ई - सकाळच्या बातमीमुळे 'त्या' अंध कुटुंबासाठी दातृत्वाचे अनेक हात येत आहेत पुढे...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

 या समाजाचे आपण काही तरी देणं लागतो.हा भाव मनात बाळगुन केलेल्या मदतीचा हा वृत्तांत...

नवेखेडे (सांगली) - येडे मच्छिंद्र ता.वाळवा  येथील सदाशिव तांबे यांच्या अंध कुटुंबाला मदतीचा ओघ सुरू आहे. ई - सकाळने त्यांची ही व्यथा वाचकांसमोर आणली आणि दातृत्वाचे अनेक हात पुढे आले. सदाशिव व लक्ष्मीबाई तांबे या दांपत्याला तीन अंध दिव्यांग मुले आहेत. संगीता, सावित्री व मल्हारी तिघेही शंभर टक्के अंध आहेत. आई वडील मजुरी करून या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. पंचवीस वर्षाहून अधिक या गावांमध्ये राहत असून त्यांची राहती झोपडी जळाली आणि हे कुटुंब उघड्यावर आले.अंध मुले त्यांचे शिक्षण,पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. याही परिस्थिती मध्ये त्यांचा संघर्ष सुरू होता.

ई - सकाळ व दै.सकाळने त्यांचा हा संघर्ष मांडला त्यावेळी बार्शी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन आतकरे व त्यांच्या फेसबुक मित्रांनी सात हजार रुपयांची मदत पाठवली. त्यांच्या कपडे धान्य आशा प्रथमिक गरजा पूर्ण होण्यास मदत झाली पण शौचालायची मोठी अडचण होती. या अंध कुटुंबाला त्याची गरज होती. रोजंदारी करुन मिळणाऱ्या उत्पन्नातून स्वतः जागा खरेदी करू शकत नाहीत म्हणून त्यांना रवींद्र कुलकर्णी यांनी त्यांच्या मोकळ्या जागेत पत्र्याचे शेड मारून राहण्यास जागा दिली.  

वाचा - छप्पर जळालं... तीन अंध मुलं कशी तरी वाचली... पण जमवलेला संसार मात्र खाक झाला...

या कुटुंबाच्या नावे जागा नसल्याने शासनाचे शौचालय मिळण्यास अडचणी येत होती म्हणून  शौचालय साठी मदत व्हावी अशी मागणी  या कुटुंबीयांनी वाळवा पंचायत समिती इस्लामपूर ज्येष्ठ नागरिक/दिव्यांग कोरोना सहाय्यक कक्ष, दिव्यांग प्रतिनिधी नागराज चांदकोटी,दै.सकाळचे पत्रकार शामराव गावडे यांच्याकडे केली होती. त्यांच्या मागणीची दखल बोरगाव मधील सुरेंद्र भीमराव पवार,किरण प्रकाश पाटील, राहुल बाळासो पाटील,राहुल अशोक बांडे पुणे शहर पोलिस, सिव्हिल इंजिनियर कॉन्टॅक्टर सदाशिव गणपती मोरे,बोरगाव व हसन हकीम, रेठरे हरणाक्ष यांनी दिलेल्या आर्थिक मदतीतून तांबे कुटुंबियांचे शौचालय प्रश्न मिटला. तसेच २०० लिटरची पाण्याची टाकी दादासो कोळेकर यांनी या कुटुंबास भेट दिली.

'ई - सकाळ'ची बातमी पाहाताच त्या कुटुंबांना मिळाला फेसबुक मंडळींचा मदतीचा हात...

नाना बेर्डे, ऐतवडे खुर्द येथील विश्वसेवा सिमेंट आर्किटेकचे उत्तम पाटील यांनी या कुटुंबांच्या करिता सवलतीच्या दरात शौचालय उपलब्ध करून दिले. या सर्व दानशूर व्यक्तीने दिलेल्या मदतीतून तांबे कुटुंब भारावून गेले व सर्वांचे त्यांनी मनापासून आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Many hands of charity are coming forward for blind family due to e sakal news