मनीषा फुले, दीपक घाटे यांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

सोलापूर - तत्कालीन समाज कल्याण अधिकारी मनीषा देवेंद्र फुले (वय 47 रा. बिबवेवाडी पुणे) व दीपक भास्करराव घाटे (49 रा. विश्रामबाग, सांगली) यांना सोलापूर पोलिसांनी आज अटक केली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोघांना नऊ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

सोलापूर - तत्कालीन समाज कल्याण अधिकारी मनीषा देवेंद्र फुले (वय 47 रा. बिबवेवाडी पुणे) व दीपक भास्करराव घाटे (49 रा. विश्रामबाग, सांगली) यांना सोलापूर पोलिसांनी आज अटक केली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोघांना नऊ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

येथील पूजा मागासवर्गीय निटींग व गारमेंट औद्योगीक उत्पादक सहकारी संस्था ही व्यंकटेश रामचंद्र आसादे यांची आहे. त्यांनी व संस्थेच्या दहा संचालकांनी शासनाकडून दोन कोटी नऊ लाख पाच हजार रुपये आर्थिक सहाय मिळविले. याचा वापर नियमाप्रमाणे केला नाही. संस्थेचे अध्यक्ष व संचालकांनी शासनाची दिशाभूल करीत एक कोटी 47 लाख पाच हजार रुपये काढले आणि अपहार केला. या प्रकरणात फुले व घाटे यांना शुक्रवारी (ता. 5) दुपारी साडेबाराच्या दरम्यान अटक करण्यात आली. 

फुले यांच्यावर पदाचा गैरवापर करून संस्थेच्या कागदपत्रांची पडताळणी न करता ती प्रमाणित करून संचालक मंडळाशी संगनमत करून अपहार केल्याचा आरोप आहे. घाटे यांनी नियमांच्या कसोटीवर कागदपत्रांची पडताळणी न करता बनावट कागदपत्रे सादर केली, असा आरोप आहे. 

मुंबई उच्च न्यायालयाने शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरणी या दोघांना अटकपूर्व जामीन 21 जुलै 2016 रोजी दिला होता. या शिष्यवृत्ती घोटाळ्याची कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना बोलावले होते. पूजा गारमेंट प्रकरणी समाज कल्याण विभागाचे सहायक निरीक्षक राहुल काटकर यांनी 31 मार्च रोजी पोलिसात फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून दोघांना अटक करण्यात आली. 

वादग्रस्त अधिकारी... 
सांगली ः समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांचे सांगली जिल्हा होम ग्राऊड. मात्र स्वतःच्याच जिल्ह्यात ते वादग्रस्त ठरले. विशेष समाज कल्याणचे सहायक आयुक्त असताना त्यांच्यावर कर्मचारी भरतीप्रश्‍नी आरोप झाले होते. कनिष्ठ अधिकाऱ्यांना सतत दुय्यम वागणून दिल्याच्याही तक्रारी होत्या. जिल्हा परिषदेत समाजकल्याण अधिकारी म्हणून त्यांची तीन वर्षाची कामगिरी सुमार राहिली. त्यावेळी शाळांच्या शिष्यवृत्तीसंदर्भातील तक्रारींवरून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी त्यांच्यावर ही कारवाई केली होती.

Web Title: Manisha Phule, Deepak Ghate arrested