसपर्यंत, बिर्याणीपासून ते गुळाच्या काकवीपर्यंत आणि सुंदर आभुषणांपासून ते घोंगड्यापर्यंत एवढेच नव्हे, तर सुकट बोंबीलपासून खेकड्यांपर्यंत वस्तू आणि पदार्थ ‘मानिनी जत्रा २०१६’ च्या माध्यमातून पाहण्याची आणि त्याचा आस्वाद घेण्याची संधी नागरिकांना मिळाली असून, त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर कालपासून बचतगटांच्या महिलांची ‘मानिनी जत्रा २०१६’ सुरू झाली आहे. आज तिसऱ्या दिवशीही नागरिकांनी जत्रेला गर्दी केली होती. या जत्रेला जिल्ह्यातील आणि इतर जिल्ह्यांतील बचतगटांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील त्याचप्रमाणे पुणे, नगर, सांगली, कोल्हापुरातील महिलांनीही आपले स्टॉल उभारले आहेत. प्रत्येक बचतगटाने आपल्या उत्पादनात आपल्या भागाचे वैशिष्ट्य जपले आहे. जावळी तालुक्‍यातील महिलांनी नाचणीच्या पापडापासून ते अगदी करवंदाच्या लोणच्यापर्यंत वस्तू व पदार्थ मांडले आहेत. अगदी हातसडीचा इंद्रायणी तांदूळही त्यांनी उपलब्ध करून दिला आहे. त्याचप्रमाणे माण तालुक्‍यातील बचत गटाने दर्जेदार घोंगडी, जेनही प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे. 

महिला केवळ पापड लोणच्यात अडकून पडलेल्या नाहीत, तर त्यांनी अगदी इमिटेशन ज्वेलरी, काचेच्या आकर्षक बांगड्या, दिवाणखान्यातील शोभेच्या वस्तू, पर्स, गाऊन, साड्याही प्रदर्शनामध्ये विक्रीसाठी मांडल्या आहेत.

अनेक बचतगटांनी खाद्यपदार्थांचे स्टॉल मांडले आहेत. खवय्यांचा त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. एका बचतगटाने मातीच्या आकर्षक वस्तू मांडल्या आहेत. महिलांनी हाताने तयार केलेल्या या वस्तू नागरिक आवर्जून घरी नेत आहेत. घरच्या उखळात केलेल्या विविध प्रकारच्या चटकदार चटण्या, मिरचीचा ठेचा, उसाचा ताजा रस, खमंग भजी, विविध प्रकारचे वडे, सेंद्रिय काकवी यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. ज्योतिष आणि जडीबुटीचा स्टॉलही गर्दी खेचत आहे.

बिर्याणीला प्रतिसाद 
बचत गटांच्या शाकाहारी आणि मांसाहारी बिर्याणीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या स्टॉलवर आज सकाळी अगदी 
झुंबड उडाली होती. त्याबरोबरच अनेक बचतगटांनी मटण भाकरी, खेकड्याचे कालवण अशा सामिष भोजनाचीही व्यवस्था केली 
आहे. नागरिकांच्या प्रतिसादाबरोबर दादही मिळत असल्याने बचतगटांच्या महिलांचा उत्साह वाढत आहे. 

तनिष्का गटाच्या सदस्यांचाही सहभाग
साताऱ्यातील तनिष्का गटाच्या सदस्यांनीही विविध प्रकारचे पापड, चटण्या, लोणचे, सांडगे आणि इतर वस्तू विक्रीचा स्टाल उभारला आहे. मानिनी जत्रेत येणाऱ्या सर्व महिला आवर्जून या स्टॉलला भेट देत आहेत. चविष्ट पापड आणि चटण्या प्राधान्याने खरेदी करत आहेत. 

Web Title: manini jatra 2016