"होळी लहान... पोळी दान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 मार्च 2018

सातारा - दुष्ट आणि वाईट प्रवृत्तीचे निर्दालन करणारा म्हणून होळीचा सण साजरा केला जातो. दिवसेंदिवस पर्यावरणाचा होणारा ऱ्हास पाहून गेल्या काही वर्षांत प्रदूषणविरहित होळी साजरी करण्यासाठी नागरिक पुढाकार घेऊ लागलेत. या उपक्रमांना पाठबळ म्हणून विविध संस्था सरसावलेल्या दिसतात. अशा विविध उपक्रमांना नागरिकही प्रतिसाद देऊ लागलेत. 

सातारा - दुष्ट आणि वाईट प्रवृत्तीचे निर्दालन करणारा म्हणून होळीचा सण साजरा केला जातो. दिवसेंदिवस पर्यावरणाचा होणारा ऱ्हास पाहून गेल्या काही वर्षांत प्रदूषणविरहित होळी साजरी करण्यासाठी नागरिक पुढाकार घेऊ लागलेत. या उपक्रमांना पाठबळ म्हणून विविध संस्था सरसावलेल्या दिसतात. अशा विविध उपक्रमांना नागरिकही प्रतिसाद देऊ लागलेत. 

"होळी लहान करा, पोळी दान करा', हा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा उपक्रम वृक्षतोड रोखण्याबरोबरच गरिबांच्या मुखात अन्न जात असल्याने राज्याला आदर्श ठरू लागला आहे. घरोघरी तसेच सार्वजनिक ठिकाणी होळी पेटवली जाते. होळी पेटविण्यासाठी छोटी, मोठी झाडे तोडली जातात. त्यातून वृक्षतोड होते, प्रदूषण होते. होळीभोवती अपशब्द उच्चारले जातात. त्यातून अनेक वाईट घटना घडतात. तरीही होळीनिमित्त सर्वांत जास्त हानी होते ती पर्यावरणाची. त्यामुळेच आता नागरिकांत प्रबोधन होऊ लागले आहे. होळी लहान स्वरूपात साजऱ्या होऊ लागल्या आहेत. होळीमध्ये अग्निदेवतेसाठी पोळी अर्पण करतात. त्यातून अन्नाची निष्कारण नासाडी होते. याबाबतही "अंनिस' व अन्य संस्थांद्वारे प्रबोधन केले जात आहे. होळीत पोळी न टाकण्याच्या आवाहनास उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. 

यंदाही हा उपक्रम "अंनिस'तर्फे राबविला जाणार आहे. नागरिकांनी होळीचा नैवद्य दाखविल्यानंतर बाजूला काढून ठेवावा, पोळी कोरडी ठेवावी, कोरड्या खोक्‍यात किंवा डब्यात त्या गोळा कराव्यात. या जमा झालेल्या पोळ्या "अंनिस'च्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्द करा, असेही आवाहन करण्यात आले आहे. यंदा होळीनिमित्त जमा होणाऱ्या पोळ्या "अंनिस'चे कार्यकर्ते आकाशवाणी झोपडपट्टीत जाऊन वाटणार आहेत. या उपक्रमाच्या माहितीसाठी उदय चव्हाण (मो. 9423865444) यांच्याशी संपर्क साधावा. 

विविध संस्था, संघटनांच्या पुढाकाराची गरज 
विविध मंडळे, संस्थाही पोळ्या जमा करून त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी वंचितांपर्यंत पोचवू शकतात. "पोळी वाटणे' हा उपक्रम कोणीही एखादी गरीब वस्ती निवडून त्यांच्या पातळीवर राबविल्यास मिष्टान्न अन्नाची राख होण्यापेक्षा एखाद्याच्या मुखात जाईल. त्यादृष्टीने विविध संस्था व संघटनांनी पोळी दान करण्याचा उपक्रम राबवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: marathi news holi festival satara