किरणोत्सव: शेवटच्या दिवशी भाविकांची निराशा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर : किरणोत्सवाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी पूर्ण क्षमतेने सोहळा होईल, या अपेक्षने मोठ्या संख्येने जमलेल्या भाविकांची आज निराशा झाली. सूर्याची मावळती किरणे कशीबशी श्री अंबाबाई मूर्तीच्या कमरेपर्यंत पोचली. पहिल्या दिवशी पूर्ण क्षमतेने किरणोत्सव झाला असताना शेवटच्या दिवशी नेमकी किरणे का पोचली नाहीत, काळाच्या ओघात तारखांत काही बदल झाला का याची चर्चा भाविकांत सुरू आहे. 

कोल्हापूर : किरणोत्सवाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी पूर्ण क्षमतेने सोहळा होईल, या अपेक्षने मोठ्या संख्येने जमलेल्या भाविकांची आज निराशा झाली. सूर्याची मावळती किरणे कशीबशी श्री अंबाबाई मूर्तीच्या कमरेपर्यंत पोचली. पहिल्या दिवशी पूर्ण क्षमतेने किरणोत्सव झाला असताना शेवटच्या दिवशी नेमकी किरणे का पोचली नाहीत, काळाच्या ओघात तारखांत काही बदल झाला का याची चर्चा भाविकांत सुरू आहे. 

स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या अंबाबाईच्या मंदिरात दिशातंत्राच्या आधारे किरणोत्सव सोहळा होतो. 31 जानेवारी, 1 आणि 2 फेब्रुवारी या तारखा निश्‍चित आहेत. 8 ते 12 नोव्हेंबरदरम्यानही हा सोहळा होतो. दक्षिणायन आणि उत्तरायानातील तारखांत आजपर्यंत बदल झाला नसल्याचे रेकॉर्ड सांगते. मात्र, काळाच्या ओघात इमारतीचे अडथळे, धूलिकण यामुळे किरणांच्या मार्गात काही अडथळा निर्माण झाला का, याचीही चर्चा भाविकांत आहे. 

मुख्य मंदिराबरोबर आवारातील स्क्रीनवरही सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी आज मोठ्या संख्येने गर्दी केली. परगावच्या भाविकांसाठी तर ही पर्वणी होती. मिळेल तेथे जागा पकडलेल्या भाविकांच्या नजरा देवीच्या पायाकडे लागल्या. सायंकाळी पाच वाजून 33 मिनिटांनी गरुड मंडपाबाहेरील बाजूस किरणांचा प्रवेश झाला. पाच वाजून 36 मिनिटांनी गरुड मंडप, पाच वाजून 48 मिनिटांनी मुखदर्शन, पाच वाजून 53 मिनिटांनी गणपतीच्या मागील बाजूस, सहाला कासव चौक, सहा वाजून चार मिनिटांनी पितळी उंबऱ्यावर प्रवेश झाल्यानंतर भाविकांच्या नजरा खिळून राहिल्या. तीन पायऱ्यांवरील प्रवेशानंतर सहा वाजून 16 मिनिटांनी चरणस्पर्श झाला. नंतर किरणांची तीव्रता कमी होत गेली. सहा वाजून 19 मिनिटांनी डाव्या गुडघ्यावर किरणे पडली. नंतर ती लुप्त झाली. नंतर देवीची आरती होऊन भाविक बाहेर पडले. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, संगीता जाधव, प्रा. मिलिंद कारजकर, शिवाजी विद्यापीठाचे पर्यावरण विभागप्रमुख पी. डी. राऊत उपस्थित होते. 

तारखांचा नव्याने अभ्यास होणार का? 
किरणोत्सवाला ऐतिहासिक संदर्भ आहेत. पूर्वी तारखांत कधीही बदल झाला नसल्याचे सांगितले जाते. किरणोत्सवाच्या अडथळ्यांची अनेकदा चर्चा झाली; मात्र यातून काही मार्ग निघालेला नाही. ज्या नियोजित तारखा आहेत त्याच्या आदल्यादिवशी पूर्ण क्षमतेने किरणोत्सव होतो. शेवटच्या दिवशी किरणांची तीव्रता कमी होते. सूर्याचे दक्षिणायन आणि उत्तरायनातील तारखांच्या वेळापत्रकात काही बदल झाला आहे का, याचाही अभ्यास होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया उमटली.

दरम्यान, या पुढील किरणोत्सव अधिक व्यापकतेने होण्यासाठी, तसेच अडथळ्यांसह अन्य विषयांवर चर्चा करण्यासाठी महापालिका अधिकारी आणि संबंधित तज्ज्ञांची लवकरच बैठक घेणार असल्याचे महेश जाधव यांनी सांगितले. दरम्यान, उद्याही (ता. 3) किरणांची माहिती घेतली जाणार आहे. 
 

Web Title: marathi news kolhapur news Mahalakshmi Temple mahalakshmi kirnotsav