मराठा, मराठा, मराठा; कोल्हापुरात रेकॉर्डब्रेक

Maratha Kranti Morcha
Maratha Kranti Morcha

कोल्हापूर - सळसळत्या उत्साहात अभिमानाने मिरवणारे भगवे झेंडे, भगव्या टोप्या, भगवे स्कार्फ आणि निःशब्द वातावरणात "चालेन तर वाघासारखेच‘ असे सांगत तमाम मराठ्यांनी आज मराठा क्रांती मोर्चासाठी वाघाची झेप घेतली.

गर्दीचे सारे विक्रम मोडीत काढले. लाखोंच्या संख्येने निघालेल्या या विराट मोर्चातून कोपर्डी घटनेच्या विरोधातील चीड व्यक्त झालीच. त्याशिवाय समाजाच्या विविध न्याय्य मागण्याही राज्यकर्त्यांकडे मांडल्या. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांची परंपरा जपताना मराठा समाजाला अठरापगड जातींनी दिलेला पाठिंबा हे या मोर्चाचे केवळ वैशिष्ट्यच नव्हे, तर तमाम देशवासीयांना सर्वसमावेशकतेचा, एकात्मतेचा संदेश देणारा ठरला. 

दरम्यान, मोर्चात तरुणाई आणि महिलांची संख्या लक्षणीय राहिली. त्यांच्या हातातील विविध फलकांनी आपल्या न्याय्य मागण्या मांडतानाही अस्सल कोल्हापुरी बाजाचे दर्शन घडवले.

सकाळी सातपासूनच शहराच्या विविध ठिकाणांहून सुरू झालेला हा निःशब्द हुंकार साडेअकराच्या सुमारास महाएल्गारात रूपांतरित झाला आणि त्याने कोपर्डी घटनेतील नराधमांवर कठोर कारवाई, मराठा आरक्षणासह विविध मागण्यांची एकमुखी मागणी सुरू केली.

छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, राजमाता जिजाऊ, रणरागिणी ताराराणींच्या वेशभूषेत मोर्चात सहभागी होणाऱ्यांची संख्याही लक्षणीय होती. मात्र, शोभायात्रेपेक्षा "हेच आमचे प्रेरणास्थान आहे. आम्ही पेटून उठलोय अन्यायाच्या विरोधात आणि न्याय मिळवूनच मागे हटणार,‘ असे सांगण्याचाच प्रामाणिक प्रयत्न होता. 

चला... चूल बंद; घर बंद 

डोक्‍यावर पांढऱ्या, भगव्या टोप्या, हातात भगवे झेंडे, गळ्यात स्कार्फ, भगव्या साड्या आणि कोपर्डी घटनेची चेहऱ्यावर दिसणारी तिडीक अशा वातावरणात मराठा क्रांती मोर्चातील महिलांचा सहभाग लक्षणीय राहिला. शहरासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मराठमोळ्या माता-भगिनींसह तरुणी लाखोंच्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. 

शहरातील महिलांपेक्षा ग्रामीण भागातील दैनंदिनी जरा वेगळीच. पहाटे उठायचे. दुभत्या जनावरांची देखभाल, चारा-पाण्याची व्यवस्था करायची, धारा काढायच्या आणि शेताची वाट धरायची. आज या कामांना सुटी देत ऐतिहासिक "मराठा मोर्चा‘च्या साक्षीदार होण्यास आतुर झालेल्या महिलांचे लोंढेच्या लोंढे मिळेल त्या वाहनाने शहरात दाखल झाले. पहाटेपासूनच शहराच्या वेशीवर थंडीची तमा न बाळगता दिवसभर लागणारी न्याहरी सोबत घेऊनच त्या वाहनातून उतरल्या. तेथून थेट चालत मोर्चाच्या मार्गावर सहभागी झाल्या. 

"ना नेता, ना घोषणा‘ असे स्वरूप असलेल्या या मोर्चाबाबत ग्रामीण भागातील महिलांत मोठी उत्सुकता होती. राज्याच्या इतर जिल्ह्यांत निघालेल्या मोर्चाची माहिती त्यांच्यापर्यंत पोचल्याने कोल्हापूरच्या मोर्चात कधी सहभागी होतोय, अशाच काहीशा भावना या महिलांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. त्यामुळे ग्रामीण भागातून उत्स्फूर्तपणे महिला सहभागी झाल्या. अनेक महिलांच्या कडेवर लहान मूल, हाताचे बोट धरून चालणारी मुलं-मुली आणि ज्येष्ठ महिलांना सांभाळत निघालेल्या तरुण मुलींनी मोर्चा यशस्वी करण्यात मोलाचा सहभाग घेतला आहे. 

कोपर्डी घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ऍट्रॉसिटी कायद्यात बदल करावा, शेतीमालाला हमीभाव मिळावा व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मोर्चाच्या मागण्यांचे महिलांच्या हातातील फलक लक्ष वेधून घेत होते. मोर्चात सहभागी झालेल्या महिलांना जागोजागी पाणी, खाऊ, फळे वाटप करणारे पाठबळ देत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com