सहकारमंत्री, पालकमंत्र्यांच्या घरासमोर आसूड आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जुलै 2018

सोलापूर : सोलापुरातील सकल मराठा समाजाच्यावतीने आज सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या घरासमोर आसूड आंदोलन केले. मागील सात-आठ दिवसापासून आंदोलन सुरू असूनही सरकार याची दखल घेत नसल्याने समाजाच्यावतीने सरकारचा निषेध करण्यात आला. 

सोलापूर : सोलापुरातील सकल मराठा समाजाच्यावतीने आज सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या घरासमोर आसूड आंदोलन केले. मागील सात-आठ दिवसापासून आंदोलन सुरू असूनही सरकार याची दखल घेत नसल्याने समाजाच्यावतीने सरकारचा निषेध करण्यात आला. 

पालकमंत्री देशमुख यांच्या घरासमोर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. डफरीन चौकाकडून जुन्या एम्प्लॉयमेंट चौकाकडे जाणारी वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आली होती. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून एकेरी बाजूने वाहतूक सुरू होती. पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलक आल्यानंतर त्यांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. पालकमंत्र्यांच्या घरासमोर आसूड ओढल्यानंतर मराठा समाजाचे कार्यकर्ते सहकारमंत्री देशमुख यांच्या होटगी रोडवरील घराकडे निघाले. होटगी रस्त्यावर महिला हॉस्पिटल चौकापासूनच बॅरेगेट्‌स लावण्यात आले होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोरही मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सहकारमंत्री देशमुख यांच्या घराकडे जाण्यापूर्वी पोलिसांनी आंदोलकांना थांबवले. घराच्या अलीकडे असलेल्या सोना हॉटेलसमोरच्या पुढील बाजूस आंदोलक थांबले. त्याठिकाणी मराठा समाजातील प्रमुखांची भाषणे झाले. यावेळीही सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

शहर-जिल्ह्यात गेल्या सात दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र, जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांनी या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळेच आम्हाला त्यांच्या घरासमोर आसूड आंदोलन करावे लागल्याचे माऊली पवार यांनी सांगितले. मागील काही दिवसात तीन-चार जणांचे बळी गेले आहेत. या सरकारला आणखी किती बळी हवे आहेत? असा सवाल माऊली पवार यांनी उपस्थित केला. सहकारमंत्री देशमुख यांच्या घरासमोर भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवारही आंदोलनाच्या ठिकाणी आले. त्यांचेही भाषण झाले. मी जरी भाजपचा जिल्हाध्यक्ष असलो तरी प्रथम मी मराठा असल्याचेही श्री. पवार यांनी सांगितले. या आंदोलनामध्ये आपण सुरवातीपासूनच समाजाच्या सोबत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी राजन जाधव, अमोल शिंदे, विनोद भोसले, प्रवीण डोंगरे, इंद्रजित पवार, गणेश डोंगरे उपस्थित होते. 

आंदोलनावेळी वरुणराजाचे आगमन 
सहकारमंत्री देशमुख यांच्या घरासमोर आंदोलन सुरू असताना वरुणराजाचेही आगमन झाले. मराठा समाजाचे नेते पावसातही जोराने भाषण करत होते. पावसात चिंब होऊनही आंदोलनाची धार कमी झाली नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maratha kranti morcha agitation behind minister home