मंत्र्यांनी घेतली मराठा आंदोलनाची धास्ती

तात्या लांडगे
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

मराठा आंदोलन आणि आजपासून सुरू होणाऱ्या धनगर आरक्षण लढयाची धास्ती घेत या तिन्ही मंत्र्यांनी या कार्यक्रमाला न येणेच पसंद केले.

सोलापूर : सोलापूर विद्यापीठ स्थापनेला आज (ता. 1) 14 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने वर्धापन दिन आयोजित करण्यात आला असून त्यासाठी विद्यापीठाने शिक्षणमंत्री विनोद तावडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना निमंत्रण दिले होते. त्यांनीही कार्यक्रमाला येण्याची तयारी दर्शविली म्हणून कार्यक्रम पत्रिकेत त्यांची नावेही नमूद केली. परंतु, मराठा आंदोलन आणि आजपासून सुरू होणाऱ्या धनगर आरक्षण लढयाची धास्ती घेत या तिन्ही मंत्र्यांनी या कार्यक्रमाला न येणेच पसंद केले.

राज्यभर मराठा आंदोलन आरक्षणाच्या मागणीसाठी दिवसेंदिवस तीव्र होत आहे. या आक्रमक आंदोलनकर्त्यांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर आषाढी वारीला न येणेच पसंद केले. त्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री सुभाष देशमुख तसेच काही दिवसांपूर्वी मंत्री चंद्रकांत खैरे यांना आंदोलकांनी अडविले होते. त्यातून या मंत्र्यांनी कशीबशी सुटका करून घेतली होती. तेव्हापासून राज्यातील बहुतांशी मंत्री पोलीस संरक्षणात बाहेर पडत असल्याचे दिसून येते. तर काही मंत्र्यांनी बाहेर फिरणेच बंद केले आहे. काही मंत्री तर स्वतः च्या अथवा कार्यकर्त्यांच्या खासगी वाहनातून प्रवास करत असल्याची चर्चा आहे. आंदोलनाची धास्ती घेत अनेक मंत्र्यांनी राज्यातील विविध विकास कामांच्या उद्घाटन, भूमिपूजनाचे तसेच लोकापर्णाचे .कार्यक्रम स्थगित ठेवले आहेत. 

सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमाला 100 टक्के येणार असे शिक्षणमंत्री, सहकारमंत्री यांनी विद्यापीठ प्रशासनाला सांगितले होते. मात्र, त्यांनी ऐनवेळी दांडी मारल्याने विद्यापीठ प्रशासनाची मोठी पंचाईत झाली. सोलापूर महापालिकेच्या महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते कार्यक्रम उरकला.

Web Title: maratha kranti morcha ministers afraid of maratha kranti morcha