पुजाऱ्यांनी देवीचा बाजार मांडला : डॉ. सुभाष देसाई

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

गडहिंग्लज : श्री अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांनी देवीचा बाजार मांडला आहे. त्यामुळे या विरोधात लढा उभारला आहे. तो कोणत्याही जाती-पक्षाविरोधात नसून धार्मिक स्वातंत्र्याचा लढा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांनी केले. 

गडहिंग्लज : श्री अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांनी देवीचा बाजार मांडला आहे. त्यामुळे या विरोधात लढा उभारला आहे. तो कोणत्याही जाती-पक्षाविरोधात नसून धार्मिक स्वातंत्र्याचा लढा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांनी केले. 

येथील श्री अंबाबाई पुजारी हटाव संघर्ष समितीतर्फे आयोजित व्याख्यानात डॉ. देसाई बोलत होते. 'शोध श्री अंबाबाईचा' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. नगराध्यक्षा स्वाती कोरी अध्यक्षस्थानी होत्या. पालिकेच्या शाहू सभागृहात हा कार्यक्रम झाला. 
डॉ. देसाई म्हणाले, ""श्री अंबाबाई मंदिरात जमा होणारे चांदी-नाणे सरकार जमा करावे. पुजारी तंटा करीत असले तर त्याला पोलिसात द्यावे, काढून टाकावे, असा वटहुकूम राजर्षी शाहू महाराजांनी काढला होता, मात्र या वटहुकूमाची अनेकांना माहिती नाही. त्यामुळे त्याची अंमलबजावणीही झाली नाही. पुजारी हे हक्कदार नसून सरकारचे नोकर आहेत. धर्माच्या नावावर काळे धन जमा करीत आहेत. पुजारी हटाव लढ्याद्वारे हे काळे धन बाहेर काढले जात आहे. त्यांनी धार्मिक पारतंत्र्य, मानसिक गुलामगिरी लादली आहे. त्यातून मुक्त होण्याची वेळ आली आहे.'' 

नगरसेविका श्रद्धा शिंत्रे यांनी प्रास्ताविक केले. शिवसेनेचे संघटक संग्रामसिंह कुपेकर, तालुकाप्रमुख दिलीप माने आदींनी विचारलेल्या प्रश्‍नांचे डॉ. देसाई यांनी निरसन केले. राजीव चव्हाण, माजी नगराध्यक्षा मंजूषा कदम, बी. जी. काटे, श्रीकांत नाईक, पां. ल. करंबळकर, सागर कुराडे, नागेश चौगुले, मनोज पोवार, प्रकाश भोईटे, तानाजी कुरळे, साताप्पा कांबळे आदी उपस्थित होते. अलका भोईटे यांनी आभार मानले. 

* हे मांडले ठराव... 
- 1846 व 1914 च्या वटहुकूमांचा आदर करावा 
- मंदिराचे उत्पन्न समाजाच्या विकासासाठी वापरावे 
- पंढरपूर, शिर्डीप्रमाणे अंबाबाई मंदिरातील पुजारी सरकार नियुक्त पगारी असावेत 
- अंबाबाई स्त्री देवता असल्याने सुशिक्षित, श्रद्धावान स्त्री पुजारी नेमावेत

Web Title: marathi news marathi website ambabai kolhapur Subhash Desai