esakal | मांजरीत चिक्कोडी-मिरज मार्ग रोखला I Demand
sakal

बोलून बातमी शोधा

मांजरीत चिक्कोडी-मिरज मार्ग रोखला

मांजरीत चिक्कोडी-मिरज मार्ग रोखला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मांजरी : चिक्कोडी तालुक्याला वरदान ठरलेल्या कृष्णा नदीला २०१९ व २०२१ साली आलेल्या महापुरात अनेक दलित कुटुंबीयांच्या घरांची हानी झाली आहे. त्यात संपूर्ण दलित कुटुंबेच उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांना शासनाने त्वरित नुकसानभरपाई द्यावी. दोन्ही वर्षातील नुकसानग्रस्तांच्या घरांना मंजुरी देण्यात यावी. प्रत्येक दलित कुटुंबाला घर बांधण्यासाठी राज्य शासनाने पाच लाख रूपये मंजूर करावेत, अशा मागण्यांसाठी बुधवारी (ता. २९) चिक्कोडी तालुक्यातील विविध दलित संघर्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी चिक्कोडी-मिरज मार्ग मांजरी येथे रास्तारोको आंदोलन करून तब्बल चार तास रोखून धरला. यावेळी जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या पदाधिकारी व नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. त्यात महिलांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश होता. पूरग्रस्तांना न्याय देण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार नेमिनाथ गेज्जी यांना देण्यात आले.

हेही वाचा: नुकसानीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री मराठवाड्याचा दौरा करणार

कृष्णा नदीला २०१९ व २०२१ साली आलेल्या महापुरामुळे अनेक गावातील दलित कुटूंबासह सर्वसामान्य कुटुंबांची घरे उध्वस्त झाली आहेत. काही कुटुंबांना शासनाने आर्थिक मदत दिली आहे. अनेक दलित कुटुंबे वंचित राहिली तीन वर्षांपासून उघड्यावर पडली आहेत. त्यांना न्याय न मिळाल्याने चिक्कोडी तालुक्यातील विविध दलित संघर्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आज उग्र आंदोलन छेडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला.

आंदोलनस्थळी दलित संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. काही महिलांनी राज्य शासनाच्या विरोधात आपला संताप व्यक्त केला. राज्य शासनाला निवेदन देऊनही काहीच अद्यापही हालचाल झालेली नाही. त्यामुळे हे आंदोलन छेडण्यात आले असल्याचे अनेकांनी सांगितले.

२०१९ च्या महापुरात तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातील अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली आहेत. त्यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही मुश्कील बनले आहे. कोरोना व यावर्षीच्या महापुराने अक्षरशः कुटूंबे उघड्यावर पडली आहेत. दलित कुटुंबाना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

चिक्कोडीचे तहसीलदार नेमिनाथ गेजे यांनी भेट देऊन आंदोलकातर्फे दिलेले निवेदन स्वीकारले. राज्य शासनाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हे निवेदन पोहोचवून सर्वच पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

परिसरातील वाहतूक विस्कळीत

आंदोलनस्थळी कोणताही अनुचित प्रकार न घडण्यासाठी अथणीचे पोलिस उपाधीक्षक एस. व्ही. गिरीश यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चार तास चाललेल्या या आंदोलनामुळे सर्वच परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. या मार्गावरील वाहतूक पोलिसांकडून अन्य मार्गाने वळविण्यात आली होती.

loading image
go to top