रेकॉर्डिंग बॅकअपअभावी सीसीटीव्ही ‘शोपीस’

CCTV
CCTV

कऱ्हाड - आपण सीसीटीव्हीच्या कक्षेत आहात, असे लिहून फक्त येणाऱ्यांवर भीती राहावी, यासाठी कॅमेरे बसवले जात आहेत. जिल्ह्यातील अनेक मोठमोठ्या व्यापाऱ्यांच्या गोदामे, शोरूमसह मोठ्या बॅंकांसह विविध संस्थामंध्ये सीसीटीव्ही आहेत. मात्र, त्याचे रेकॉर्डिंग बॅकअप नाही. त्यामुळे चोऱ्या झाल्या की, त्याचे शूटिंग होते, पण रेकॉर्डिंग बॅकअप नसल्यामुळे ते शूटिंग सेव्ह होत नाही. परिणामी सीसीटीव्ही असून, बॅकअपअभावी त्यांची सुरक्षा रामभरोसेच दिसते आहे. 

जिल्ह्यातील शहरी भागात ज्या-ज्या ठिकाणी मोठे शोरूम, बॅंका आहेत, त्याठिकाणी सीसीटीव्ही आहेत. त्यात विशेष करून सातारा, कऱ्हाड, महाबळेश्वर, पाचगणी, कोरेगाव अशा महत्त्वाच्या शहरांसह ग्रामीण भागातही सीसीटीव्ही बसवण्याची ‘क्रेझ’ वाढताना दिसते आहे. त्याचा परिणामस्वरूप चोऱ्यांमध्ये घट होण्यात झालाही आहे. मात्र, अनेक ठिकाणची स्थिती अत्यंत गंभीर आहे. अनेक मोठ्या संस्था, शोरूममध्ये कॅमेरे बसवले आहेत. मात्र, त्याचे रेकॉर्डिंग बॅकअप नसल्याने मोठी कठीण स्थिती पोलिसांसमोर उभी राहताना दिसते आहे. कऱ्हाडच्या गजानन हाउसिंग सोसायटी येथे चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोराने त्या घराच्या कम्पाउंडच्या आत उडी मारली. त्याचवेळी त्याला ह्रदयविकाराचा धक्का बसल्याने तो जागीच ठार झाला. तो बंगला होता. मात्र, तेथे पॉलिश पेपर व्यवसायाचे ते गोदाम होते. तेथून पश्‍चिम महाराष्ट्रात पॉलिश पेपर सप्लाय केला जात होता. तेथे सीसीटीव्ही होता. मात्र, त्याचा बॅकअप नव्हता. त्यामुळे पोलिसांपुढे पेचप्रसंग निर्माण झाला.

त्या चोरट्याची अद्यापही ओळख पटू शकलेली नाही. त्यामुळे गुन्हा अर्धवट स्थितीत राहिल्याचे दिसते. एका बॅंकेत मोठी चोरी झाली. तेथेही सीसीटीव्ही होते. मात्र, त्याचे बॅकअप नव्हते. सुदैवाने पोलिसांनी रस्त्यावर लावलेल्या कॅमेऱ्यावरून त्या चोरट्यांची ओळख पटण्यास मदत झाली होती. एका मोठ्या शाळेत रात्रीत चोरी झाली होती. तेथे सीसीटीव्ही होते. मात्र, त्याचे बॅकअप रेकॉर्डिंग नव्हते. त्यामुळे त्याही चोरीचा गुन्हा प्रलंबित राहिला आहे. 

आपण सीसीटीव्हीच्या कक्षेत आहात, असे लिहून केवळ सीसीटीव्हीची भीती दाखवण्यासाठी असे कॅमेरे बसवल्याचे दिसून येते आहे. मध्यंतरी पोलिसांनी केलेल्या पाहणीत हीच स्थिती आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्ही लावणाऱ्यांना बॅकअप रेकॉर्डिंग ठेवण्याच्या सूचना करण्यास सुरवात केली आहे. कॅमेऱ्याचे बॅकअप रेकॉर्डिंग व कंट्रोल रूम कॅमेऱ्यापासून दूर ठेवण्याची सूचनाही पोलिस करताना दिसत आहेत. चोरटे हे कॅमेरे चोरीवेळी बॅकअप होणारी हार्डडिस्कसह गायब करत आहेत. येथे मध्यंतरी हायवेलगत १६ लाखांची चोरी झाली. त्यावेळी कॅमेऱ्यासह शूटिंग रेकॉर्डिंग होणारी बॅकअप डिस्कही चोरट्यांनी पळवून नेली होती. त्यामुळे पुरावे काहीच हाती उपलब्ध होत नाहीत. कॅमेऱ्याच्या बॅकअप रेकॉर्डिंगचा उंब्रज येथे झालेल्या दरोड्यात पोलिसांच्या तपासात चांगलाच फायदा झाला. त्यात सुमारे २५ लाखांच्या रोख रकमेसह एका महिलेचा खून झाला होता. त्या चोरीचे सारे रेकॉर्डिंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाले होते. परिणामी ती टोळी कोणती असेल, याचा अंदाज बांधून पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत नगरच्या टोळीच्या मुसक्‍या आवळल्या होत्या. त्यांच्यावर आता ‘मोका’अंतर्गत कारवाईही झाली आहे. त्याचा तपास सुरू आहे. त्यामुळे रेकॉर्डिंग बॅकअप अत्यंत महत्त्वाचे आहे. ते ठेवण्यासाठी पोलिसांना व्यापक प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यात पोलिस यशस्वी झाल्यास आपसूक चोऱ्यांच्या प्रमाणात घट येणार आहे. 

कऱ्हाड परिसरात पोलिसांचे ४३ कॅमेरे
कऱ्हाड, मलकापूर परिसरात ४३ कॅमेरे पोलिसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून बसवले आहेत. त्यातील दहा कॅमेरे मलकापुरात तर ३३ कॅमेरे शहरात आहेत. त्याचे कंट्रोलरूम शहर पोलिस ठाण्यात आहे. त्याचे आठ ते दहा दिवसांचे रेकॉर्डिंग बॅकअप असते. कॅमेरे असल्याने मध्यंतरी शहरात दरोड्याच्या तयारीत असलेल्यांची टोळी गजाआड झाली होती. पोलिस ठाण्यात बसून, हवालदाराने मुख्य बाजारपेठेत पोलिसांना ती टोळी पकडण्यासाठी पाठवले होते. त्यावेळी त्यांच्या हालचाली हवालदार पोलिस ठाण्यात बसून सांगत होता. त्यामुळे तो फायदाही येथे महत्त्वाचा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com