Maratha Kranti Morcha : शिवाजी पेठेचा झंझावात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - मराठा आरक्षणासाठी शिवाजी पेठेने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज धडक मोर्चा काढला. तरुणांचा सळसळता उत्साह, हाती भगवे झेंडे, ‘एक मराठा, लाख मराठा’ असा टिपेला पोहोचलेला सूर अशा जल्लोषी वातावरणात मोर्चा निघाला. या निमित्ताने शिवाजी पेठ ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या रस्त्यावर पुन्हा एकदा भगवे वादळ निर्माण झाले.

कोल्हापूर - मराठा आरक्षणासाठी शिवाजी पेठेने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज धडक मोर्चा काढला. तरुणांचा सळसळता उत्साह, हाती भगवे झेंडे, ‘एक मराठा, लाख मराठा’ असा टिपेला पोहोचलेला सूर अशा जल्लोषी वातावरणात मोर्चा निघाला. या निमित्ताने शिवाजी पेठ ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या रस्त्यावर पुन्हा एकदा भगवे वादळ निर्माण झाले.

मराठा आरक्षणाच्या लढ्यात शिवाजी पेठ अग्रेसर राहिली आहे. ऑक्‍टोबर २०१६ ला निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य केंद्र शिवाजी तरुण मंडळ होते. यंदाच्या ठोक मोर्चाच्या निमित्ताने पेठ कुठेच दिसत नसल्याचे शल्य कार्यकर्त्यांना होते. गेल्या आठवड्यापासून मोर्चाची तयारी सुरू होती. दोन हजार टी शर्ट, भगवे झेंडे आणि पेठेतील तालीम, मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील, यादृष्टीने तयारी केली होती. दुपारी बाराच्या सुमारास निवृृत्ती चौक येथून अर्धा शिवाजी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चास सुरुवात झाली. 

मोर्चाचे एक टोक बिनखांबी गणेश मंदिर तर दुसरे निवृत्ती चौकापर्यंत होते. महाद्वार रोडवर मोर्चा पोचल्यानंतर तरुणांच्या उत्साहाला उधाण आले. ‘शिवाजी पेठ’ असे उल्लेख असलेले टी शर्ट आणि ध्वनिक्षेपकावर ‘ही माझी शिवाजी पेठ’ या आशयाचे गाणे लक्षवेधी ठरले. 

कसबा गेट, पापाची तिकटी, माळकर तिकटी येथे सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चाचे स्वागत केले. सीपीआरमार्गे मोर्चा दसरा चौकात पोचला. तेथे मराठा ठोक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर व्हीनस कॉर्नरमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोचला. महिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

शिवाजी पेठेतील सर्व तालीम संस्थांचे पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले. नाथा गोळे तालीम मंडळ, तटाकडील तालीम मंडळ, अवचित पीर तालीम मंडळ, फिरंगाई तालीम मंडळ, वेताळ तालीम मंडळ, खंडोबा तालीम मंडळ, सरदार तालीम मंडळ, शिवाजी तालीम मंडळ, महाकाली तालीम मंडळ, संध्यामठ तरुण, मंडळ, न्यू संध्यामठ, जुना वाशी नाका, दत्त तरुण मंडळ, विद्यार्थी कामगार, सूर्येश्‍वर तरुण मंडळ, चंद्रेश्‍वर, मर्दानी खेळाचा आखाडा, नेताजी तरुण मंडळ, झाड सर्कल, निवृत्ती चौक तरुण मंडळ, कोब्रा ग्रुप आदी तालीम संस्थांचे कार्यकर्ते सहभागी झाले.

महापौर शोभा बोद्रे, जिल्हा दूध संघाचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके, आमदार चंद्रदीप नरके, मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, उपाध्यक्ष अजित राऊत, सदाभाऊ शिर्के, माजी आमदार सुरेश साळोखे, महेश जाधव, बाजीराव चव्हाण, विक्रम जरग, रविकिरण इंगवले, उत्तम कोराणे, अजित चव्हाण, सुरेश जरग, खंडोबा तालमीचे अध्यक्ष बाळासाहेब कुरणे, चंद्रकांत सूर्यवंशी, लाला गायकवाड, सुरेश जरग, उपमहापौर महेश सावंत, सागर चव्हाण, सचिन चव्हाण, चंद्रकांत साळोखे, उदय साळोखे, सई खराडे, सुनीता राऊत, अशोक देसाई, अजय इंगवले, राजू सावंत, सरिता सासने, दीपा पाटील, नगरसेविका तेजस्विनी इंगवले, नगरसेवक अजिंक्‍य इंगवले, राहुल इंगवले, सुरेश जरग, राजेंद्र चव्हाण, राजू साळोखे, राजू चोपदार, इंद्रजित बोंद्रे, पप्पू नलवडे, तुकाराम साळोखे आदी सहभागी झाले.

घोडेस्वार अन्‌ बालकलाकार
घोड्यावरील पारंपरिक वेशातील मावळे लक्षवेधी ठरले. मोर्चाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत बालकलाकार सहभागी झाले. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहिलेल्यांना कलाकारांचे अप्रूप वाटले.

मरगाई गल्लीचे लक्षवेधी भजन
‘घेणार, घेणार आरक्षण घेणार... आता नाही माघार, आरक्षण घेणार...’ या गाण्याच्या तालावर मरगाई गल्ली भजनी मंडळाने ताल धरला. विदूषकाच्या वेशभूषेत कलाकाराने लक्ष वेधले. पेठेतील सर्व तालीम मंडळांच्या नावाचा उल्लेख होईल असे गाणे कलाकारांनी रचले. सुनील माने, सुनील शिंदे, दत्ता माने, विजय माने, दिलीप माने, पप्पू माने, प्रताप जामदार, प्रदीप पाटील, केशवराव जाधव, तानाजी साळोखे, वैभव जाधव, उमेश मोरे, अभिजित चौगले, सूर्यदीप माने आदी सहभागी झाले. निवृत्ती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर पोलिस बंदोबस्त होता. मोर्चात कोठेही अनुचित प्रकार घडू नये, याची प्रशासनाने खबरदारी घेतली होती.

थरारक युद्धकला प्रात्यक्षिके
वस्ताद आनंदराव ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडोबा मर्दानी खेळ पथकाने मोर्चाच्या मार्गावर युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिके सादर केली. बाळासाहेब शिकलगार, मिलिंद सावंत, किरण जाधव, शिवतेज ठोंबरे, मोना गायकवाड, शिवानी ठोंबरे, शिवबा व शाहूराज सावंत, अथर्व जाधव, विकी गोळे, चिन्मय एकशिंगे, पोपट वाघे, संजय निकम, कृष्णात ठोंबरे यांनी लाठी-काठी, फरी गदका, तलवार, पट्टाफेक, लिंबू काढणीचे प्रात्यक्षिक दाखवले.

लिंगायत समितीतर्फे स्वागत
दसरा चौकात मोर्चा आल्यानंतर सकल मराठा समाज व लिंगायत संघर्ष समितीतर्फे स्वागत करण्यात आले. ‘एक मराठा लाख मराठा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणांनी चौक दणाणून गेला. संयोजकांनी मोर्चातील शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. 

Web Title: Maratha Kranti Morcha Maratha Reservation Agitation Shivaji peth Women