भरधाव मोटार झाडावर आदळून सहा ठार 

Accident near Kolhapur
Accident near Kolhapur

आंबा : येथून अर्ध्या किलोमीटर अंतरावर असलेल्या तळवडे गावाजवळील वळणावर मोटार झाडावर आदळून झालेल्या अपघातात सहा जण ठार; तर दोघे गंभीर जखमी झाले. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. मृतांत दोन बालकांचा समावेश आहे. मोटारचालक प्रशांत सदाशिव पाटणकर (वय 40, रा. भगिरथी हाऊस पिंपळे गुरव, पुणे), संतोष त्रिंबक राऊत (37), पत्नी स्नेहल (32), मुलगा स्वानंद (5, रा. शेवाळेवाडी, हडपसर, पुणे), दीपक बुधाजी शेळकंदे (40), मुलगा प्रणव (3, साईट पार्क, लक्ष्मी सुपर मार्केटसमोर दिघी, पुणे) हे सहा ठार झाले. वरुणा दीपक शेळकंदे व त्यांची तीन वर्षाची मुलगी यज्ञा गंभीर जखमी झाले. जखमींना सीपीआरमध्ये दाखल केले आहे. 

राऊत व शेळकंदे कुटुंबीय पुण्याहून मोटार (एमएच 11 ए. डब्ल्यू 6600) गणपतीपुळ्याला देवदर्शनास निघाले होते. देवदर्शनाआधीच त्यांच्यावर काळाने झडप घातली. राऊत कुटुंब मूळचे लातूरचे तर शेळकंदे जुन्नर तालुक्‍यातील भिवाडे गावचे आहेत. ते नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक झाले होते. 

मृत संतोष, दीपक आणि प्रशांत तिघे जण पुण्यातल्या सेनापती बापट मार्गावरील यार्डी सॉफ्टवेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या आय. टी. कंपनीत नोकरीला होते. सोशल वर्कर म्हणून ते काम करीत होते. काल सकाळी सहाच्या सुमारास मोटारीतून सर्वजण गणपतीपुळ्याला देवदर्शनास निघाले. 

कोल्हापूर-रत्नागिरी हा मार्ग वळणावळणाचा धोकादायक असूनही मोटारीचा वेग एकशे पंधरावर लॉक झाली होती. मोटारीचे हेडलाइट शंभर ते दीडशे फुटांवर फेकले गेले होते. इंजीन पूर्णपणे फुटले होते. भरधाव मोटार झाडावर आदळताच तिने दिशाच बदलली. मोटारीतील एकचा मेंदू रस्त्यावर विखुरला होता. दोन एअर बॅग्जही जाग्यावर फुटल्या होत्या. या भीषण धडकेत तिघे जागीच ठार; तर मलकापूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असताना दोघांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या तिघांना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल केले; परंतु त्यातील कारचालक प्रशांत पाटणकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

दरम्यान, अपघातस्थळी जिल्हा पोलिसप्रमुख संजय मोहिते, उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी भेट दिली. पोलिस निरीक्षक अनिल गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत यम्मेवार, पो. कॉ. रामचंद्र दांगट, भरतकुमार मोळके, धनाजी सराटे, विश्वास चिडले, एफ. आय. पिरजादे, संजय जानकर यांच्यासह स्थानिक पातळीवरील पोलिसपाटील दत्तात्रय गोमाडे, गणेश शेलार, शंकर डाकरे, कृष्णा दळवी, नीलेश कामेरकर, मारुती पाटील, राजेंद्र लाड, महेंद्र वायकूळ, संतोष बागम, विलास जाधव, रामा शिंदे, लक्ष्मण घावरे यांनी अपघातग्रस्तांना मदत केली. मलकापुरातील ग्रामीण रुग्णालयात पाच मृतदेहांचे शवविच्छेदन करून रात्री उशिरा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले. अपघातात आख्खे राऊत कुटुंब व शेळकंदे कुटुंबातील कर्ती व्यक्ती मरण पावल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश काळीज फोडणारा होता. 

अपघाती वळणाचे प्रतिवर्षी बळी 
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील मलकापूर ते आंबा या वीस किलोमीटर दरम्यान दहा अपघाती वळणे आहेत. या वळणांवर प्रतिवर्षी अपघात होतातच. दोन वर्षात तळवडे नजीकच्या वळणांवर दोन अपघात होऊन बारा जण मृत्युमुखी पडले होते. मलकापूर ते आंबा दरम्यान असलेल्या वळणांवर दहा वर्षांत शंभरहून अधिक लहान-मोठे अपघात झाले आहेत. पुणे, सांगली व मुंबई येथील मोटारचालकांना येथील वळणांचा अंदाज येत नसल्याने भाविक व पर्यटकांना मृत्यूला सामोरे जावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. 

घटनाक्रम असा 

  • - पहाटे पुण्यातून गणपतीपुळ्याकडे प्रयाण 
  • - साडेसातच्या सुमारास साताऱ्यात चहापान 
  • - तेथून कऱ्हाड-कोकरूडमार्गे आंबा 
  • - साडेदहाच्या सुमारास तळवडेजवळ अपघात 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com