सायाळाच्या शिकारप्रकरणी आंब्रळच्या चौघांना कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

महाबळेश्वर - सायाळाची शिकार करून त्याचे मटण शिजवतानाच वन विभागाने आंब्रळ येथील चौघांना रंगेहात पकडले. या चौघांनाही वाई न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीशांनी 14 दिवसांची पोलिस कोठडी दिली. 

महाबळेश्वर - सायाळाची शिकार करून त्याचे मटण शिजवतानाच वन विभागाने आंब्रळ येथील चौघांना रंगेहात पकडले. या चौघांनाही वाई न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीशांनी 14 दिवसांची पोलिस कोठडी दिली. 

महादेव बाबूराव ओंबळे (वय 69), हणुमंत मारुती आंब्राळे (वय 67), सचिन रघुनाथ आंब्राळे (वय 33) व प्रल्हाद जगन्नाथ आंब्राळे (वय 45) (सर्व रा. आंब्रळ, ता. महाबळेश्वर) अशी त्यांची नावे आहेत. आंब्रळ येथील सायाळ पार्टीची माहिती एकाने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी आंब्रळच्या हद्दीत मळकीट येथील घटनास्थळी भेट दिली. त्या वेळी महादेव ओंबळेंच्या शेतात सायाळाची पिसे व इतर अवयव आढळून आले. याठिकाणी सायाळ या प्राण्याची कत्तल करून त्याचे मटण पार्टीसाठी वापरण्यात आल्याचे दिसून आले. पार्टी सुरू असलेल्या ठिकाणी वन विभागाने छापा टाकून चौघांनाही अटक केली. वनपाल एस. एस. येवळे यांनी गुन्हा दाखल केला. वनपाल सुनील लांडगे, संभाजी नाईक, आर. एन. गडदे यांनी चौघांच्या मुसक्‍या आवळल्या. वनक्षेत्रपाल रणजित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. काही ठिकाणी वन्यजीवांची शिकार केली जाते. यासंबंधीची माहिती वन विभागाला देणाऱ्यास रोख रक्कमेचे बक्षीस दिले जाईल. माहिती देणाऱ्याचे नावही गुप्त ठेवले जाईल, असे श्री. गायकवाड यांनी नमूद केले.

Web Title: marathi news crime satara