मराठा समाजाला आरक्षण देणारच - चंद्रकांत पाटील

मराठा समाजाला आरक्षण देणारच - चंद्रकांत पाटील

कोल्हापूर - शासनाच्या नियतीत खोट नसून, शासन मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण देणार आहे. शासनावर विश्‍वास ठेवा. आम्ही टिकणारे आरक्षण देणार आहोत, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल मिळाल्यानंतर आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलाविण्यात येईल. सारथी संस्थेचे उपमुख्य केंद्र कोल्हापुरात सुरू करण्यासह कुणबी दाखले मिळण्यासाठी सर्व अडचणी दूर केल्या जातील. त्याचबरोबर सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ मराठा समाजासाठीच असेल, असेही त्यांनी सांगितले. 

श्री. पाटील म्हणाले, ‘‘दसरा चौकातील सुरू असलेल्या आंदोलनातून काही मागण्या पुढे आल्या. त्याबाबत लेखी मिळाले तर आंदोलन मागे घेऊ, असे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या नेतृत्त्वाखालील आंदोलकांचे म्हणणे होते. मंत्रिमंडळाच्या उपसमितीत माझ्यासह सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांचा समावेश आहे. मुंबईत ९ ऑगस्टला मोर्चा झाल्यानंतर ही उपसमिती स्थापन झाली होती. त्यापासून समितीचे कामकाज सुरू आहे. दर मंगळवारी आम्ही बैठक घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मेहनत घेत आहोत. श्री. शिंदे यांना कोल्हापुरात येण्याबाबत विनंती केली होती. ते आज कोल्हापुरात आले. काल (ता. ३१) कोकणच्या दौऱ्यावर होतो. त्या वेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना बैठकीसाठी यावे, असे सांगितले.’’

ते म्हणाले, ‘‘शासनातर्फे आंदोलकांना आंदोलन स्थगित करावे,  असे आवाहन केले आहे. दिल्ली व हैदराबाद येथे आरक्षणाच्या अनुषंगाने तज्ज्ञ अभ्यास करीत आहेत. त्यामुळे विश्‍वास ठेवा, तुम्हाला टिकणारे आरक्षण आम्हाला द्यायचे आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाची कार्यवाही करणे, मराठा तरुणांवरील गुन्हे मागे घेणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळासाठी भरघोस तरतूद करणे, महामंडळातून शेतकऱ्यांच्या गट शेती प्रकल्पासाठी महामंडळातून थेट दहा लाखांपर्यंतचे कर्ज देणे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क योजनेची काटेकोर अंमलबजावणी करणे, यासह २२ मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. सकारात्मक चर्चेत शाहू महाराज, ‘सकाळ’चे संपादक संचालक श्रीराम पवार यांच्यासह अनेक मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभले.’’

पत्रकार परिषदेस माजी मुख्यमंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे, आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर, डॉ. सुजित मिणचेकर, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, दिलीप देसाई, हर्षल सुर्वे, स्वप्नील पार्टे, सचिन तोडकर उपस्थित होते. 

शाहू छत्रपती महाराज यांना पत्र सुपूर्द
वसंतराव मुळीक यांनी मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी लक्ष्मीविलास पॅलेस येथे येऊन घोषणा करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार मागण्यांबाबतचे लेखी पत्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्याकडे सुपूर्द केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com