marathi bhasha din 2020 ; 172 वर्षांचे पहिले मराठी वाचनालय 

marathi bhasha din 2020 ; 172 वर्षांचे पहिले मराठी वाचनालय 

बेळगाव - बेळगावात वाचन चळवळ रुजविण्यासह ती वृद्धिंगत करण्याचे काम अनेक वाचनालये करीत आहेत. त्यात गणपत गल्लीतील सार्वजनिक वाचनालयाचा उल्लेख प्राधान्याने करावा लागेल. शहरातील पहिले मराठी वाचनालय म्हणून या वाचनालयाची ख्याती आहे. वाचनालयाला 172 वर्षांचा इतिहास लाभला असून याठिकाणी 24 साहित्य प्रकारातील 84 हजारांहून अधिक पुस्तके आहेत. 

बेळगावचे तत्कालीन जिल्हाधिकारी जे. डी. इन्वरारिटी यांनी 1848 मध्ये "नेटीव्ह जनरल लायब्ररी' या नावाने वाचनालयाची स्थापना केली. मात्र, 13 मार्च 1921 पासून त्याचे "सार्वजनिक वाचनालय बेळगाव' असे नामांतर करण्यात आले.

वाचनालयाची प्रशस्त इमारत 1925 मध्ये बांधण्यात आली असून ती स्वमालकीची आहे. 2015 मध्ये अनगोळमध्ये वाचनालयाची शाखा सुरु झाली आहे. वाचनालयात बाल, मासिक, पुस्तक, महिला, वाचन, अभ्यासिका, संदर्भ असे विविध विभाग आहेत.

तसेच दिवाळी अंक योजना आहे. नियमित वाचक संख्या 931 इतकी आहे. यामध्ये बाल विभागाची वाचन संख्या 50, ग्रंथ विभागाची 328, नियतकालिके विभागाची वाचक संख्या 160 आहे. आजीव सभासद 393 आहेत.

वाचनालयात अध्यात्म, इतिहास, ज्योतिष, चरित्र, धर्म, अनुवाद, प्रबंध, निबंध, विनोदी वाड:मय, वाड:मय समीक्षा व टीकालेखन, पौराणिक, प्रवास वर्णन, भाषा व्याकरण, शिक्षणशास्त्र, वैद्यक, कृषी, उद्योगधंदे, राजकीय, व्यायाम, कादंबरी, कथा, कविता, नाटक, डिटेक्‍टीव आदी विभाग कार्यरत आहेत. 

मराठी भाषा व संस्कृतीचे जतन करण्यासाठी वाचनालयातर्फे वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

यामध्ये 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती, 18 ते 22 जानेवारीपर्यंत बॅं. नाथ पै व्याख्यानमाला, 24 एप्रिल ग्रंथालय दिन, 11 जून साने गुरुजी पुण्यतिथी, 26 जून राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, 3 ऑगस्ट क्रांतिसिंह नाना पाटील जयंती, 13 ऑगस्ट रोजी आचार्य अत्रे जयंतीनिमित्त आचार्य अत्रे पुरस्कार वितरण, 2 ऑक्‍टोंबर रोजी महात्मा गांधी जयंती व ज्ञानसत्र व्याख्यानमाला, 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिन साजरा करण्यात येतो.

तसेच तसेच बीए, एमए बेळगाव विभागात मराठी विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव व पत्रकारिता पुरस्कार देण्यात येतो. वाचनालयाच्या अध्यक्षस्थानी गोविंद राऊत, उपाध्यक्षपदी कृष्णा शहापूरकर, कार्यवाह नेताजी जाधव व सहकार्यवाहपदी ऍड. आय. जी. मुचंडी आहेत. प्रभाकर नलवडे, अनंत मेणसे, अभय याळगी, अनंत जाधव, अनंत जांगळे, वाय. एम. तरळेकर, ऍड. नागेश सातेरी, अनंत लाड, सुनीता मोहिते कार्यकारिणीवर आहेत. 

सीमालढ्यातील योगदान 
सार्वजनिक वाचनालयातर्फे 2000 मध्ये डॉ. य. दि. फडके यांच्या अध्यक्षतेखाली 73 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविले होते. या संमेलनात सीमाप्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात न्यावा, असा ठराव करण्यात आला.

त्यानंतर महाराष्ट्र सरकारने तत्कालीन न्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली कमिटी नेमून सीमाप्रश्‍न सर्वोच्य न्यायालयात दाखल करता येतो का, याचा अहवाल घेतला. त्यानंतर 2004 मध्ये महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्‍नी सर्वोच्य न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यामुळे सार्वजनिक वाचनालयातर्फे भरविण्यात आलेल्या संमेलनामुळे सीमाप्रश्‍नाला गती मिळाली. 

वाचनालयाची स्थापना 1848 मध्ये झाली. वाचनालयाकडे सध्या 84 हजार ग्रंथसंपदा आहे. 2000 मध्ये वाचनालयातर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्यात आले होते. वाचनालयाच्या माध्यमातून वाचन चळवळ टिकविण्याचे काम केले जात आहे. 
- गोविंद राऊत, अध्यक्ष, सार्वजनिक वाचनालय 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com