सहकुटुंब सहभागाचा वकिलांचा निर्धार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - मराठा क्रांती मोर्चात जिल्ह्यातील सर्व वकिलांनी गणवेशात सहभागी होण्याचा एकमुखी निर्धार जिल्हा बार असोसिएशनच्या बैठकीत केला. मोर्चानंतर दसरा चौक परिसराची स्वच्छताही करण्याचा संकल्प असोसिएशनतर्फे करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, या मागणीचा निवेदनात समावेश करण्यास संयोजकांनी मंजुरी दिली. असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रकाश मोरे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. 

कोल्हापूर - मराठा क्रांती मोर्चात जिल्ह्यातील सर्व वकिलांनी गणवेशात सहभागी होण्याचा एकमुखी निर्धार जिल्हा बार असोसिएशनच्या बैठकीत केला. मोर्चानंतर दसरा चौक परिसराची स्वच्छताही करण्याचा संकल्प असोसिएशनतर्फे करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, या मागणीचा निवेदनात समावेश करण्यास संयोजकांनी मंजुरी दिली. असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रकाश मोरे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. 

कोल्हापुरात १५ ऑक्‍टोबरला निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा देण्यासंदर्भात आज जिल्हा बार असोसिएशनची बैठक राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात झाली. ॲड. महादेवराव आडगुळे म्हणाले, ‘‘राज्यभरातून लाखोंच्या उपस्थितीत निघणाऱ्या मोर्चात जिल्ह्यातील प्रत्येक वकिलाने सहभागी व्हावे. त्यादिवशीच्या न्यायालयीन कामकाजाबाबत न्यायाधीशांची चर्चा केली जावी.’’ जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. शिवाजीराव राणे म्हणाले, ॲट्रॉसिटी कायद्यात अटकपूर्व जामीन आणि खोटी फिर्याद देणाऱ्यास एक लाख रुपये दंड केला जावा, अशा तरतुदी कराव्यात. माजी अध्यक्ष ॲड. विवेक घाटगे म्हणाले, ‘‘मोर्चा दिवशी सर्व सदस्यांनी जुन्या जिल्हा कोर्टात जमून तेथून मोर्चात सहभागी व्हावे. त्यादिवशी न्यायालयीन कामकाजात वकील सहभागी होणार नाहीत. त्याबाबत न्यायाधीशांकडे असोसिएशनतर्फे विनंती केली जावी, तसेच दसरा चौक परिसर स्वच्छतेची जबाबदारी असोसिएशनच्या सदस्यांकडून पार पाडली जाईल.’’ 

सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक म्हणाले, ‘‘विशेष सभा घेऊन बार असोसिएशनने सामाजिक बांधिलकी जपली आहे. या आंदोलनाला व्यक्ती, पक्षाचा झेंडा नाही. आतापर्यंत ४५ समाजांनी पाठिंबा दिला आहे. मुस्लिम समाजाने मोर्चा दिवशी पार्किंगची सर्व जबाबदारी उचलेली आहे. मोर्चात आपण सर्व कुटुंबासोबत सहभागी व्हा. कोल्हापुरातील खंडपीठ ही कोल्हापूर नव्हे तर सहा जिल्ह्यांची आग्रही मागणी आहे. निवेदनात त्याचा जरुर समावेश केला जाईल.’’ अध्यक्ष ॲड. प्रकाश मोरे म्हणाले, ‘‘मराठा मोर्चात जिल्ह्यातील सर्व वकील गणवेशात सहभागी होतील. सकाळी नऊ वाजता सर्व वकिलांनी जिल्हा न्यायालयात एकत्रित जमावे. पक्षकारांनाही वकिलांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करावे.’’  ॲड. व्ही. आर. पाटील म्हणाले, ‘‘मोर्चासाठी वेगवेगळ्या कमिट्या तयार करा.’’ ॲड. राजेंद्र किंकर म्हणाले, ‘‘मोर्चास माझा व ब्राह्मण सभा करवीरचा पाठिंबा आहे.’’ सचिव ॲड. सर्जेराव खोत म्हणाले, ‘‘यायला लागतंय, नाही आम्ही सर्व मोर्चाला येणारच.’’ ॲड. कोमल राणे म्हणाले, ‘‘मराठा मोर्चात सर्व वकिलांनी एकजुटीने सहभागी होऊ.’’ ॲड. प्रकाश आंबेकर म्हणाले, ‘‘मराठा समाज जागृत झाला आहे. आपणही समाजाचा एक घटक आहोत. त्यात सर्व वकिलांनी सहभागी व्हावे.’’ ॲड. विजय पाटील-उत्तरेकर म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील सर्व वकील मोर्चात कुटुंबासह सहभागी होतील.’’ ॲड. कल्पना माने-पाटील म्हणाल्या, ‘‘मोर्चात जिल्ह्यातील सर्व महिला वकील गणवेशात सहभागी होतील.’’उपाध्यक्ष ॲड. अरुण पाटील यांनी आभार मानले. 
 या वेळी सकल मराठा समाजाचे शंकरराव शेळके, सहसचिव ॲड. अशुंमन कोरे, लोकल ऑडिटर ॲड. प्रशांत पाटील, महिला प्रतिनिधी ॲड. मेघा पाटील, सदस्य ॲड. मिथुन भोसले, ॲड. संदीप चौगुले, ॲड. यतिन कापडिया, ॲड. मनोहर पोवार, ॲड. शहाजी पाटील, ॲड. अनुजा देशमुख, ॲड. धैर्यशील पवार, ॲड. उदय पाटील उपस्थित होते.

दसरा चौक परिसराची करणार स्वच्छता 
समाजातील एक घटक म्हणून मोर्चात फक्त सहभागी व्हायचे नाही, तर दसरा चौक परिसराची स्वच्छताही करायची अशी ज्येष्ठ वकिलांकडून आलेल्या सूचनेचे वकिलांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. तसा त्यांनी स्वच्छतेचा एकमुखी संकल्पही यशस्वी करण्याचा निर्धार केला.

Web Title: maratha kranti morcha in kolhapur