बेळगाव महापालिकेत कर्नाटक गीताची सक्ती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

याआधी शासनाने राज्यातील सर्व शाळांमध्ये नाडगीत म्हणणे सक्तीचे केले आहे. शाळा सुरू होण्याआधी दररोज नाडगीत म्हटले जाते. सीमाभागातील मराठी शाळांमध्ये नाडगीत म्हणण्याची विशेष सक्ती केली जाते. यामुळे मराठी विद्यार्थ्यांची कुचंबणा होते. नाडगीत हे कर्नाटकाचे गुणगाण करणारे गीत आहे.

बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या स्थायी समिती निवडणुकीच्या बैठकीआधी नाडगीत (कर्नाटक राज्य गीत) वाजविण्यात आले. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार घडला. महापालिकेत मराठी भाषिकांची सत्ता आहे. त्यामुळे आजवर कधीही बैठकीच्या आधी नाडगीत म्हटले किंवा वाजविले गेले नाही. पण शनिवारी जिल्हाधिकारी व प्रभारी प्रादेशिक आयुक्त एन. जयराम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आधी नाडगीत वाजविण्यात आले. बैठकीआधी नाडगीत व बैठकीच्या समारोपावेळी राष्ट्रगीत म्हणण्याचा नवा आदेश शासनाने बजावल्याचेही श्री. जयराम यांनी सांगितले. 

बैठकीच्या अध्यक्षांच्या या निर्णयाचा आदर ठेवून सर्व नगरसेवक नाडगीतासाठी उभे राहिले. पण नाडगीतच्या या सक्तीबाबत मराठी नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. मराठी भाषिकांना डिवचण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याची प्रतिक्रिया ही यावेळी व्यक्त करण्यात आली. नाडगीतसंदर्भात आदेश आला आहे का, अशी विचारणा कौन्सिल सेक्रेटरी लक्ष्मी निपाणीकर यांच्याकडे केली असता तसा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आल्याचे त्या म्हणाल्या.

यासंदर्भात सत्ताधारी गटाचे नगरसेवक व अर्थ स्थायी समिती अध्यक्ष रतन मासेकर यांच्याकडे विचारणा केली असता नाडगीतबाबत शासनाचा आदेश आल्याचे ते म्हणाले. शासकीय आदेश आला असेल तर यापुढे महापालिकेच्या प्रत्येक सर्वसाधारण बैठकीत नाडगीत वाजविले जाणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शासनाचा हा आदेश नेमका कधी बजावण्यात आला आहे, याबाबत अद्याप जिल्हाधिकारी व कौन्सिल विभागाकडून स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.

याआधी शासनाने राज्यातील सर्व शाळांमध्ये नाडगीत म्हणणे सक्तीचे केले आहे. शाळा सुरू होण्याआधी दररोज नाडगीत म्हटले जाते. सीमाभागातील मराठी शाळांमध्ये नाडगीत म्हणण्याची विशेष सक्ती केली जाते. यामुळे मराठी विद्यार्थ्यांची कुचंबणा होते. नाडगीत हे कर्नाटकाचे गुणगाण करणारे गीत आहे. सीमाभागातील मराठी भाषिक 1956 पासून महाराष्ट्रात जाण्यासाठी लढा देत आहेत, तर सीमाभागात कन्नडसक्ती करण्याचे सर्व प्रकारचे प्रयत्न कर्नाटकाकडून सुरू आहेत. अपवाद वगळता बेळगाव महापालिकेत मराठी भाषिकांचीच सत्ता आहे. आधी महापालिकेच्या कामकाजाचे कानडीकरण करण्यात आले. आता मराठी नगरसेवकांना डिवचण्यासाठी नाडगीत वाजविण्याची सक्ती करण्यात आली आहे.

Web Title: marathi news kolhapur news belgaum news belgaum marathi