ग्रामसेविकेकडून महिला वाहकास मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

चंदगड : एसटीतून प्रवास करताना तिकिटाची रक्कम घेऊन सुटे पैसे देताना पन्नास रुपयांची मळकी नोट दिल्याच्या रागातून एका ग्रामसेविकेने महिला वाहकाच्या श्रीमुखात लगावली. होसूर (ता. चंदगड) फाट्यावर काल (ता. 14) दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. वाहक सौ. अश्‍विनी संदीप उत्तूरकर (रा. आजरा) यांनी या प्रकरणी संबंधित प्रकाराबाबत पोलिसांत तक्रार नोंदवली. 

चंदगड : एसटीतून प्रवास करताना तिकिटाची रक्कम घेऊन सुटे पैसे देताना पन्नास रुपयांची मळकी नोट दिल्याच्या रागातून एका ग्रामसेविकेने महिला वाहकाच्या श्रीमुखात लगावली. होसूर (ता. चंदगड) फाट्यावर काल (ता. 14) दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. वाहक सौ. अश्‍विनी संदीप उत्तूरकर (रा. आजरा) यांनी या प्रकरणी संबंधित प्रकाराबाबत पोलिसांत तक्रार नोंदवली. 

वाहक सौ. उत्तूरकर व चालक अरुण मुळे शुक्रवारी (ता. 14) आजरा येथून सकाळी साडेदहा वाजता बेळगाव मार्गावर ड्यूटीवर होते. गाडी कोवाड (ता. चंदगड) येथे आली असता संबंधित ग्रामसेविका गाडीत चढल्या. सौ. उत्तूरकर त्यांच्याकडे तिकीट मागण्यासाठी आल्या, त्या वेळी त्या मोबाईलवर बोलत होत्या. त्यांनी होसूर फाट्याचे तिकीट मागणी करून शंभर रुपयांची नोट पुढे केली. त्यावेळी सौ. उत्तूरकर यांनी सुटे पैसे देण्याची विनंती केली; परंतु त्याकडे दुर्लक्ष करीत ग्रामसेविका मोबाईलवरील संभाषणात व्यस्त होत्या. त्यामुळे सौ. उत्तूरकर पुढच्या प्रवाशांची तिकीटे घेण्यासाठी गेल्या.

होसूर फाटा आल्यानंतर त्यांनी शंभर रुपयाच्या बदल्यात तिकिटाचे सात रुपये वजा करुन 93 रुपये परत दिले. त्यामध्ये 50 रुपयांची मळकी नोट होती. ती नको म्हणून ग्रामसेविकेने परत केली; परंतु ती नोट सुस्थितीत असल्याचे सांगून सौ. उत्तूरकर यांनी तीच नोट घेण्यास सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामसेविकेने सौ. उत्तूरकर यांच्या श्रीमुखात लगावली. झटापटीत उत्तूरकर यांच्या शर्टचा खिसा फाटला. पैसे रस्त्यावर विखुरले. त्यांनी ते पुन्हा जमा केले आणि पोलिसांत तक्रार द्यायची म्हणून गाडी पुन्हा कोवाड (ता. चंदगड) येथे आणली. तोपर्यंत संबंधित ग्रामसेविकेचे नातेवाईक तिथे जमा झाले होते. त्या सर्वांनी समजूत घालून तक्रार न देताच परत जायला भाग पाडल्याचे सौ. उत्तूरकर यांचे म्हणणे आहे; परंतु कोणतीही चूक नसताना झालेल्या प्रकाराने मनस्ताप होत असल्याने त्यांनी बेळगावहून आजरा येथे परत आल्यावर आजरा आगार प्रमुखांच्या परवानगीने आजरा येथे पोलिसांत तक्रार नोंदवली.

दरम्यान आजरा आगाराकडील कर्मचाऱ्यांनी आज बैठक घेऊन या प्रकाराचा निषेध केला. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित ग्रामसेविकेवर योग्य ती कारवाई करावी अन्यथा आजरा- बेळगाव गाड्या बंद करण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: marathi news kolhapur news chandgad ST