भूमिगत वाहिनीतून प्रतापगडाला वीजपुरवठा

अभिजित खुरासणे
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

महाबळेश्वर - महाबळेश्वर शहरातून प्रतापगडाला वीजपुरवठा करणारी वाहिणी स्वतंत्र केल्याने भविष्यात प्रतापगड परिसरातील विजेचे काम करताना महाबळेश्‍वरमधील वीजपुरवठा खंडित होणार नाही. महाबळेश्वर व तालुक्‍यातील पश्‍चिम परिसरातील ग्रामीण भागाला स्वतंत्र वीज वाहिनीमुळे भविष्यातील जादा विजेच्या मागणीलाही पर्याय उपलब्ध होत असल्याने वीज वितरण कंपनीने न बोलता काम करून दाखविले आहे.

महाबळेश्वर - महाबळेश्वर शहरातून प्रतापगडाला वीजपुरवठा करणारी वाहिणी स्वतंत्र केल्याने भविष्यात प्रतापगड परिसरातील विजेचे काम करताना महाबळेश्‍वरमधील वीजपुरवठा खंडित होणार नाही. महाबळेश्वर व तालुक्‍यातील पश्‍चिम परिसरातील ग्रामीण भागाला स्वतंत्र वीज वाहिनीमुळे भविष्यातील जादा विजेच्या मागणीलाही पर्याय उपलब्ध होत असल्याने वीज वितरण कंपनीने न बोलता काम करून दाखविले आहे.

महाबळेश्वर तालुका हा पर्यटनदृष्ट्या समृध्द तालुका असल्याने येथील आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत मोठ्या प्रमाणात पर्यटनावर अवलंबून असल्याने येथे विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर शहरातील मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसाय असल्याने शहरातील विजेची मागणीही वाढताना दिसते. परंतु, गेल्या काही वर्षांपूर्वी महाबळेश्वर ‘महावितरण’च्या येथील कारभाराबाबत शहरातून नाराजी होती. काम करूनही अनेक वेळा येथील अधिकाऱ्यांना जनतेतून तसेच वरिष्ठांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते.

त्यात भर म्हणून निसर्गाच्या लहरीमुळे मुसळधार पावसात वीज वाहक तारा तुटून वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांत संतप्त भावना उमटल्या होत्या. या वारंवार होणाऱ्या त्रासामुळे अधिकाऱ्यांनाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते. या सर्व स्थितीचा विचार करून ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण महाबळेश्वर परिसराचा अभ्यास करून योजना तयार केली. त्यापैकी पहिल्या टप्प्यात येथील वेण्णा लेक येथील उपकेंद्रातून प्रतापगड परिसरासाठी स्वतंत्र २२ किलो अश्‍वशक्तीची (के. व्ही.) भूमिगत वीज वाहिनीचे अपूर्ण असलेले काम पूर्ण केले. त्यातून या परिसरात वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्याला आळा बसणार आहे. महाबळेश्वरहून प्रतापगडकडे जाणारी वीज वाहिनी ही डोंगर कपारीतून जात असल्याने अनेक वेळा या परिसरात वीज गेल्यास चार-चार दिवस नागरिकांना विजेपासून वंचित राहावे लागत होते. त्यातच या परिसरात काम करताना अनेक वेळा महाबळेश्वर शहराचा वीजपुरवठा खंडित करावा लागत होता. नवीन वीज वाहिनीमुळे महाबळेश्वर शहर व प्रतापगड परिसर वेगळे झाल्याने आता येथे विजेचे काम करताना अडथळा होणार नाही. त्याचबरोबर अनेक वेळा येथील वीज वाहिनीवर झाडाची फांदी पडल्याने वीज वाहिनी तुटून नुकसान झाल्यास डोंगर, कडे, कपारीतून काम करताना जीव धोक्‍यात घालून वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना काम करावे लागणार नाही. वीज वाहिनी भूमिगत केल्याने हा अडथळा कायमचाच दूर झाल्याने वीज जाण्याच्या तक्रारींवर आळा बसेल. ही योजना ‘महावितरण’च्या ‘इन्फ्रा’ या योजनेंतर्गत कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता संजय साळे व वाई विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली भूमिगत वाहिनीचे अपूर्ण काम महाबळेश्वर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता गणेश चांदणे व शहर शाखा कार्यालयाचे सहायक अभियंता एच. पी. शिंदे यांनी पूर्ण केले आहे. या वीज वाहिनीमुळे महाबळेश्वर तालुक्‍यातील पश्‍चिम भागातील सुमारे १५ गावांना त्याचा फायदा होईल. फिडर स्वतंत्र झाल्याने शहरातील वीज खंडित होण्याच्या प्रमाणावर आळा बसून नियमित वीज पुरवठाही होईल.

...हे होणार फायदे
महाबळेश्‍वरचा वीजपुरवठा अखंडित राहणार
नवीन योजनेचा १५ गावांना होणार फायदा
वीज वाहिन्या तुटण्याचा प्रकार बंद
कर्मचाऱ्यांना कडे, डोंगरात काम करावे लागणार नाही

Web Title: marathi news mahabaleshwar news underground electric supply pratapgad