अठरा ठिकाणी होणार चक्का जाम!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

चक्‍काजाम आंदोलनाची ठिकाणे

शिरवळ : शिरवळ चौक, खंडाळा : पारगाव चौक, पाचवड : आनेवाडी टोल नाका, सातारा : वाढे फाटा, उंब्रज : तळबीड टोल नाका, कऱ्हाड : कोल्हापूर नाका, म्हसवड : म्हसवड चौक, दहिवडी : पिंगळी चौक, पुसेगाव : शिवाजी चौक, कोरेगाव : आझाद चौक, रहिमतपूर : रहिमतपूर चौक, फलटण : फलटण चौक, लोणंद : बस स्थानकासमोर, वाठार : रस्त्यावर, मेढा : बाजार चौक, पाटण : जुने स्टॅंड, वाई : बावधन नाका, वडूज : वडूज चौक.

सातारा - संपूर्ण जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन करून सरकारला ताकद दाखवून देण्याचा निर्धार मराठा क्रांती मूक मोर्चाच्या बैठकीत करण्यात आला. "प्रत्येक मराठ्याचे एकच काम... 31 जानेवारीला चक्का जाम..!' असा नारा या वेळी देण्यात आला.

कोपर्डी अत्याचार प्रकरणातील नराधमांना फाशी मिळावी, "ऍट्रॉसिटी कायद्या'चा गैरवापर रोखावा, तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाच्या मागण्यांच्या अनुषंगाने राज्य सरकारने अजून कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे मार्चमध्ये मराठा क्रांती मूक मोर्चा मुंबईत धडकेल. त्यापूर्वी मंगळवारी (ता. 31) राज्यभर चक्‍का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. त्याच्या नियोजनासाठी काल (ता. 26) येथील कल्याण रिसॉर्टमध्ये जिल्ह्यातील "सकल मराठा समाजा'ची बैठक झाली. त्यात आंदोलनाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

बैठकीत "मराठा क्रांती मूक मोर्चा'च्या संयोजकांना जबाबदारीचे वाटप करण्यात आले. "मराठा क्रांती मूक मोर्चा'वेळी ज्यांच्याकडे तालुक्‍यांचे नियोजन होते. त्यांच्याकडेच चक्‍का जाम आंदोलनाची जबाबदारी सोपविण्यात आली. शिस्तबद्ध व सुनियोजित पद्धतीने आंदोलन होण्यासाठी ठरविलेल्या ठिकाणीच आंदोलने केली जातील. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावांनी बैठकीचे आयोजन करावे, त्यामध्ये आपल्या नजीकच्या ठिकाणाची निवड करावी, त्याबाबतची माहिती तालुका संयोजकांना द्यावी, तसेच मंगळवारी (ता. 31) सकाळी 11 ते दोन या वेळेत शांततेच्या मार्गाने कोणताही अनुचित प्रकार न करता आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. चक्‍काजाम आंदोलनात लोकप्रतिनिधी व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या इच्छुकांनीही सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्या- त्या ठिकाणच्या मराठ्यांनी आंदोलनाच्या वेळी आपल्या परिसरातील लोकप्रतिनिधी व इच्छुकांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवावे. आंदोलनाला अनुपस्थित राहणाऱ्याला मराठा समाजाने निवडणुकीत धडा शिकवायचा, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
"सकल मराठा समाज' व "मराठा क्रांती मूक मोर्चा'चे संयोजक प्रतिनिधी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांना भेटले. बैठकीतील निर्णयांची त्यांना माहिती दिली. चक्‍का जाम आंदोलनाची आचारसंहिता, या आंदोलनात नेमके काय करणार यावरही चर्चा झाली. मोर्चावेळी मराठा बांधवांनी दाखविलेल्या संयमाचेही श्री. पाटील यांनी कौतुक केले.

वाढे फाट्यावर होणार भजन
साताऱ्यात वाढे फाटा येथे आंदोलन होणार आहे. या वेळी वारकरी संप्रदायातील मंडळी भजन म्हणणार आहेत. वाढे फाटा येथील आंदोलनात सातारा शहर व परिसरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला, युवक, युवती व ज्येष्ठ नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होतील. साताऱ्यातील सर्व समाज बांधव, व्यापारीही चक्‍का जाम आंदोलनाचे साक्षीदार होणार आहेत.

चक्‍काजाम आंदोलनाची ठिकाणे

 

शिरवळ : शिरवळ चौक, खंडाळा : पारगाव चौक, पाचवड : आनेवाडी टोल नाका, सातारा : वाढे फाटा, उंब्रज : तळबीड टोल नाका, कऱ्हाड : कोल्हापूर नाका, म्हसवड : म्हसवड चौक, दहिवडी : पिंगळी चौक, पुसेगाव : शिवाजी चौक, कोरेगाव : आझाद चौक, रहिमतपूर : रहिमतपूर चौक, फलटण : फलटण चौक, लोणंद : बस स्थानकासमोर, वाठार : रस्त्यावर, मेढा : बाजार चौक, पाटण : जुने स्टॅंड, वाई : बावधन नाका, वडूज : वडूज चौक.

आंदोलनाची आचारसंहिता...

 

 

- नेमून दिलेल्या ठिकाणीच सहभागी व्हा
- तालुकानिहाय बैठका घ्या
- शिस्तबद्ध आंदोलन करा
- कोणीही गालबोट लावू देऊ नका
- गालबोट लावणाऱ्या संशयिताची माहिती पोलिसांना द्या
- वाहनांवर दगडफेक करू नका
- वाहनांची हवा सोडू नका
- रस्त्यावर टायर पेटवू नका
- अग्निशमन दल, रुग्णवाहिकांना रस्ता मोकळा करून द्या
- सहभागींनी पाण्याची बाटली जवळ ठेवावी
- पोलिसांना सहकार्य करावे

 

Web Title: Maratha kranti morcha chakka jaam 31 jan