marathi bhasha din 2020 ; बेळगावात आज मराठीचा जागर; मराठी भाषिकांना पर्वणी 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 February 2020

शहर परिसरातील विविध संस्थांतर्फे गुरुवारी (ता. 27) कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांतून मराठीचा जागर होणार आहे.

बेळगाव : शहर परिसरातील विविध संस्थांतर्फे गुरुवारी (ता. 27) कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांतून मराठीचा जागर होणार आहे. मान्यवर वक्‍त्यांची प्रबोधनपर व्याख्याने, काव्यवाचन, सांस्कृतिक कार्यक्रम याद्वारे मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा जयजयकार घुमेल. 
गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे गुरुवारी सायंकाळी 5 वाजता मराठी विद्यानिकेतनच्या पटांगणात मराठी भाषा दिन साजरा होईल. कोल्हापूरमधील सुभाष फोटो ग्राफिक्‍सचे संचालक शशिकांत ओऊळकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्‌घाटन होईल. प्रमुख वक्‍त्या म्हणून नाट्यदिग्दर्शिका व लेखिका प्रा. डॉ. संध्या देशपांडे उपस्थित राहतील. सार्वजनिक वाचनालय, कॉ. कृष्णा मेणसे पुरोगामी व्यासपीठ, वाङ्‌मय चर्चा मंडळ, वरेरकर नाट्य संघ व लोकमान्य ग्रंथालय या संस्थांचाही सहभाग या कार्यक्रमात आहे. मराठी भाषाप्रेमींनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर व सचिव सुभाष ओऊळकर यांनी केले आहे. 

हे पण वाचा - बेळगावातील बेरोजगारांना रोजगाराची सुवर्ण संधी; येथे मिळणार रोजगार

भाऊराव काकतकर महाविद्यालयातर्फे सकाळी 10 वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून "सकाळ'चे मुख्य बातमीदार मल्लिकार्जुन मुगळी व पत्रकार संजय सूर्यवंशी उपस्थित राहतील. प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील अध्यक्षस्थानी असतील. खानापूर तालुका बेळगाव रहिवासी संघटनेतर्फे वरेरकर नाट्यसंघाच्या सभागृहात गडकिल्ले छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. माजी आमदार अरविंद पाटील, एस. के. पोटे व डॉ. सोनाली सरनोबत यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन होईल. यावेळी मुंबईतील दुर्गवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष हसूरकर, किसन चौधरी, प्रवीण कदम, प्रेमानंद गुरव, सुहास शहापूरकर, विनायक घोडेकर उपस्थित राहतील. संघटनेचे अध्यक्ष पी. जे. घाडी अध्यक्षस्थानी असतील. 
कोरे गल्ली, शहापूरमधील श्री गंगापुरी मठात सायंकाळी सात वाजता होणाऱ्या कार्यक्रमात कोरे गल्ली, हट्टीहोळ गल्ली व रामलिंगवाडीतील मराठीतून शिक्षण घेणाऱ्या सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके प्रमुख पाहुणे असतील. यावेळी माधुरी कालकुंद्रीकर यांचे "मातृभाषेतून शिक्षण काळाची गरज' या विषयावर व्याख्यान होईल. 

हे पण वाचा - त्यावेळी मीच तुमचा मंत्री होतो... शरद पवार यांनी जागविल्या त्या आठवणी

साहित्य-सृजन संमेलन रविवारी 
राणी चन्नमा विद्यापीठातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा दिनानिमित्त रविवारी (ता. 1) विद्यापीठाच्या सभागृहात साहित्य-सृजन संमेलनाचे आयोजन केले आहे. प्रमुख वक्ते म्हणून कवी चंद्रकांत देशमुखे, ज्येष्ठ कथाकथनकार शांतीनाथ मांगले उपस्थित राहतील. जायंट्‌स सखीच्या अध्यक्षा नम्रता महागावकर संमेलनाचे उद्‌घाटन करणार आहेत. आरसीयु मराठी विभागाचे प्रा. डॉ. विनोद गायकवाड अध्यक्षस्थानी असतील. संमेलनाचा लाभ घ्यावास असे आवाहन मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. मनीषा नेसरकर, मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. मैजोद्दीन मुतवल्ली, प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे व प्रा. डॉ. संजय कांबळे यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi bhasha din 2020 celebration in belgaum