कोल्हापूरचा मोर्चा ३५ लाखांचा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - मराठा क्रांती मोर्चासाठी प्रचंड संख्येने लोक येणार असल्याने मोर्चाच्या एकत्रिकरणासाठी ताराराणी चौकाचा पर्याय विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी आज सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांसमोर ठेवला. येत्या दोन दिवसांत सर्व्हे करून अंतिम निर्णय घेण्याची सूचना त्यांनी केली. 

कोल्हापूर - मराठा क्रांती मोर्चासाठी प्रचंड संख्येने लोक येणार असल्याने मोर्चाच्या एकत्रिकरणासाठी ताराराणी चौकाचा पर्याय विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी आज सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांसमोर ठेवला. येत्या दोन दिवसांत सर्व्हे करून अंतिम निर्णय घेण्याची सूचना त्यांनी केली. 

पंधरा ऑक्‍टोबरच्या मोर्चाचा समारोप दसरा चौकात करण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांनी घेतला होता. त्यासंबंधी निर्णय घेण्यासाठी आज सायंकाळी पोलिस अधीक्षक कार्यालयात बैठक झाली. शहराचे नऊ एंट्री पॉइंट त्यातून येणारे लोक, बेळगावसह सीमाभागातून येणाऱ्यांची संख्या पाहता मोर्चात किमान ३५ लाख लोक सहभागी होतील असा अंदाज आहे. यासंदर्भात केलेल्या सर्व्हेत हा आकडा पुढे आला आहे.  

मोर्चाचा मार्ग कसा असेल आणि पार्किंग कुठे कुठे होईल याचे सादरीकरण (प्रेझेंटेशन) राजू लिंग्रस व प्रशांत क्षीरसागर यांनी आज एका बैठकीत केले. लोक कितीही संख्येने आले, 

तरी नेमक्‍या नियोजनामुळे कुठेही गोंधळ होणार नाही. दसरा चौकात शांततेत मोर्चाचा समारोप होईल असे या वेळी सांगण्यात आले. नांगरे-पाटील यांनी दसरा चौकात मोर्चा एकत्रिकरणास आपला विरोध नाही. अंतिम निर्णय सकल समाजाने घ्यावा असे सांगितले. ते म्हणाले, ‘‘सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील मोर्चा पाहता कोल्हापूरचा मोर्चाही त्याच ताकदीने असणार आहे. गुप्तचर यंत्रणांचीही तशीच माहिती आहे. सातारा आणि सांगलीच्या प्रत्यक्ष मोर्चा वेळी अडचणी निर्माण झाल्या. महिला आणि मुलींची संख्या मोर्चात लक्षणीय असते. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण होते. पोलिसांवर नवरात्रीच्या बंदोबस्ताचा ताण आहे. त्यातच मराठा क्रांती मोर्चाचे हे मोठे टेन्शन आहे. स्वयंसेवक शिस्तीने मोर्चा सांभाळतात. त्यामुळे पोलिसांचे काम हलके होते. गर्दीचा ओघ पाहता कुठेही गालबोट लागणार नाही, याची काळजी पोलिसांबरोबर तुम्हालाही घ्यावी लागेल.’’
स्वयंसेवकांच्या रूपातील मावळ्यांना आपत्तकालीन व्यवस्थेचे प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. दसरा चौकात एकत्रिकरणाचा निर्णय असला, तरी प्रचंड संख्या पाहता हा चौक अपुरा पडेल अशी स्थिती आहे. त्यामुळे ताराराणी चौकाच्या पर्यायाचा विचार करावा. दसरा चौक परिसरात सीपीआर रुग्णालय आहे. आणिबाणीच्या स्थितीत एखाद्या रुग्णाला हलवायचे किंवा दाखल करायचे म्हटले तरी अडचण होईल. ताराराणी चौक हा परिसर उंचावर आहे. ज्या ज्या भागातून मोर्चे आणण्याचा विचार आहे त्यांचे एकत्रिकरण ताराराणी चौकात होईल. शहरालगतची सर्वच मैदाने पार्किंगला देऊन चालणार नाहीत. काही मैदाने रिकामी ठेवावी लागतील असेही नांगरे-पाटील यांनी सांगितले. घड्याळाच्या काट्याकडे पाहून एकाच वेळी मोर्चे निघतील या दृष्टीने काम करा, अशी सूचना पाटील यांनी बैठकीत केली. 

पार्किग व्यवस्था आणि मोर्चा नकाशाच्या सादरीकरणानंतर सुरेश पाटील यांनी ताराराणी चौकाच्या पर्यायाबाबत विचारणा केली. मोर्चा संपल्यानंतर लोक त्यांच्या वाहनापर्यंत सुखरूप जाणे महत्त्वाचे आहे, त्याची काळजी पोलिस प्रशासनाने घ्यावी असे त्यांनी सांगितले.

दिलीप पाटील म्हणाले ‘‘गर्दीमुळे महामार्गाची कोंडी होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, यासाठी पंधराशे स्वयंसेवक महामार्गावर असतील. सत्तर वॉकिटॉकीसह विविध ठिकाणी टॉवर उभे केले जाणार आहेत. पोलिस, स्वयंसेवक आणि डॉक्‍टर तेथे असतील. रुग्णवाहिकेसाठी मार्ग पोलिसांनी रिकामा ठेवावा.’’

वसंत मुळीक म्हणाले ‘‘अन्य जिल्ह्यांतील मोर्चा वेळी झालेल्या त्रुटींचा अभ्यास करून परिपूर्ण नियोजन करावे.’’ प्रा. जयंत पाटील म्हणाले, ‘‘केएमटीची वाहतूक मोर्चाच्या दिवशी बंद राहील. केएमटीकडील दोनशे कर्मचारी वाहतुकीच्या नियोजनात असतील. एनसीसी, आरएसीची मुले गर्दीला शिस्त लावण्यासाठी मिळतील या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
डॉ. प्रल्हाद केळवकर यांनी वैद्यकीय मदत कशी असेल याचे सादरीकरण केले. 

या वेळी पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, सतीश माने, वाहतूक निरीक्षक अशोक धुमाळ, अमृत देशमुख, अनिल देशमुख या पोलिस अधिकाऱ्यांसह दिलीप देसाई, अजित राऊत, बाजीराव चव्हाण, उत्तम कांबळे, गणी आजरेकर, कादर मलबारी, अजित सासणे, फत्तेसिंह सावंत, अशोक रोकडे, विनायक फाळके, उत्तम कोराणे आदी या वेळी उपस्थित होते.
 

मोर्चा सुरू झाल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील  स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. तेथूनच ते मोर्चाबाबतचे सर्व अपडेटस्‌ घेणार आहेत. 
- विश्‍वास नांगरे-पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक

नेमके नियोजन करा; सहकार्य करू! 
मोर्चाचे नियोजन नेमकेपणाने करा, पोलिस दल ताकदीने सहकार्य करेल, मोर्चाचा समारोप कुठे करायचा यांसह अन्य बाबींवर एकत्र बसून निर्णय घ्या असा सल्ला विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी उपस्थितांना दिला. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबईतील अंत्ययात्रेसह मोठे मोर्चे हाताळण्याचा अनुभव आपल्याला असल्याचे त्यांनी नमूद केले.

Web Title: maratha kranti morcha kolhapur