गद्दार फडणवीस सरकारची उचलबांगडी करू : अजित नवले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

सांगली : सरसकट कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारने एकदा नव्हे तर दोनदा शेतकऱ्यांशी गद्दारी केली आहे. कर्जमाफीचं लबाडाघरचं अवतान बस्स झालं. आता फडणवीस सरकारने 'सरसकट'चा शब्द पाळावा. शेतकऱ्याची पोरं आता उल्लू बनणार नाहीत, ती सरकारची उचलबांगडी करतील, असा इशारा किसान सभेचे प्रदेश सचिव व सुकाणू समितीचे निमंत्रक डॉ.

सांगली : सरसकट कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारने एकदा नव्हे तर दोनदा शेतकऱ्यांशी गद्दारी केली आहे. कर्जमाफीचं लबाडाघरचं अवतान बस्स झालं. आता फडणवीस सरकारने 'सरसकट'चा शब्द पाळावा. शेतकऱ्याची पोरं आता उल्लू बनणार नाहीत, ती सरकारची उचलबांगडी करतील, असा इशारा किसान सभेचे प्रदेश सचिव व सुकाणू समितीचे निमंत्रक डॉ. अजित नवले आज येथे दिला. 

येथील मराठा सेवा संघात आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. सरसकट कर्जमाफीसाठी सुकाणू समिती उद्या (ता. 23)च्या मेळाव्यात पुण्यात आंदोलनाची पुढची दिशा जाहीर करेल, आरपारच्या लढ्याला तयार राहा, असे आवाहन त्यांनी केले. 

किसान सभेचे केंद्रीय सहसचिव अशोक ढवळे, सत्यशोधक सभेचे नेते किशोर ढमाले, समिती सदस्या सुशीला मोराळे, किसन गुजर यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेते विचारमंचावर होते. खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, रघुनाथदादा पाटील यांच्या अनुपस्थितीत मेळावा झाला. 

श्री. नवले म्हणाले, ''मुख्यमंत्र्यांनी 'ऐतिहासिक' अशी वल्गना केलेली कर्जमाफी सरसकट फसवी आहे. राज्यात 89 लाख शेतकऱ्यांना 34 हजार कोटीची कर्जमाफी झाल्याचे ते सांगतात, पण आकडे देत नाहीत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुकाणू समितीला सरसकट कर्जमाफीची ग्वाही दिली. आम्ही विश्‍वास ठेवला. सरसकटचा अर्थ थकबाकीदार, चालू, पतसंस्था कर्जदार, बचत गट कर्जदार, सावकारी कर्जदार, शेतीपूरक कर्जदार असा अभिप्रेत आहे. त्यांनी तेथेच गद्दारी करत थकीत कर्जमाफीचे निकष ठरवायला समिती नेमली. आम्ही निकषांची होळी केली. 89 लाखापैकी 49 लाख शेतकरी नियमित कर्जदार आहेत. त्यांना 25 हजाराचे बक्षिस देवून तोंडाला पाने पुसण्याचा डाव केला आहे. तेही सगळे कर्ज फेडले तरच... अद्यादेशातातील कंसात अटींनी शेतकऱ्याचा कंसाने गळा घोटलाय. 1 लाख 14 हजार कोटींचे पीक कर्ज असताना 34 हजार कोटींची कर्जमाफी झाली. 80 हजार कोटींचे कर्ज शेतकऱ्यांच्या खांद्यावर कायम राहिले. मग मिळाले काय? देवेंद्रभाऊ सुधारा, अभ्यास बस्स झाला. शेतकऱ्याची पोरं तुम्हाला चौकाचौकात गाठतील. ही त्यांची हक्काची लढाई आहे, तुम्ही कर्जमाफी देवून उपकार करत नाही.'' 
अशोक ढवळे म्हणाले, ''केवळ 10 ते 12 टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी ही भयानक फसवणूक आहे. 34 हजार कोटीची घोषणा असली तरी प्रत्यक्ष 7 हजार कोटीच मिळतील. अदानी, अंबानी, टाटा, बिर्लांना मोकळे रान देणारे सरकार शेतकऱ्यांना खिंडीत गाठत आहे. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हे लबाड बंधू शेतकऱ्यांना मातीत घालतील.'' 

किशोर ढमाले म्हणाले, ''आकड्यांचा खेळ करणऱ्या सरकारला कल्याण मटकावाले लाजतील. मंत्रीमंडळात शेतकऱ्यांना मातीत घालणारे वामन अवतार बसलेत. भांवलदारांची पाठराखण करून त्यांना लाखो कोटीचे कर्जमाफ केले जाते, शेतकऱ्यांना मागितले की निकषाची नौटंकी सुरु होते. शेतकरी एकजुटीत बाधा आणली जाते.'' 

किसान सभेचे जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख यांनी स्वागत केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते महेश खराडे यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ नेते जयपाल फराटे, जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, बाजार समिती संचालक कुमार पाटील, सुभाष पाटील, डॉ. संजय पाटील, महावीर पाटील, संदीप राजोबा, अनिल देठे, रोहिदास धुमाळ, विजय नवले, जिल्हा परिषद सदस्या सुरेखा आडमुठे, जयश्री डांगे आदी उपस्थित होते. 

सदाभाऊंनी फोडला पुणतांब्यातील संप 
सुकाणू समिती सदस्या सुशीला मोराळे यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर घणाघाती टीकी केली. त्या म्हणाल्या, ''शेतकऱ्यांचा शत्रू कोण आणि मित्र कोण, हे आधी ओळखा. पाठीत खंजीर घुपसणारा आपला शत्रूच आहे. सदाभाऊ खोतानी आयुष्य शेतकरी चळवळीत घालवलं, पण सरडा लाजेल, असा रंग बदलला. त्यांची भाषण ऐका. शेतकरी पायताण काडून सरकारला फोडून काढतील म्हणायचे... आज तीच वेळ त्यांच्यावर आली आहे. पुणतांब्याचा शेतकरी संप सदाभाऊंनी फोडला. सदाभाऊ, सरकारची चाकरी करा, त्यांचे पाय धुवून पाणी प्या, पण चळवळ विकू नका. असे करणारा कधी मोठा झाला नाही, गद्दारांचे नामोनिशाण राहिले नाही. तुमचेही राहणार नाही. सेनापती फितूर झाल्यावर सैन्यानं कुणाच्या भरवशावर लढायचं.'' 

झेंडा सोडा, बाप बघा 
अजित नवले यांनी सदाभाऊंचे नाव न घेता एकजुटीचे आवाहन केले. ते म्हणाले, ''कोण मोठा, कोण आगे बढो, कुणाचा झेंडा कसला, यापेक्षा शेतकऱ्याच्या पोरांनी आपला बाप मरतोय, हे पहावं. आपली एकजूट ही यशाची पूर्वअट आहे. आपण फुटावं, यासाठी ते वाट्टेल ते करतील. ही आरपारची लढाई आहे. कुणासाठी थांबणार नाही.''

Web Title: marathi news marathi website Ajit Navale Devendra Fadnavis Farmers Strike Sangli news kolhapur news