संभाजी भिडेंनी माफी मागावी : डॉ. पाटणकर

sambhaji bhide
sambhaji bhide

तारळे : जातीवाचक शिवीगाळ कायद्याबाबत  शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी सांगली येथे केलेले वक्तव्य घटनाबाह्य असून, तो लोकशाहीचा अपमान आहे. त्यांनी त्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. तसेच खासदार उदयनराजे भोसले यांनी भिडे यांची बाजू घेताना जबाबदारीने विधाने करावीत, असेही ते म्हणाले. 

सावरघर येथे शनिवारपासून श्रमिक मुक्ती दलाचे राज्यस्तरीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात झालेल्या दोन दिवसातील ठरावाची व पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी डॉ. पाटणकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी डॉ. प्रशांत पन्हाळकर, डॉ. गेल ओमव्हेट, संपत देसाई, वाहरू सोनावणे, सुभेदार मेजर सुखदेव बन, हरिश्चंद्र दळवी, मोहन धनवे, प्रकाश सोरटे, नजीर चौगुले, प्रकाश भातुसे, डॉ. नवनाथ शिंदे , आनंदराव पाटील, अंकुश शेडगे उपस्थित होते.

डॉ. पाटणकर म्हणाले, ज्यांच्यावर पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ कायद्यांतर्गत खटला दाखल केला आहे. त्या मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी घेतलेला तो कायदा म्हणजे विशिष्ट एका गटाला अधिकार देऊन लोकशाहीचा केलेला अपमान आहे, असे विधान केले असून, ते प्रसिद्धही झाले आहे. 

ते विधान घटनाविरोधी आहे. तसेच ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतात, त्यांच्या दुःखाची क्रूर चेष्टा करणारे आहे. आपल्यावर दाखल झालेला गुन्हा खोटा कसा आहे, याबाबत त्यांनी बोलणे गरजेचे होते. मात्र, तसे ते बोलले नाहीत. शंभर व तीनशे टन ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांची आंदोलने व कर्जमाफीवरुन भिडे यांनाी चेष्टा या पत्रकार परिषदेत केली. तो शेतकरी चळवळीचा अवमान आहे. शेतकऱ्यांची व जातीवाचक कायदा लागू होणाऱ्या जात विभागांची त्यांनी जाहीर माफी मागणे आवश्यक आहे. 

खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल डॉ. पाटणकर म्हणाले, की भिडे यांची बाजू घेताना खासदार भोसले यांना छत्रपती शिवरायांच्या लोकाभिमुख व दैदीप्यमान परंपरेचा विसर पडला होता असे दिसत आहे, अशी विधाने करणे परंपरेचा अवमान करण्यासारखे आहे. खासदार भोसले सगळ्या जनतेचे खासदार आहेत. खासदार नात्याने त्यांनी जबाबदारीने विधाने करावीत.

कोरेगाव भीमा प्रकरणाबाबत डॉ. पाटणकर म्हणाले, की वढू बुद्रुक येथील घटना पूर्वनियोजित आहे. सरकारने यातील दोषी शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. कोरेगाव भीमा परिवर्तन स्मारक वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज व गोविंद महार स्मारक संवर्धन, नितीन आगे यांच्या गुन्हेगारांना शिक्षा होण्याबरोबरच सर्व चळवळीसाठी श्रमिक मुक्ती दल पूर्ण शक्तीनिशी आंदोलन करण्याचा निर्धार करीत आहे. कोरेगाव भीमा स्मारक अभिवादन कार्यक्रमावर झालेल्या हल्ल्याच्या सूत्रधारांना आणि हल्लेखोरांना शिक्षा होण्यासाठी देशव्यापी आंदोलन उभारण्यासाठी श्रमिक मुक्ती दल सर्व सर्वांगांनी पुढाकार घेईल. 

डॉ. पाटणकर म्हणाले, पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरातील बडवे हटविले आता माता आंबाबाईच्या देवळातील श्री पूजकांचा उन्मत्तपणा ठेचावा लागणार आहे. अंबाबाई आईच्या दर्शनासाठी श्री पूजक रुपी दलालांची आम्हाला आवश्यकता नाही. सोवळ्या ओवळयाची कारणे दाखवत ही मंडळी दर्शनासाठी भक्तांची अडवणूक करतात. त्याकरता गणमाता अंबाबाई मुक्ती आंदोलन सुरू करणार आहोत त्याची बैठक 21 तारखेला होणार आहे. विसाव्या शतकाच्या अखेरीस अनेक सामाजिक संघटनांचा उदय झाला. मात्र, श्रमिक मुक्ती दल ही एकमेव अशी संघटना आहे, की ज्याने सरकार कोणतेही असो श्रमिक जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यास भाग पाडले 

या संघटनेने त्यासाठी लढा दिला. त्याचे फळ म्हणून आजही संघटना महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यात वाढत आहे. तसेच आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्र राज्याबाहेर देखील या संघटनेच्या शाखा विस्तार करण्याचा निर्धार व्यक्त केला. वर्गीय जातीय, स्त्री शोषणाचा अंतकरणे आणि समृद्ध पर्यावरण संतुलित समाज तयार करणे, हे श्रमिक मुक्ती दलाचे मुख्य ध्येय आहे. यासाठीचे पायाभूत संघर्ष करणारी ही देशातील अपवादात्मक संघटना आहे आणि गेली 38 वर्ष ही संघटना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com